एका कावळ्याच्या जीवनप्रवासाने प्रेरित होऊन अख्ख...

एका कावळ्याच्या जीवनप्रवासाने प्रेरित होऊन अख्खा चित्रपट तयार. (A Film Inspired By Daily Routine Of A Crow : Astonishing Vision Of A Director)

“कोविडच्या काळात असलेल्या लॉकडाऊन मध्ये घरात कैद झालो असताना, मी माझ्या खिडकी जवळ एका कावळ्याला घरटे बांधताना पहिले. एरव्ही एक शुल्लक घटना म्हणून ज्याकडे दुर्लक्ष झाले असते, त्यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या घटनेचे रूपांतर निराशाजनक वातावरणामध्ये आशेचा किरण दाखविणाऱ्या एका शक्तिशाली सिनेमॅटिक अभिव्यक्ती मध्ये झाले. कावळ्याची दिनचर्या मी चित्रित करायला सुरुवात केली.” अशी स्पष्टोक्ती ‘तीन अध्याय’ या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सुभाष साहू यांनी केली. पणजी येथील इफ्फी – ५२ मधील इंडियन पॅनोरमा विभागात हा चित्रपट दाखवण्यात आला. त्या निमित्ताने झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलताना साहू पुढे म्हणाले, “तब्बल ६ ते ७ महिने रोजच त्या कावळ्याच्या पिल्लांचा जन्म, त्यांनी आपल्या पिल्लांचा अतिशय मायेने केलेला सांभाळ, त्यांची अतूट जवळीक आणि त्या पिलांपैकी एकाचा मृत्यू झाल्यावर मृत्यूच्या तांडवाचा केलेला सामना या घटनांचा मी मागोवा घेत राहिलो…. उत्पत्ती, विपत्ती आणि चक्र या ३ संकल्पनांवर या चित्रपटाची गुंफण केली आहे. एका निरागस बालका समोर हे तीन अध्याय उलगडतात, आणि त्याच बरोबर संपूर्ण जगाला एक शिकवण देतात, हे या चित्रपटात दाखवले आहे.”

‘तीन अध्याय’ मध्ये एकही संवाद नाही. त्यामुळे संगीत दिग्दर्शक मनीष पिंगळे यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. सुवीर नाथ आणि सुप्रभा साहू हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.