कामवाली बाई झाली विक्रमी पुस्तकाची लेखिका (A Ma...

कामवाली बाई झाली विक्रमी पुस्तकाची लेखिका (A Maid Servant Rises To Best Seller Writer)

‘आलो आंधारि’ हे आत्मकथन म्हणजे घरकाम करणार्‍या बाईची आत्मकथा आहे. पण ही आत्मकथा म्हणजे रडकथा अथवा लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेलं लेखनही नाहीये, तर एका घरकाम करणार्‍या बेबीतून लेखिका बेबी हालदारचा जन्म कसा झाला, हा जीवनप्रवास या आत्मकथनात उलगडला आहे.
ऊन-पावसाच्या खेळात मधूनच खुलणारं इंद्रधनुष्य हे श्रावणातील निसर्गाचं रूप प्रत्येकालाच भावतं. मी जेव्हा-जेव्हा श्रावणातलं हे निसर्गचित्र पाहते, तेव्हा तेव्हा या ऊन-पावसाच्या खेळाचं मला मानवी जीवनाशी जवळचं नातं दिसतं. मानवी जीवनातही सुख-दुःखांचा खेळ असाच चालू असतो. आणि या सुख-दुःखाच्या खेळात ज्याला आपल्या आयुष्यात सप्तरंगी इंद्रधनुष्य खुलवता येतं, त्याचासारखा भाग्यवान तोच असतो. अशीच एक भाग्यशाली व्यक्ती मला भेटली, बंगाली लेखिका बेबी हालदार यांच्या ’आलो आंधारि‘ या आत्मकथनात.

घरकाम करणारी बेबी ते लेखिका बेबी हालदार
‘आलो आंधारि’ हे आत्मकथन म्हणजे घरकाम करणार्‍या बाईची आत्मकथा आहे. पण ही आत्मकथा म्हणजे रडकथा अथवा लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी केलेलं लेखनही नाहीये, तर एका घरकाम करणार्‍या बेबीतून लेखिका बेबी हालदारचा जन्म कसा झाला, हा जीवनप्रवास या आत्मकथनात उलगडला आहे.
‘आलो आंधारि’ हे पुस्तक मुळात बंगाली भाषेत आहे. प्रबोध कुमार यांनी ते हिंदीत अनुवादित केलं आणि मृणालिनी गडकरी यांनी मराठी भाषेत या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. आत्तापर्यंत हे आत्मकथन 13 विदेशी भाषा व 21 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झालं आहे. ‘आलो आंधारि’ हा मुळात बंगाली शब्द आहे. या शब्दाचे दोन अर्थ आहेत. उजेड आणि अंधार यांचं मिश्रण हा पहिला अर्थ. अन् काही स्पष्ट होतं आहे तर काही अस्पष्टच राहून गेलंय हा या शब्दाचा दुसरा अर्थ.

जाणिवा समृद्ध करण्याची अनुभूती
‘आलो आंधारि‘ या आत्मकथनाची कथा ही काहीशी अशी आहे. बेबीचे वडील सैन्यात असल्याने जम्मू-काश्मीर मधल्या कुठल्याशा गावात तिचा जन्म आहे. आई-वडिलांमध्ये सतत भांडणं असायची. एके दिवशी हे भांडण इतकं विकापोला गेलं की तिची आई घर सोडून गेली ती कायमचीच. बेबीच्या वडिलांनी त्यानंतर दोन लग्नं केली. पण बेबीच्या वाट्याला आई-वडिलांची माया कधीच आली नाही. घरात खायला धड अन्नही नसायचं. बेबी खर्‍या अर्थाने रमायची ती शाळेत. ती सातवीपर्यंत शिक्षण घेते पण वडिलांच्या मनात येते आणि ते बेबीचं लग्न लावून देतात. तेही तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या एका मुलाशी. तिथून बेबीचं आयुष्य अजूनच दलदलीत फसल्याप्रमाणे होतं. नवर्‍याकडून होणारी मारझोड, भावभावनांचा विचार न करता ठेवले गेलेले शारीरिक संबंध, 13व्या – 14व्या वर्षी झालेली मुलं. असे अनेक बिकट प्रसंग बेबीच्या आयुष्यात येतात. पण या सगळ्या दलदलीतून बेबी कशी बाहेर पडते आणि आपलं सुंदर आयुष्य निर्माण करते, याची आत्मकथा वाचणं म्हणजे आपल्या जाणिवा समृद्ध करणारी अनुभूती आहे.
या आत्मकथनातील बेबी आपल्याला भावते ती तिच्यातील आंतरिक गुणांमुळे व सामर्थ्यामुळे! एक संस्कृत श्‍लोक आहे –
     हंस श्‍वेतो को भेदो बकहंसयो
     नीरक्षीरविवेक तु हंसः हंसो बको बकः
या श्‍लोकाचा अर्थ असा आहे की, हंस आणि बगळा या दोघांचा रंग पांढरा शुभ्र आहे. पण ते एकमेकांपासून वेगळे ठरतात ते त्यांच्यात असलेल्या गुणांमुळे. दूध आणि पाण्याचं मिश्रण या दोघांच्या पुढ्यात ठेवलं तर हंस हा पक्षी दूध व पाणी वेगळं काढू शकतो. पण बगळा हा पक्षी हे मिश्रण वेगळं करू शकत नाही. या गुणामुळे हंस या पक्ष्याचं श्रेष्ठत्व ठरतं. याचाच अर्थ असा की कोणत्याही माणसाचं श्रेष्ठत्व हे त्याच्या बाह्यरूपामुळे ठरत नाही तर ते त्याच्या आंतरिक गुणांमुळे ठरतं.

