शिक्षक ते अभिनेता : रघुचा प्रवास (A Teacher Who...

शिक्षक ते अभिनेता : रघुचा प्रवास (A Teacher Who Became Actor)

‘रघु फक्त एकदाच सांगतो, नाहीतर सरळ उलटा टांगतो,’ हे ब्रीदवाक्य बोलणारा रघु हा ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेतून लोकप्रिय झाला आहे. मनमौजी जीवन जगणारं हे रघुचं पात्र संचित चौधरी साकार करतो आहे. संचित याआधी ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या स्टार प्रवाहवरील मालिकेमध्ये दुहेरी व्यक्तीरेखा साकारून प्रेक्षकप्रिय झालेला आहे.
या संचितचा अभिनेता म्हणून झालेला जीवनप्रवास रोमांचक आहे. तो नागपूरचा आहे. त्याचे वडील शिक्षकी पेशात आहेत, त्यामुळे साहजिकच संचितनेही हाच पेशा घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा मान राखून संचितने सायकॉलॉजी घेऊन एम. ए. ची पदवी मिळवली. अन्‌ पुढे सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी देखील केली. मात्र त्याला लहानपणापासून अभिनयाची आवड होती, म्हणून दहावीची परीक्षा पास झाल्यावर त्याने नागपुरातील ‘रंगरसिया’ थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर राज्य नाट्यस्पर्धा, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक अशा स्पर्धांमधून एकांकिकांमधून अभिनयाची पायाभरणी केली. त्यातून तो मुंबईस आला अन्‌ पृथ्वी थिएटरमध्ये हिंदी नाटकांमधून अभिनय केला. त्याने डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केले.

शिक्षकाची नोकरी करता करता त्याने या अभिनय क्षेत्रात मुशाफिरी केली. त्यामुळे त्याचे खिसे भरत होते, पण मन भरत नव्हतं. अभिनयाचा ओढा स्वस्थ बसू देईना. तेव्हा त्याने नोकरी सोडून पूर्णपणे अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला सुरुवातीला घरातून विरोध झाला, पण त्याच्या मनाचा विचार करून वडिलांनी साथ दिली. आता त्याच्या घरातील लोक खुश आहेत अन्‌ त्याची ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ मध्ये लोकप्रियतेची कारकीर्द सुरू झाली आहे.