‘मी पुन्हा येईन’ : राजकीय भूकंपाचे चित्रण करणार...

‘मी पुन्हा येईन’ : राजकीय भूकंपाचे चित्रण करणारी नवी वेब सिरीज लवकरच येणार ( A New Web Series , Based On Current Developments In Maharashtra Politics To Appear On OTT Platform)

महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. राजकारणाच्या इतिहासात इतक्या अनपेक्षित गोष्टी या पहिल्यांदाच घडल्या आहेत. सध्याचे चालू असलेले राजकारण हे एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. याच राजकारणावर आता एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही वर्षांत मी पुन्हा येईन हे विधान खूप गाजलं. आता हेच विधान शिर्षक म्हणून घेत प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेब सीरिज घेऊन येत आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून या सीरिजमध्ये अभिनेता भारत गणेशपुरे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, सिद्धार्थ जाधव, प्रभाकर मोरे, अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिका जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

या वेब सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे लेखक अरविंद जगताप यांनी ही सीरिज लिहिली आहे आणि दिग्दर्शित केली आहे. अरविंद जगताप यांच्या लेखनाचे असंख्य चाहते आहेत. त्याच्या रुपात ओटीटी विश्वाला आणखी एक सक्षम लेखक मिळणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.

या वेब सीरिजचा टीझर साधारण सध्याच्या राजकारणातील घडमोडींशी मिळता जुळता आहे. मारामारी, पळवा पळवी या सर्व गोष्टींसोबतच शासकीय यंत्रणांचा केला जाणारा गैरवापर या टिझरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

 “सध्याच्या राजकीय घडामोडींचा आणि या सीरीजचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, पण, सिनेमात किंवा वेबसीरीजमध्ये तेच पाहायला मिळतं जे आपल्या आजुबाजूला घडतं. त्यामुळे अगदीच असत्य घटनांवर आधारित ही वेबसीरीज असली तरी, राजकीय कुलंगड्या, शह-काटशह हे पाहण्यात प्रेक्षकांना रस असतो हे स्पष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच गरज ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरीज पूर्ण करेल” असे वक्तव्य  प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी या सिरीजबद्दल केले.