‘आई कुठे काय करते’ मधील अनघाची भूमि...

‘आई कुठे काय करते’ मधील अनघाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या वडिलांचे करोनाने निधन (Aai Kuthe Kay Karte Actress Ashwini Mahangade Lost Her Father Due To Corona)

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका करणाऱ्या अश्विनी महांगडे हिच्या वडिलांचे छत्र हरपले. करोनाशी झुंज देत प्रदीपकुमार महांगडे यांचे त्यांच्या गावी दुःखद निधन झाले. ‘माझा आधारवड हरपला’, म्हणत अश्विनीने आपले दुःख व्यक्त केले आहे.

”गेले १५ दिवस ते करोनाशी वाघासारखे लढले, पण ही झुंज अपयशी ठरली. काळाने घाला घातला व आम्हाला पोरके केले. मात्र जाता जाता ते आम्हाला सांगून गेले की, समाजासाठी काही केले नाही, तर आपले आयुष्य निरर्थक आहे,” अशी पोस्ट अश्विनीने दिली आहे.

विशेष म्हणजे वडिलांची ही शिकवण अश्विनी आधीपासूनच पाळते आहे. ती आपल्या गावात रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान ही संस्था चालविते. या संस्थेची ती संस्थापक असून तिच्यामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम चालविले जातात. करोनाग्रस्त रुग्णांना व त्यांच्या निराधार नातेवाईकांना विनामूल्य जेवणाची व्यवस्था अश्विनी करते. अन्‌ तिच्यावरच आपले लाडके पिता करोनाने गमावण्याचा दुर्धर प्रसंग ओढवला आहे.

प्रदीपकुमार महांगडे चांगले शेतकरी होते व वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी नाट्यक्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. त्यांना नाना म्हणत. संगीत नाटक ते लोकनाट्याचे प्रयोग नानांनी गावोगावी जाऊन केले होते. चार नाटकांचे लेखनही त्यांनी केले आहे. स्वतः उत्तम, धडपडे रंगकर्मी असल्याने नानांनी आपली मुलगी अश्विनी हिला अभिनय क्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. म्हणूनच माझ्या यशाचे गुपित, माझ लढण्याचे बळ, माझे मार्गदर्शक, माझा पाठीराखा, माझा बापमाणूस अशा शब्दात अश्विनीने त्यांचे वर्णन केले आहे.