बायकोच्या अति शिस्तीला वैतागलोय् (A Husband See...

बायकोच्या अति शिस्तीला वैतागलोय् (A Husband Seek Guidance To Get Ride Of Wife’s Discipline)

मी जे लिहितोय – सांगतोय त्याला समस्या किंवा प्रश्न म्हणायचे का, मला कळत नाही. माझी बायको राजपत्रित (गॅझेटेड) वरिष्ठ सरकारी अधिकारी आहे. कर्तृत्त्ववान आहे. तिला सरकारी क्वॉर्टर, गाडी, ड्रायव्हर, घरकामासाठी नोकर, हे सगळे मिळालेले आहे. कमी वयात तिने हे मिळविलेले आहे.
मी फ्री-लान्स लेखक-कवी आहे. टी.व्ही. मालिकांची टायटल सॉन्गज्, संवाद मी लिहितो. अधूनमधून छोटेमोठे रोलही करतो. जाहिरातींची कामे करतो. पेपरातून लिहितो वगैरे. एक हरहुन्नरी क्रिएटिव्ह कलाकार म्हणून मला माझ्या दुनियेत ओळखले जाते, पण माझी प्राप्ती नियमित नसते. ती बायकोपेक्षा कमी आहे. अर्थात त्याबद्दल तिची अजिबात तक्रार नाही. तिची तक्रार आहे की मी बेशिस्त आहे. घरभर पसारा करतो. माझ्या उठण्या-झोपण्याच्या वेळात नियमितता नाही. दररोज दाढी करीत नाही. घरकामात आणि प्रपंचात माझे लक्ष नसते. प्रपंच म्हणजे काय, तर आम्हा दोघांचे सहजीवन. ते वरकरणी मस्त चाललेय् असं कुणालाही वाटतं.
पण बायकोच्या अतिशिस्त आणि टापटिपीच्या जबरदस्तीला मी कंटाळलोय. असं वाटतं की ती कायम माझ्या वागण्या-वावरण्याचं कठोर ऑडिट करतेय्. माझे वैविध्यपूर्ण कार्यक्षेत्र असे आहे की त्यात चाकोरीबद्ध, रुटिन असे काही नसते. आमच्या लग्नाला सहा वर्षे झालीत. अजून ’ईश्यू’ नाही. त्यावरूनही बायको मला म्हणते की उद्या आपल्याला मूल झाले तर त्याच्यावर आपण काय आणि कसे संस्कार करणार. तुमच्या बेशिस्तीचे त्याच्यावरही दुष्परिणाम होणार.
यावर काय बोलावे ते मला कळत नाही. मी शिस्तशीर वागण्याचा प्रयत्न करतो. पण एकूण बायकोचं डिसीप्लीन, टापटीप, वक्तशीरपणा, शिस्त याचा अतिरेक होतोय असं मला वाटतं .
-अभिजीत, मुंबई

तुमची समस्या नव्हे, बायकोबाबतची तक्रार वाचली. ती पाहता तुम्ही स्वतःला ओव्हरइस्टीमेट करताय् असं दिसतंय्. तुम्ही फ्री-लान्सर म्हणून जे काम करता, त्या कार्यक्षेत्रात चाकोरीबद्ध, रुटीन असे काही नसते, असं तुम्ही म्हणता. हे मान्य केलं तरी त्याचा अर्थ तुम्ही बेशिस्त वागावं, घरभर पसारा करावा, असा होत नाही. तुमचं काम चाकोरीबद्ध नसेल, पण घर टापटीप ठेवावं, पसारा करू नये; एवढी शिस्त तुम्हीच काय, पण घरातून काम करणार्‍या प्रत्येक पुरुषाने पाळली पाहिजे, अशी अपेक्षा घरच्या कर्त्या, नोकरी करणार्‍या महिलेने केली तर त्यात गैर काय?
अभिजीत महाशय, जीवनात शिस्त हवीच. तुम्ही वेळच्या वेळी दाढी केलीत, तुमच्या लेखन मेजावर किंवा घरात नीटनेटकेपणा केलात, तर तुमची स्वतःची मनोवृत्ती अधिक प्रसन्न राहील व तुमचे क्रिएटिव्ह काम अधिक चांगले होईल! तुम्ही प्रसन्न दिसाल, घर साफसुथरे दिसेल, तर गृहलक्ष्मी देखील प्रसन्न राहील ना! तिची तक्रार राहणार नाही. अन् तुमची तिच्या अति शिस्तीबद्दल तक्रार राहणार नाही. तुमच्या पत्नीचा आणखी एक मुद्दा नक्कीच विचारात घेण्याजोगा आहे. तुम्हाला मूल झाले तर त्याच्यावर काय संस्कार होणार? आपले बेशिस्त वर्तन येणार्‍या मुलासमोर आदर्श म्हणून ठेवण्यात हंशील नाही. तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करा. त्यासाठी फार काही कष्ट पडणार नाहीत.