साईभक्त नायकावर चित्रित झालेले ‘साई तुझं ...

साईभक्त नायकावर चित्रित झालेले ‘साई तुझं लेकरू’ हे धम्माल गाणे प्रदर्शित (A New Song Picturised On The Marathi Film Young Hero, Who Is Hard Core Devotee Of Saibaba, Is Released)

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम ‘टाइमपास ३’ मध्येही पाहायला मिळणार आहे. ‘साई तुझं लेकरू’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत. या गाण्यात भाऊ कदम म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचे सांगत आहेत. दगडूवर तुमची कृपा कायम अशीच राहू दे, असेही ते सांगत आहेत.

हे गाणे भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले असून या गाण्याला अमितराज आणि आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गाण्याला अमितराज यांनीच संगीतबद्धही केले आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांचं  नृत्यदिग्दर्शन आहे.

यापूर्वीही पहिल्या आणि दुसऱ्या भागातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ‘टाइमपास ३’मधील गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर अशीच रुळतील. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास ३’ चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून यात दगडूच्या आयुष्यात आलेली ‘पालवी’ पाहायला मिळणार आहे. या पालवीची भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. ‘टाइमपास ३’ हा चित्रपट २९ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.