नृत्यांगना झाली अभिनेत्री (A Dancer’s Jou...

नृत्यांगना झाली अभिनेत्री (A Dancer’s Journey To Marathi Film Actress)

-रमेश मेश्राम
हल्ली सिनेमा व टी. व्ही. क्षेत्रात एवढे नवनवीन कलाकार आले आहेत की, कुणाला लक्षात ठेवावं व कुणाला विसरावं? असा एक प्रश्न मनात सतत निर्माण होत असतो. असं असलं तरी पल्लवी मजगर नावाची एक अभिनेत्री आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
शाळा कॉलेजमध्ये नृत्याची आवड त्यांना स्टेजवर घेऊन आली व त्यांनी सुरेखा पुणेकर यांचा डांस ग्रुप जॉईन केला. ’या रावजी बसा भाउजी’ या ग्रुपमध्ये सतत चार वर्षे काम करताना काही बरे वाईट अनुभवही त्यांना आलेत.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंचावर कार्यक्रम सुरू असताना त्यांना एक निर्माता व दिग्दर्शक एन. रेळेकर, यांनी सिनेमाची ऑफर दिली. अन् त्यांना पहिली मराठी फिल्म मिळाली ’तुम्ही सरकारी आम्ही शेतकरी’.

कोणतीही भूमिका करायला तत्पर
”जर मी अभिनय क्षेत्रात नसते तर नृत्य क्षेत्रात नक्कीच नाव कमवले असते,” या विश्वासाने बोलत असताना पल्लवी मजगर पुढे म्हणतात की, नवीन स्ट्रगल करताना बरेच चांगले वाईट अनुभव आले, जे इथे सांगणं योग्य होणार नाही. ”त्याचप्रमाणे अनेक दिवस संघर्ष केल्यावर मला ’लग्नाची वाइफ वेडींगची बायको’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये मुख्य भूमिका करायला मिळाली. त्यानंतर लोकांना मी ’क्लिक’ व्हायला लागली.“ आतापर्यंत अनेक चित्रपट सिरियलमध्ये काम केल्यावर पल्लवी मजगर असंही म्हणतात की, ”मला ते प्रत्येक ’किरदार’ करायला आवडतं ज्याच्यात काहीतरी शिकायला मिळतं. कुठलाच रोल हा छोटा मोठा नसतो, आई, बहीण, खलनायिका, एवढंच काय तर एखादी आजीबाई पण मी तेवढ्याच ताकदीने जिवंत करेन, असा माझा विश्वास आहे. चार वर्षांच्या वैयक्तिक ब्रेकनंतर अशोक यादव या दिग्दर्शकामार्फत ’लग्नाची वाइफ……..’ मध्ये काम करीत असताना पहिल्या दिवशी मी खूप घाबरले व टेन्शनमध्ये होते. अशोक यादव यांनी चर्चेतून पॉझिटीव्ह एनर्जीमधून, माझी भीती घालवली.“

पहिला अनुभव
आपल्या पहिल्या अनुभवाबद्दल बोलताना, त्या म्हणतात, ”पहिली स्क्रीन, पहिले शूट, आतून घाबरलेली, कसातरी शॉट ओके झाला आणि प्रोडयुसर म्हणाले, ’पल्लवी मॅडम इकडे या.’
मी पुनश्च घाबरले.
’हे तुम्ही काय केलं?’ – त्यांनी विचारलं.
’सर, सॉरी मी परत करते.’
’हे तुम्ही कसं करू शकता?’
मी रडायला लागले व ते म्हणाले, ’तुम्ही एका टेकमध्येच खूप छान काम केलं आहे.’
असं म्हणताच सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
”तो खूप मोठा दिवस होता माझ्या आयुष्यातला.“
”मी नवीन असताना इंडस्ट्रीजचे नियम मला माहीत नव्हते. चुकीच्या ऑफरही खूप आल्या, पण या भानगडीत पडून मला कलाकार बनायचं नव्हतं. मी ठामपणे आपल्या पायावर उभी राहिली व आज मी अपयशातून यशाकडे एक एक पाऊल पुढे जात आहे.“

अशोक यादव यांचे उत्तेजन
अभिनय, रीडिंग, खाना-घुमना हे त्यांचे आवडते छंद आहेत. काश्मीर त्यांना खूप आवडते. त्यांचे फॅन फॉलोवरही खूप आहेत. ”माझ्या आयुष्यात माझे मम्मी-पप्पा हे माझ्यासाठी खूप मॉडेल रोल आहेत. याशिवाय दुसरं कुणी बेस्ट असूच शकत नाही. यश सोनवणे माझा लहान भाऊ, त्याचं नाव मला घ्यावंसं वाटतं. आता तो या जगात नाही पण त्याच्या सततच्या पाठबळामुळे मी या क्षेत्रात येऊ शकले. सॅलुट टू हिम,”त्या भावुक होऊन सांगतात.
”माझ्या आयुष्यात अशोक यादव या दिग्दर्शकाचं खूप मोठं स्थान आहे. त्यांनी माझ्या आयुष्यात एक उर्जेचं स्थान निर्माण करून वेगळीच कलाटणी माझ्या अभिनयाला दिली आहे. न होणार्‍या गोष्टी, ’तुम्ही हे करू शकता’ म्हणून त्यांनी एका वेगळ्या उंचीवर मला आणून ठेवलं. आज इंडस्ट्रीमध्ये मी जी काही आहे ती फक्त त्यांच्यामुळेच.“
”आतापर्यंतच्या सिरियल व सिनेमामधून काम करताना सिने बॉक्स प्राईमच्या ’रक्त लांछन’ चा उल्लेख मला करावासा वाटतो. जवळपास दीड पानाचा, एक मोनोलॉग मी एका शॉटमध्ये ओके केला, व उपस्थित सर्व क्रू मेंबर्स व टेक्निशीयन यांनी टाळ्या वाजवल्या.“

बहीण प्रेरणास्थान
पल्लवी यांना अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटली, ती म्हणजे त्यांची मोठी बहीण कल्याणी चौधरी. म्हणजेच सध्या झी मराठीवर गाजत असलेली मालिका ’मन झालं बाजिन्द’ मधील गुली मावशी व ’लागिरं झालं जी’ मधील मामी या त्यांच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडूनच पल्लवी यांना अभिनयाचा वारसा मिळाला.
भारताच्या कोणत्याही शहरातून पळून आलेली व्यक्ती सरळ मुंबईत दाखल होत असते. अशा नवीन स्ट्रगलरसाठी पल्लवी सांगतात की, “एका रात्रीत कुणीही स्टार बनत नाही. तुम्हाला मेहनत करूनच पुढं जावं लागतं. या इंडस्ट्रीत कोणताही शॉर्टकट नाही. इथे यावं, मेहनत करावी, रात्रंदिवस एक करावं, यश नक्की मिळेल. पण शॉर्टकटनी कधी जाऊ नये. आज उंचीवर जेवढे आर्टिस्ट आहेत ते त्यांची मेहनत, सचोटी व सातत्य, यामुळे तिथपर्यंत पोहचले आहेत. मला पण ही उंची गाठायची आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे.”