महिला लोककलेचा वारसा जपणारा महोत्सव (A Festival...

महिला लोककलेचा वारसा जपणारा महोत्सव (A Festival Of Women Folk Arts Gets Loud Applause)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत; पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दरवर्षी ८ मार्चला महिला कला महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही या पाच दिवसीय कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महिलाविषयक प्रबोधन, माहितीपर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असे या महोत्सवाचे स्वरुप असते. यावर्षीही या महोत्सवामध्ये एकूण २४ विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करण्यात आले.

कलामहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सादर झालेल्या ‘सर, प्रेमाचं काय करायचं’ या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. सर आणि त्यांच्या तीन विद्यार्थ्यांच्या भवती फिरणारं कथानक असलेल्या या नाटकात मकरंद देशपांडे, आकांशा गाडे, निनाद लिमये, माधुरी गवळी आणि अजय कांबळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कला महोत्सवाची सुरुवात मीना नाईक यांच्या पॉक्सो या कायद्यावर आधारित ‘अभया’ एकपात्री नाटकाच्या प्रयोगापासून झाली. पॉक्सो हे बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील कायद्याबाबत जनजागृती करणारं नाटक असून या प्रयोगाला निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि अभिनेता सचिन खेडेकर यांची विशेष उपस्थिती होती.

शिल्पी सैनी यांच्या कथ्थक नृत्याचा ‘नृत्यार्धना’ हा नृत्याविष्कार अभयानंतर सादर झाला तर कलांगणात शाहीर मिराताई उमप, संध्या सखी, विमल माळी यांनी ‘जागर महिला लोककलेचा’ या भारुडावर आधारित कार्यक्रमातून लोककलेतील स्त्री साहित्याविषयी जनजागृती केली. स्त्रियांचा लोककलेतील सहभाग आणि त्याची पार्श्वभूमी यांचा जागर या भारुडातून करण्यात आला. तर शिल्पी सैनी आणि त्यांच्या शिष्यानी सादर केलेल्या नृत्याविष्कारात महिला सबलीकरण याचा भर जास्त होता.

सदर कला महोत्सवात महिला प्रेक्षकांची संख्या तसेच सर्वच प्रेक्षकांनी लावलेली १०० टक्के हजेरी ही विशेष उल्लेखनीय होती. नाटकाच्या या महिला दिनाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या विशेष प्रयोगाला प्रेक्षकांनी उभं राहून ५ मिनिट टाळ्या वाजवून कलाकारांना दाद दिली. मकरंद देशपांडे यांनी शासनाच्या १०० टक्के प्रेक्षक उपस्थितीच्या निर्णयाचं स्वागत केलंच पण त्याच बरोबर ‘महिला दिना’ च्या निमित्ताने नाटकाचा खास प्रयोग सादर करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचे विशेष आभार मानले.

“महिला दिन निमित्ताने आमच्या नाटकाचा प्रयोग करण्याची संधी दिल्याबद्दल आणि एक अनोखं व्यासपीठ आम्हाला दिल्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाचे खरंच आभार, महिला कला महोत्सवातून समाजाला ‘स्त्री’ साहित्याकडे ओढ निर्माण होऊ शकते तसेच त्यातून अनेक स्त्रियांच्या मनात कला विभागात आपलं पाऊल ठेवण्यास विश्वास निर्माण होईल ही खात्री आहे. मंगळवारचा प्रयोग आणि तो ही तुडुंब गर्दीत हे अविस्मरणीय आहे. नाटकाला लागणारी दाद देणारा प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत आणण्यासाठी असे अनेक कला महोत्सव होवो” अशा शब्दात मकरंद देशपांडे यांनी आपले या कला महोत्सवा विषयीचे मनोगत व्यक्त केले आहे.