बेबीही अशीच आहे. वरवर पाहता कामवाली असणारी बेबी उजवी ठरते ती तिच्या गुणांमुळे. वाईट परिस्थितीतही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं, धैर्यशीलता, आपलं प्रत्येक काम सेवाभावी वृत्तीने मनापासून करणं, तिचा माणसाच्या चांगुलपणावरचा विश्वास, निर्व्याज प्रेम करण्याची वृत्ती या गुणांमुळे बेबी आपल्याला भावते. या बेबीच्या आयुष्यात अपमानाचे, वाईट प्रसंग अनेक येतात. तिची आपली माणसंही तिच्याशी अत्यंत वाईट वागतात. पण तिच्या स्वभावात जराही कटूता येत नाही. ती तिच्या मनाचा चांगुलपणा व प्रेमळपणा शेवटपर्यंत जपते. तिच्या या स्वभावामुळेच घरकाम करण्यासाठी घरोघरी जात असताना तिला एके ठिकाणी भेटतात तिचे तातुश म्हणजेच प्रबोध कुमार.
प्रबोध कुमारांनी बेबीला लिहितं केलं
बेबीच्या या गुणांमुळे त्यांना तिच्याबद्दल आशा वाटू लागते. ते तिला पोटच्या मुलीप्रमाणे माया करतात. तिला तस्लिमा नसरीन यांचं मआमार मायेबेलाफ वाचायला देतात व लिहायला प्रवृत्तही करतात. आपण लिहू शकतो असा एक आत्मविश्वास ते बेबीला देतात आणि यातूनच जन्माला येते लेखिका बेबी हालदार! या पुस्तकाच्या प्रस्तावनेत समीक्षक शंख घोष म्हणतात, आलो आंधारि ही बेबीची निर्मिती आहे, तर लेखिका बेबी हालदार ही तातुष म्हणजेच प्रबोध कुमारांची निर्मिती आहे. त्यांचं म्हणणं खरंच आहे. पण इथे एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे प्रबोध कुमारांनी बेबीला प्रोत्साहन दिलं, लिहितं केलं. तरीही बेबीमध्ये असणार्‍या क्षमता अव्हेरून चालणार नाहीत.
मनाला भिडणारं लेखन
बेबीचं शिक्षण सातवीपर्यंतच झालेलं होतं. तिची लेखनशैली मात्र सुंदर आहे. अकृत्रिम, साध्या सरळ भाषेत केलेलं लेखन परिणामकारक व सुंदर आहे. ‘तिथं (डलहौसीला) बर्फ पडायचं ते मधमाश्यांसारखं गिरगिरत.’ अशी नावीन्यपूर्ण उपमा ती सहजतेने आत्मकथनात वापरते. या पुस्तकाच्या मनोगतात मृणालिनी गडकरी म्हणतात, ‘बेबीचा शब्दसंग्रह अगदी बेताचाच आहे. पण फार मोठ्या किंवा वेगळ्या शब्दांची तिला गरजच भासत नाही. उलट एखाद्या घटनेचं वर्णन करायला तिच्यापाशी नेमकेच शब्द असल्याने ती इकडे-तिकडे भरकटत नाही. त्यामुळे तिचं लेखन थेट आपल्या मनालाच जाऊन भिडतं.’
असं हे सहजसुंदर आत्मकथन वाचकांना काय देतं? तर एक विश्वास देतं की आज हा आपला नसेल. पण उद्या हा आपला आहे. फक्त त्यासाठी गरज आहे ती बेबीमधल्या वृत्तीची बेबीमधला चांगुलपणा, स्वतःवरचा विश्वास, स्वभावात कुठेही कटुता न आणता शेवटपर्यंत चांगुलपणावर तिने ठेवलेला विश्वास ही वृत्ती जर आपल्यात असेल तर नक्कीच आनंदी, वैभवशाली उद्या हा आपलाच आहे.

पुस्तकाचे नाव – आलो आंधारि
लेखिका – बेबी हालदार
मराठी अनुवाद – मृणालिनी गडकरी
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाउस
मूल्य – रुपये 160/-
अश्विनी शिंदे-भोईर