मुंबई पोलीस दलातील ‘मदर टेरेसा’ (A ...

मुंबई पोलीस दलातील ‘मदर टेरेसा’ (A Lady Cop Adopts 50 Children; Recognised As ‘Mother Teressa’ Of Mumbai Police)

पोलीस दलातील माणूस म्हटला की तो निष्ठुर आणि रुक्ष स्वभावाचा असला पाहिजे, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु या समजाला छेद देणारी एक महिला मुंबईच्या पोलीस दलात मौजुद आहे. ती अत्यंत कनवाळू आणि कर्तव्यनिष्ठ आहे. तिने माणुसकीचे जे दर्शन घडविले, त्यास तोड नाही.

रेहाना नासिर शेख बागवान असं या महिला पोलिसांचं नाव असून त्या पोलीस नाईक आहेत. २००० साली त्या मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाल्या. करोनाच्या साथीने असंख्य लोकांना दुःखाच्या खाईत लोटले. त्यांच्या मदतीला रेहाना धावून गेल्या आहेत. आपले प्रियजन गमावलेल्या सुमारे ५४ लोकांना त्यांनी, ऑक्सिजन, मास्क, इंजेक्शन्स्‌, रक्त, प्लाझमा यांची मदत स्वखर्चाने केली.

एवढंच करून ही दयावान पोलीस नाईक थांबली नाही तर, तिने रायगड जिल्ह्यातील वाजे तालुक्यात असलेल्या ज्ञानाई विद्यालय या शाळेतील ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. अन्‌ त्यांच्या १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांनी स्वतःला वचनबद्ध केले आहे. हे आदिवासी वर्गातील विद्यार्थी आहेत. ‘त्यांची पार्श्वभूमी अतिशय गरीबीची आहे. पायात चप्पलसुद्धा ते घालू शकत नाहीत. शिवाय त्यांची वर्तणूक चांगली आहे. आणि ते शिस्तबद्ध आहेत,’ असं रेहाना सांगतात.

विशेष म्हणजे या मुलांना वह्या-पुस्तके, युनिफॉर्म, पादत्राणे या वस्तुंची जी सुरुवातीला मदत केली. ती आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राखून ठेवलेले पैसे व ईदच्या सणाला शॉपिंग करण्यासाठी राखून ठेवलेल्या पैशांमधून त्यांनी केली. रेहाना यांचे हे औदार्य कौतुकास्पद आहे. त्यांचे पती देखील पोलीस दलात असून त्यांनीच आपल्या पत्नीचे ‘मदर टेरेसा’ असे कौतुक केले आहे. रेहाना यांचे वडील देखील पोलीस होते. ते सब-इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त झाले आहेत.

आजच्या काळात असा त्याग, असे औदार्य क्वचितच पाहायला मिळतं.

रेहाना यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला. अन्‌ सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

रेहाना या व्हॉलीबॉलपटू आहेत. शिवाय उत्तम ॲथलेट असून २०१७ साली श्रीलंकेत झालेल्या क्रीडा स्पर्धेत त्यांनी मुंबई पोलिसांचे प्रतिनिधीत्व केले होते. त्या स्पर्धेत रेहाना यांनी २ सुवर्ण आणि ५ रौप्य पदके पटकावली आहेत.