मक्तेदारी झिडकारून तिनं हाती घेतला वस्तरा, पुरु...

मक्तेदारी झिडकारून तिनं हाती घेतला वस्तरा, पुरुषांचे मुंडन करणार्‍या वैशालीची जिद्द (A Rural Woman Takes Daring Step To Tonsure Men Heads)

-दादासाहेब येंधे
सुरुवातीला नारळ विक्री, सुपारीचं दुकान, पूजेच्या कपड्यांचे दुकान सुरू करून तिने स्वतःचा उदरनिर्वाह केला. पण, तुटपुंजे उत्पन्न आणि वाढते खर्च यामुळे ती वैतागली. तिने भावाला विचारले की, आपल्या कुटुंबाच्या केश कर्तनालयाच्या दुकानात काम करू का?
सलून म्हटलं की महिला तिथं जात नाहीत. मोठ्या शहरात जुन्या पारंपरिक वळणाच्या सलूनच्या जागी आता यूनिसेक्स सलून उभे राहू लागले आहेत. त्यात महिलाही दिसून येतात. पण, छोट्या शहरात खेड्यापाड्यात ही गोष्ट अशक्यच. त्यातही एखाद्या महिलेकडे पुरुष केस कापून घ्यायला, टक्कल करायला येत असतील तर यावर विश्वास ठेवणं म्हणजे जरा जडच… मात्र, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मात्र हिमतीने एका वेगळ्या वाटेने चालणारी महिला आहे. त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंड परिसरात दिसून येतात त्या वैशाली मोरे. धार्मिक विधीसाठी तीर्थक्षेत्री आलेले अनेक पुरुष तिच्याकडून मुंडन करून घेतात आणि तीदेखील आपलं काम अत्यंत आत्मविश्वासाने आणि हिमतीने पार पाडते. जुन्या रूढी आणि परंपरांना वैशालीने मोडून काढलंय. तिच्याकडून दररोज 50 ते 70 जण मुंडन करून घेतात.
वैशाली सकाळीच आपल्या दुकानात हजर होते. तिथे मुंडन करून घेण्यासाठी पुरुष थांबलेले असतात. कुठेही वस्तरा न लागता, न खरचटता अगदी सफाईदारपणे ती तिचे काम करते. गुळगुळीत डोक्यावर हात फिरवत, अंगावर पडलेले केस झटकून टाकत एक एक जण पैसे देऊन निघून जातो. गरज असेल तसे कधी कधी दिवसभर तर कधी सकाळ, दुपारच्या वेळेत हे तिचे काम चालते. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्री, तेही धार्मिक क्षेत्र असलेल्या छोट्या गावात शांततेने पण तितकेच कणखरपणे वैशाली आपले काम चोख बजावत आहे. पण, पुरुष जे काम करतात ते तू कसं करू सुरू केलं असं विचारलं तर वैशाली तिची गोष्ट सांगते.
आर्थिक जबाबदारीने पिचलेली असताना जीवनाशी दोन हात करताना, मनाला मारत 2017 पासून वैशालीने वस्तरा हातात घेतला. पतीशी विभक्त झाल्यावर वैशाली त्रंबकेश्वरला आली. पदरात लहान मुलगी होती. सुरुवातीची दोन वर्षं तर तिनं घरातच काढली. मात्र, आता आयुष्याची लढाई लढायची आहे, किती दिवस असेच घरात बसणार असा प्रश्न तिने आईला विचारला आणि तिला घराबाहेर पडून काम करण्याची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला नारळ विक्री, सुपारीचं दुकान, पूजेच्या कपड्यांचे दुकान सुरू करून तिने स्वतःचा उदरनिर्वाह केला. पण, तुटपुंजे उत्पन्न आणि वाढते खर्च यामुळे ती वैतागली. तिने भावाला विचारले की, आपल्या कुटुंबाच्या केश कर्तनालयाच्या दुकानात काम करू का?
बहीण गमतीने म्हणत असेल असे वाटून भावाने विषय हसण्यावारी नेला. पण, काही दिवसानंतर तिचा सतत पाठपुरावा सुरू राहिला. एक दिवस तिने तू शिकवतो की, बाहेरच्या दुसर्‍या कोणाकडून शिकू! असे आपल्या भावाला विचारले. बहिणीचा निर्धार पाहून रात्री दुकान बंद करण्याच्या वेळी भावाने तिला, ’तू माझेच मुंडन कर’ असा आदेश दिला. वास्तविक लहानपणापासून हे काम पाहत आलेली वैशाली तेव्हा मात्र थरथर कापू लागली. घाबरतच तिने वस्तरा फिरवायला सुरुवात केली. मात्र, भावाला कुठलीही जखम होऊ न देता तिने त्याचं योग्य प्रकारे मुंडन केले. त्यानंतर महिनाभरात वैशालीने भावाच्या डोक्याचं सतत मुंडन करून चांगला सराव करून घेतला. लहान-लहान केस उगवायला लागले की, ती दोन-तीन दिवसानंतर भावाच्या डोक्यावरून वस्तरा फिरवायची. आई-वडील भाऊ-बहीण अशा सगळ्यांनी मग तिला पाठिंबा दिला.
त्यानंतर एक दिवस सकाळी ती दुकानात गेली आणि तेव्हाच काशीचे ब्राह्मण आजोबा मुंडन करून घेण्यासाठी आले होते. भावाने त्यांना, ’ही माझी बहिण असून तिने तुमचे मुंडन केले तर चालेल का?’ असा प्रश्न केला. आजोबांनी हसतमुखाने होकार दिला. त्यांना नमस्कार करून वैशालीने मुंडन करण्यास सुरुवात केली. अगदी सफाईदारपणे तिने त्या आजोबांचे मुंडन केले. आजोबांनी वैशालीला भरभरून आशीर्वाद दिले. त्यानंतर वैशाली आजपर्यंत कधीच थांबली नाही. तिचं काम सुरु झाले तेव्हा भाविक, पर्यटक, गावकरी तिचे काम बघायला जमत होते. मात्र, कोणालाही न घाबरता, न लाजता तिने आपले काम चालू ठेवले.
वैशालीच्या मुलीने एलएलबी पूर्ण केले असून लवकरच आपली मुलगी वकील होणार आहे, त्याचा वैशालीला आनंद आहे. वैशाली उत्तम पोहते. त्र्यंबकला झालेल्या मागील दोन्ही कुंभमेळ्यावेळी तिने कुशावर्तावर जीवरक्षक म्हणून सेवादेखील बजावली आहे. अनेकांचे जीव वाचवले आहेत. पोलीस मित्र म्हणून देखील तिने काम केले आहे. महिला दक्षता समिती सदस्य म्हणून देखील ती काम करते. वैशालीला आजवर अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी वैशालीनं वस्तरा हाती घेतला असला तरी वैशालीने अनेक जुन्या रुढी, परंपरांनादेखील वस्तरा लावला आहे, असे या निमित्ताने म्हटल्यास वावगे ठरू नये.