विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या चरित्...

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय ! (A new chapter of Balumama’s divine power will begin on the auspicious occasion of Vijayadashami)

महाराष्ट्र ही संताची भूमी. महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक थोर संत होऊन गेले, त्यातलेच एक महत्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणचं खूप मोठं कार्य केलं. कलर्स मराठीवर दोन वर्षांआधी सुरू झालेली “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही बाळूमामांचा महिमा दाखवणारी मालिका संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड गाजते आहे. येत्या विजयादशमीपासून बाळूमामांच्या चरित्राचा उत्तरार्धाचा प्रवास सुरू होणार आहे.

Balumama, Vijayadashami

या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली, पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी देखील आपल्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले. बाळूमामांच्या त्या रूपालादेखील संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना घडला. अवघा महाराष्ट्र या जयघोषाने दुमदुमला आणि आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या चरित्राचा नवा अध्याय आणखी रंजक स्वरुपात पहायला मिळणार आहे.

Balumama, Vijayadashami

बाळूमामांचा उत्तरार्ध देखील तरुणपणाप्रमाणे रानोमाळ फिरण्यात गेला. परंतु, तोपर्यंत बाळूमामा हे नाव सगळ्यांना परिचित झालं होतं. अनेक माणसं त्यांच्यासोबत जोडली गेली होती. हा काळ स्वातंत्रानंतरचा होता. बाळूमामा हे सर्वदूर परिचित जरी झालं असलं तरी त्यांचा संघर्ष काही कमी झाला नव्हता. समाजात जात–पात, अंधश्रद्धा, भेदाभेद ह्या गोष्टी काही संपलेल्या नव्हत्या. हा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे. त्यामुळे एक मोठ्या बदलाचा काळ त्यांनी पाहिला. लोकांना तेंव्हा एका मोठ्या आधाराची गरज होती, त्यावेळी मामा एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखे सावली देणारे ठरले. बाळूमामांचं हेच कार्य विजयादशमीपासून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Balumama, Vijayadashami

यानिमित्ताने बोलताना मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, “भक्तांच्या मनात वृद्ध बाळूमामांची प्रतिमा कोरलेली आहे! बाल, तरुण बाळू मामा प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर वृद्ध बाळू मामाचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. मामांच्या चरित्रात उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे. संत परंपरेत अहोरात्र कार्य करणाऱ्या मामाचं कार्य ह्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे.”