आमीर खानची मुलगी इराने अखेरीस आपल्या प्रियकराशी...

आमीर खानची मुलगी इराने अखेरीस आपल्या प्रियकराशी केला साखरपुडा (Aamir Khan’s Daughter Ira Khan Gets Engaged With Boyfriend Nupur Shikhare, Shared Romantic Proposal Video, Watch)

आमीर खानची लेक इरा खान हिचं अखेर गंगेत घोडं न्हालं! कारण बरेच दिवस ज्या नुपुर शिखरेशी तिचं प्रेमकूजन चाललं होतं, त्याच्याशी साखरपुडा करून तिनं आपल्या प्रेमसंबंधाला मान्यता दिली आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर या सोहळ्याचा रोमॅन्टिक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये इराचा बॉयफ्रेंड नुपुर, गुडघे टेकून तिला मागणी घालताना दिसतो आहे. दोघांचा हा रोमॅन्टिक व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते आणि मान्यवर कलाकार दोघांचे अभिनंदन करत आहेत.

उपस्थित लोकांमध्ये इरा उभी असून नुपुर इराजवळ येतो. तिचे चुंबन घेतो आणि गुडघे टेकून बसतो. नंतर तो इराच्या बोटात अंगठी घालतो. त्याचे हे फिल्मी वागणे बघून इरा हर्षभरित झाल्याचे दिसते आहे.

नुपुर इराला विचारतो, ‘वुईल यू मॅरी मी?’ अजिबात वेळ न दवडता इरा होकार देते. मग हे जोडपे एकमेकांचे चुंबन घेतात. त्यावर उपस्थित असलेली मंडळी टाळ्या वाजवतात आणि त्यांना उत्तेजन देतात. नंतर हे जोडपे निघून जाते.

हा व्हिडिओ पाहून त्यांचे चाहते आणि बॉलिवूड मधील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. सुश्मिता सेनचा माजी प्रियकर रोहमन शॉल तसेच फातिमा सना शेख हे त्यात सामील आहेत.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा, हुमा कुरेशी, रिया चक्रवर्ती, सारा तेंडुलकर, हेजल किच यांनी या जोडप्याला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.