१५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खान आणि किरण...

१५ वर्षांच्या सुखी संसारानंतर आमिर खान आणि किरण राव झाले विभक्त (Aamir Khan And His Second Wife Kiran Rao Announce Divorce After 15 Year Of Married Life )

बॉलिवूड अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत. या दोघांनी अधिकृतरित्या एक निवेदन जारी करत या निर्णयाविषयी माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने, आपण एकमेकांच्या सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे.

आमिर खान आणि किरण राव यांचे पत्र

आमिर खान आणि किरण राव यांनी जाहीर केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की, ”१५ वर्षाच्या सुंदर सोबतीमध्ये आयुष्यभर स्मरणात राहणारे अनुभव जगता आले. आनंद, हास्य आणि आमचं नातं हे विश्वास, आदर आणि प्रेम याच्या आधारावर फुलले. आता आम्ही आमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता हा निर्णय झाल्यामुळं बरं वाटत आहे. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून दोघंही एकत्रितपणानं त्याचा उत्तमपणे सांभाळ करू. आम्ही वेगळं राहिलो तरी आयुष्यातील महत्त्वाच्या घटना शेअर करत राहू.”

आमच्या नात्यामध्ये हे घडत असताना आमचे कुटुंबिय आणि मित्रांनी सातत्यानं पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलो नसतो. आमचे शुभचिंतक आम्हाला या निर्णयाबद्दल शुभेच्छा देतील अशी आशा आहे. हा घटस्फोट म्हणजे काही शेवट नाही. नवीन प्रवासाची सुरुवात आहे, असे संयुक्त पत्र आमिर खान आणि किरण राव यांनी लिहिले आहे.

‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने आझादचा जन्म झाला होता.

किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी २००२ सालामध्ये आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयला आणि जुनेद ही दोन मुलं आहेत.

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी अमिरच्या साथीने किरण राव यांचं मोठं काम

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी आमिर खान यांच्याबरोबर किरण राव शेताच्या बांधावर गेल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे त्यांनी पालथे घातले. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं. यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्यांची वेळोवेळी स्तुती केली. त्यांना भक्कम पाठिंबा दिला. किरण राव आणि आमीर खान या दोघांनी कित्येक गावांमध्ये पाण्याच्या रूपाने नवसंजीवनी आणली. जिथं गेली अनेक दशकं माळरान होतं तिथं हिरवी स्वप्न फुलवली. आमिर खान, किरण राव आणि संपूर्ण पाणी फाउंडेशनच्या टीमने महाराष्ट्रातला दुष्काळ हटवण्यासाठी मोठं काम केलं.

Photo Courtesy: Instagram (All Photos)