देशभक्तांच्या देशाची समग्र माहिती (A Journey To...

देशभक्तांच्या देशाची समग्र माहिती (A Journey To Japan : The Country Of Patriots)

पराकोटीचं देशप्रेम, नागरी शिस्त, तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगती, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेतलेला आणि केवळ आपल्याच भाषेत संवाद साधण्याबाबत आग्रही असलेला छोटासा देश आहे, जपान! या जपानबद्दल सर्वांना कुतूहल आहे, पण त्याची समग्र माहिती देणारी पुस्तके मराठीत फारच कमी आहेत. जी आहेत, ती प्रवासवर्णने आहेत. पण या जपानची समग्र माहिती देणारे ‘जपान : आठवणींचा कोलाज’ हे राजश्री चतुर्वेदी यांनी लिहिलेले पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे.
या पुस्तकात लेखिकेने जपानच्या आठवणी, जपानच्या वास्तव्यात आलेले अनुभव सादर केले आहेत. जपान आणि जपानी लोक यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी या पुस्तकात एकत्रित वाचायला मिळतात. जपानची संस्कृती, इतिहास आणि वर्तमान यांचा अतिशय सुंदर कोलाज राजश्री यांनी मांडला आहे. जपानची इतकी तपशीलवार माहिती अन्य कोणत्याही पुस्तकात दिली असेल असे वाटत नाही.
अस्सल अनुभव
या पुस्तकात जपानी लोक, त्यांचे राहणीमान, घरं, रेस्टॉरंट, खाद्यसंस्कृती, बागबगिचे, मंदिरे, दंतकथा, भाषा, लिपी, सामाजिक भान यांची अगदी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. ती किती वाचू नि किती नको, असे हे पुस्तक वाचताना होऊन जाते.जपानच्या वास्तव्यात घालविलेल्या दिवसातील लेखिकेचे हे अनुभव अस्सल उतरतात. एकूण हे सर्वच पुस्तक वाचनीय असले तरी ओकुरो हा स्नान सोहळा, चौपस्टीक्स वापरण्याचे
10 नियम, उरासेन पद्धतीच्या चहाची लज्जत – ज्यात चहा पिणे हा एक समारंभ असतो. अन् ही पद्धत जपानचा वारसा म्हणून जपली जाते. हे विषय मजेशीर वाटतात. त्याचप्रमाणे सुमो पहेलवानांची माहिती, किमोनो हा ड्रेस, साकुराचं फूल, फुजियामा : जपानमधील सर्वात उंच ज्वालामुखी पर्वत, काईझेन : काम करण्याची  विशिष्ट पद्धत, सर्वात सिद्ध बुद्ध मंदिरे, झेन संकल्पना हे विषय ज्ञानवर्धक आहेत. अणूहल्ल्यातून स्वतःला सावरणार्‍या जपानचे कटू सत्य डोळ्यात पाणी आणणारे आहे. तसेच लेखिकेला आवडलेल्या झेन कथा वाचनीय आहेत. जोडीला दिलेली छायाचित्रे पुस्तकाची शोभा वाढवतात.
लेखिकेच्या अनुभवांचा हा आकर्षक कोलाज आरतीदीपक यांनी शब्दबद्ध केला आहे. ‘माझ्या नजरेने पाहिलेले जपान तिला इतके स्पष्ट दिसलेले पाहून थक्क होण्याची वेळ माझी होती’, असा गुणगौरव लेखिकेने या शब्दांकनाबद्दल केला आहे. त्यांच्या उदार मनाची प्रचिती देणारी ही प्रशस्ती आहे.