महिला दिन विशेष – संकटावर मात केलेली फ्रू...

महिला दिन विशेष – संकटावर मात केलेली फ्रूटवाली मावशी (A Poor Lady Settles As Most Popular Fruit Seller Despite Hardships In Life)

18 व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे 7 बेटांना जोडून बॉम्बे नावाचं एक शहर निर्माण करण्यात आलं.  
पुढे 19 व्या शतकात या शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली. 1995 मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचं नाव अधिकृतपणे मुंबई असं करण्यात आलं. याच मुंबई शहराची लोकसंख्या साधारणपणे तीन कोटी 29 लाख झाली आहे. आपल्या संपूर्ण भारत देशामधील मुंबई हे शहर धावतं शहर म्हणून ओळखलं जातं. मुंबई म्हटलं की अनेकांना दिसते ती लोकल, भरगच्च ट्राफिक, चौपाटी आणि गेट वे ऑफ इंडिया…
अशा या सध्याच्या धावत्या नगरीमध्ये 1982 साली लक्ष्मीबाई मुरलीधर घुगे आणि मुरलीधर भाऊराव घुगे या दाम्पत्यांनी प्रवेश केला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमोन गावचे हे मूळ रहिवासी. एक जोडी कपड्यावर पोटापाण्यासाठी इथे आले. मुंबई गाठली पण पुढे सर्व कसं होणार हा मोठा प्रश्न उपस्थित राहिला होता.

लक्ष्मीबाईंचा हातभार
मुरलीधर घुगे हे व्यवसायानं हमाली करत असत. परंतु हलाखीची परिस्थिती आणि पुढे मुलांचं आयुष्य, त्यांचं पालनपोषण, शिक्षण कसं होणार म्हणून लक्ष्मीबाई यांनी देखील त्यांना हातभार लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुंबई सेंट्रल येथील ऑफिसरच्या घरी काम करून तिथे राहण्याची सोय केली. पुढे छोटसं घर घेऊन 10 बाय 10च्या घरात राहून 40-50 लोकांची खानावळ सुरू करून पैसे मिळवले.
पुढे लक्ष्मीबाई यांनी स्वतः फळ व्यवसाय करण्याचे ठरवले. दक्षिण मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बाजारपेठेपैकी असलेली बाजारपेठ म्हणजे क्रॉफर्ड मार्केट म्हणजेच अधिकृतपणे महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथून रोज फळं विकत घेऊन वाळकेश्‍वर परिसरात घरोघरी जाऊन त्या विकत असत. हे सर्व रोज करत असताना अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागत होतं. पण म्हणतात ना एखाद्या महिलेनं ठरवलं की ती सर्व संकटावर मात करतेच. असंच काहीसं लक्ष्मीबाई यांच्या बाबतीत देखील दिसून आलं.

घरोघरी फळ विक्री
1984 च्या काळात बहुतांश स्त्रिया या चूल आणि मूल इतक्यातच गुंतलेल्या होत्या, परंतु यांचा दिनक्रम हा इतर महिलांपेक्षा खूप वेगळा होता. पहाटे सर्व कामं आवरून 5-6 दरम्यानची लवकरची बस पकडून त्या मार्केटला जाऊन फळं विकत घेत असत. मार्केट म्हटलं की तिथं सर्व जात-धर्म-पंथ-भाषा अशा लोकांचा वावर असतोच. या सर्वांमध्ये जाऊन योग्य आणि उत्कृष्ट फळं निवडणं तेव्हाच्या काळात खूप जोखमीचं काम होतं. आणि मंडई म्हटलं की तिथे पुरुष वर्गाचा सहभाग हा बहुतांश जास्त असे. तेथून कमीत कमी 15-20 किलोची वेगवेगळी फळं घेऊन त्या घरोघरी जाऊन विकत असत.
लक्ष्मीबाई घुगे यांच्या नणंद सावित्रीबाई आघाव या आधी हा व्यवसाय करत असल्यामुळे थोड्या ओळखी त्यांच्यामार्फत झाल्या होत्या आणि अनेक गिर्‍हाईक त्यांना मिळाले होते. वाळकेश्‍वर परिसरात सर्व हाय प्रोफाईल लोकांचा सहभाग आहे. त्यांच्या मनात घर निर्माण करणं हे खूपच कठीण होतं. परंतु ते देखील शक्य झालंच. एकामागून एक अनेक गिर्‍हाइकं लक्ष्मीबाई यांना मिळत गेली.

संकटावर मात
लक्ष्मीबाई यांचे पहिले गिर्‍हाईक म्हणजे रूपांनी शिंदी नावाची व्यक्ती होती. त्यानंतर नलिनी दलाल आणि कांतीलाल दलाल यांच्या मार्फत वाळकेश्‍वरमधील शीतलबाग परिसरातील गार्डनमध्ये फळं ठेवण्यास त्यांना एक जागा मिळाली. त्यावेळी तिथे लक्ष्मीबाई यांची राजेश्याम झूनझूनवाला यांच्याशी ओळख झाली.  राजेश्याम झूनझूनवाला म्हणजेच सध्याचं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व राकेश झूनझूनवाला आणि राजू झूनझूनवाला यांचे ते वडील होते. राजेश्याम झूनझूनवाला यांनी वेळोवेळी लक्ष्मीबाई यांना मदतीचा हात पुढे केला आहे. झूनझूनवाला कुटुंबाच्या मदतीने लक्ष्मीबाई यांनी अनेक संकटावर मात केली आहे.
मे महिना आला की आंबा ही त्यांची स्पेशालिटी आहे. अजूनही त्यांच्याकडून आंबे घेऊन अमेरिका, दुबई अशा परदेशात, अनेक ठिकाणी पाठवले जातात. तसेच 19 व्या शतकात लक्ष्मीबाई यांच्याकडून सध्याचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ हे देखील फळे घेत होते.

फळ व्यवसाय करून त्यांनी लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात घर निर्माण केलं आहे. संपूर्ण वाळकेश्‍वर परिसरात फ्रूटवाली मावशी म्हणून त्यांची सध्याची ओळख आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी अनेक कठीण प्रसंग पाहिले पण, सर्वावर मात करून त्यांनी नातवंडांचं शिक्षण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. त्यांच्या या मेहनतीला सलाम…!!!
-गायत्री सरला दिनेश घुगे