लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर आमिर खानने घेतला अ...

लाल सिंह चड्ढाच्या अपयशानंतर आमिर खानने घेतला अभिनयातून ब्रेक, म्हणाला- ‘आई आणि मुलांसोबत वेळ घालवायचा आहे’ (Aamir Khan to Take a Break From Acting, Says ‘I Want to Be With My Family, Mom, Kids’)

काही महिन्यापूर्वीच आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या त्याच्या प्रॉड्क्शन अंतर्गत रिलीज झालेल्या सिनेमात दिसला होता. या सिनेमाच्या माध्यमातून आमिरनं तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. पण सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लगोलग लाल सिंग चड्ढाच्या बॉयकॉटची मागणी सुरू झाल्याचं समोर आलं होतं. या सगळ्यात आमिरने जितके पैसे सिनेमावर खर्च केले होते अगदी तितकेही त्याला वसूल करता आले नाहीत.

आता ‘लालसिंग चड्ढा’च्या अपयशानंतर  बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानला कोणतीही रिस्क घ्यायची नाही आणि म्हणूनच त्याने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला असून तसे त्याने स्वतःच  जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान खुद्द आमिर खाननेच आपण चित्रपटांमधून ब्रेक घेत असल्याचे उघड केले आहे. तो म्हणतो की, तो यापुढे अभिनय करणार नाही. अभिनयातून ब्रेक घेऊन त्याला कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवायचा आहे.

लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर काहीच दिवसांत बातमी समोर आली होती की २००८ मध्ये आलेल्या ‘चॅम्पियन्स’ या स्पॅनिश सिनेमाच्या हिंदी रीमेकचे हक्क आमिरने विकत घेतले आहेत. लाल सिंग चड्ढा देखील हॉलीवूड सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ चा हिंदी रीमेक होता. पण लोकांनी लाल सिंग चड्ढा हून अधिक फॉरेस्ट गम्प उत्तम होता अशा प्रतिक्रिया तेव्हा नोंदवल्या.

नेटकऱ्यांचे म्हणणे होते की आमिरनं ‘फॉरेस्ट गम्प’ सारखा सिनेमा हिंदीत बनवून त्या कलाकृतीचा दर्जाच घालवला. लाल सिंग चड्ढा नंतर आमिर ‘चॅम्पियन्स’ मध्ये अभिनय करणार होता. पण आता त्यानं आपला निर्णय बदलला आहे. आमिर खान काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील एका कार्यक्रमात उपस्थित होता. तिथे त्याने ‘चॅम्पियन्स’ विषयी मोठी माहिती शेअर केली आहे. आमिरने म्हटलं की, तो या सिनेमात अभिनय करणार नाही तर या सिनेमाची फक्त निर्मिती तो करणार आहे.

आमिर म्हणाला,”जेव्हा मी अभिनय करत असतो तेव्हा मी सिनेमात इतका खोलवर स्वतःला नेतो की त्यावेळी मला माझ्या आयुष्यातील कुठलीच दुसरी गोष्ट महत्त्वाची वाटत नाही. लाल सिंग चड्ढानंतर चॅम्पियन्स सिनेमाचा रीमेक करणार होतो. याची स्क्रिप्ट खूपच उत्तम आहे. लोकांच्या मनाला स्पर्श करणारं याचं कथानक आहे. पण मला वाटतं मला आता ब्रेक घ्यायला हवा. मला आता माझी आई आणि मुलांसोबत वेळ घालवायला हवा. गेल्या ३५ वर्षांपासून काम करतोय. त्या काळात मी माझ्या कामावर फोकस केलं. आणि यामुळे मी माझ्या जवळच्यांपासून खूप दूर गेलो. आणि हे माझ्यासाठी फार योग्य नव्हतं, नाहीय. मला आता माझं आयु्ष्य वेगळ्या पद्धतीनं जगायचं आहे”.

आमिर पुढे म्हणाला,”मी चॅम्पियन्स सिनेमाची निर्मिती करणार आहे, अभिनय नाही. मला सिनेमावर, त्याच्या कथानकावर विश्वास आहे. आता मी इतर अभिनेत्यांशी या सिनेमा संदर्भात संपर्क करेन आणि पाहिन की कोण कोणत्या भूमिकेसाठी फीट राहिल. आता मी आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर आहे जिथे मला माझ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे”. पण आमिरच्या या वक्तव्यानं त्याचे चाहते नाराज होणार हे मात्र निश्चित.