महानायकाच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्त त्यां...

महानायकाच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या चित्रपटांचा महोत्सव आयोजित (A Film Festival Of Amitabh Bachchan’s Film Is Arranged To Felicitate Him On His 80 Th Birthday)

महानायक अमिताभ यांनी गेली पाच दशके बॉलिवूड गाजवले आहे. आजच्या काळातही त्यांना तोडीस तोड असे कोणीही नाही. बिग बींनी आपल्या अभिनयाने भारतासोबतच परदेशातील प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकली. त्यामुळेच त्यांचे चित्रपट लागल्यावर चाहत्यांना दुसरे काही बघायला आवडत नाही. बिग बींच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचे जुने पण गाजलेले चित्रपट रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी खास एक चित्रपट महोत्सव साजरा केला जाणार आहे.

येत्या ८ ऑक्टोबरपासून ते ११ ऑक्टोबरपर्यंत ‘बच्चन बॅक टू बॅक’ या नावाने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर या दिवशी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो. यावर्षी बिग बी वयाच्या ८० वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने पीव्हीआर सिनेमा बरोबर भागीदारीत या अनोख्या महोत्सवाची घोषणा केली आहे.  अमिताभ यांचे 11 गाजलेले चित्रपट 22 चित्रपटगृहात, 30 स्क्रीनवर भारतातल्या 17 शहरांमध्ये हा महोत्सव आयोजित केला आहे.

 मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू ,हैदराबाद अहमदाबाद, सुरत, बडोदा, रायपूर, कानपूर, कोल्हापूर, प्रयागराज आणि इंदूर या शहरांचा यात समावेश असेल. या महोत्सवात  डॉन, काला पत्थर, कालिया, कभी कभी, अमर अकबर एंथनी, नमक हलाल, अभिमान, दीवार, मिली, सत्ते पे सत्ता आणि चुपके चुपके या चित्रपटांचा समावेश आहे.

बिग बींचे चाहते आपल्या जवळच्या पीव्हीआर चित्रपटगृहात हे चित्रपट 400 रुपये भरुन पाहु शकतात. याशिवाय मुंबईतील जुहू येथील पीव्हीआर सिनेमागृहात अमिताभ बच्चन यांच्या काही वस्तूंचे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.