जागतिक तंबाखू विरोधी दिन : जागरुकता निर्माण करण...

जागतिक तंबाखू विरोधी दिन : जागरुकता निर्माण करण्यासाठी मांडलेले कडू सत्य (A Bitter Truth To Create Awareness On The Occasion Of Today’s World No-Tobacco Day)

दरवर्षी ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन २०२२ (World No-Tobacco Day) म्हणून पाळला जातो. तंबाखूच्या व्यसनाचा परिणाम हृदय, श्वसनसंस्था यांच्यावर होत असला तरी अनेकांना हे माहीत नाही की धूम्रपान केल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर परिणाम होऊन तुमची दृष्टीही कमी होऊ शकते. जगभरात होणारे आजार आणि मृत्यू यांचे एक सर्वात प्रमुख कारण म्हणजे तंबाखू. भारतामध्ये ४४.५% पुरुष आणि ६.८% स्त्रिया तंबाखूचे सेवन करतात. ही माहिती नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्स मधील इंटर्नल मेडिसीन कन्सल्टन्ट डॉ. वैशाली लोखंडे यांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणतात, “धूम्रपान आणि तंबाखू चावून, चघळून खाणे या दोन सवयींमुळे सर्वसामान्यतः अनुक्रमे फुफ्फुसांचा व तोंडाचा कर्करोग होतो ही बाब जरी माहिती असली तरी तंबाखूमधील निकोटीनचे व्यसन सहजासहजी सुटत नाही. टाईप २ मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार, सीओपीडी, अस्थमा आणि स्थूलपणा यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे ते एक प्रमुख कारण आहे. तंबाखूच्या सेवनामुळे ट्युबरक्युलोसिस आणि श्वसनयंत्रणेला होणारे संसर्ग असे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका देखील वाढतो.”

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना मधुमेह होण्याचा धोका?

टाईप २ मधुमेह होण्याचा धोका धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना इतर (धूम्रपान न करणाऱ्या) व्यक्तींच्या तुलनेत ३०-४०% जास्त असतो तर हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका २ ते ४ पटींनी वाढतो. भारतासारख्या विकसनशील देशात असंसर्गजन्य आजार ही अत्यंत गंभीर समस्या असून त्याचे निवारण होणे गरजेचे आहे. भारतामध्ये असंसर्गजन्य आजारांमुळे दरवर्षी ६० लाख लोक मृत्युमुखी पडतात, त्यांच्यापैकी जवळपास २३% व्यक्ती ३० ते ७० वर्षे वयोगटातील असतात. अपोलो हॉस्पिटल्सने प्रकाशित केलेल्या हेल्थ ऑफ द नेशन अहवालानुसार देशभरात डायबेटीस मेलिटसचे प्रमाण जवळपास ७%, हायपरटेन्शनचे ८% पेक्षा जास्त आणि सीओपीडी व अस्थम्याचे प्रमाण २ ते १६% आहे. ही आकडेवारी खूप गंभीर स्थिती दर्शवते, आजारांचे ओझे वाढून उत्पादनक्षमता व आर्थिक वृद्धीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तंबाखूच्या सेवनामुळे शरीराच्या सर्वसामान्य क्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात, जळजळ होणे, सूज येणे असे त्रास होऊ लागतात, यामुळे रक्तातील शर्करा कमी करण्याचा इन्सुलिनचा प्रभाव कमी होऊ शकतो.  शरीरातील पेशींना होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी होऊन पेशींचे नुकसान देखील होऊ लागते.  ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ, सूज यांचा एकत्रित परिणामामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

जेव्हा तंबाखू श्वासावाटे शरीरात घेतला जातो तेव्हा तंबाखूमध्ये असलेली विविध रसायने हृदय आणि उर्वरित शरीराला प्राणवायूने परिपूर्ण रक्ताचा पुरवठा केला जाण्याच्या कामात अडथळा निर्माण करतात.  यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्टेरॉल जमा होते आणि मुख्य धमनीमध्ये अवरोध निर्माण होतो. यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचे आजार, हायपरटेन्शन आणि स्ट्रोक यासारखे हृदयाशी संबंधित असंसर्गजन्य आजार होतात.

असंसर्गजन्य आजार कमी करण्यासाठी तंबाखूचे सेवन टाळणे ?

एनसीडी अलायन्सनुसार, असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी तंबाखूचे सेवन करणे टाळणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. असंसर्गजन्य आजारांमुळे व्यक्ती, कुटुंब आणि संपूर्ण समाजाचे आरोग्य धोक्यात येते.

तंबाखू सेवन बंद केल्याने व्यक्तीला आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यात मदत मिळते. तंबाखूचे व्यसन लवकरात लवकर सोडणे आणि त्यासोबत फळे व भाज्या यांचा भरपूर समावेश असलेला संतुलित आहार घेण्यासारखे बदल आपल्या जीवनशैलीत घडवून आणणे सर्वात चांगले! धूम्रपान, तंबाखू चघळणे, चावणे या सवयी सोडल्यास शरीराला निकोटिनच्या वाईट परिणामांपासून सुटका करवून घेण्यात मदत मिळते. तुमचे नेमके ट्रिगर्स कोणते आहेत ते ओळखा आणि ते टाळण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान सोडण्याची प्रक्रिया अधिक सहजसोपी व्हावी यासाठी ते हळूहळू सोडा आणि मार्गदर्शनासाठी एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या.