‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा ब...

‘बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना यांचा बायोपिक बनणार! फराह खान सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा! (A Biopic On Bollywood First Superstar Rajesh Khanna’s life, Farah Khan Will Direct The Film)

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘पहिले सुपरस्टार’ म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांच्यावर बायोपिक बनवण्यात येत आहे. राजेश खन्ना यांच्या ‘डार्क स्टार : द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट तयार केला जात आहे, ज्याची निर्मिती निखिल द्विवेदी करणार आहे अन्‌ फराह खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

राजेश खन्ना यांच्या ७९व्या जयंती (२९ डिसेंबर रोजी)च्या निमित्ताने, त्यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याचे समजते. निर्माते निखिल द्विवेदी यांनी गौतम चिंतामणी लिखित ‘डार्क स्टार : द लोनलीनेस ऑफ बिइंग राजेश खन्ना’ या पुस्तकाचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. हे पुस्तक यापूर्वी बेस्टसेलर लीडमध्ये अग्रक्रमी होते. राजेश खन्ना यांना प्रेक्षक आणि चाहत्यांकडून मिळालेले प्रेम खूपच वेगळे होते. त्यांची क्रेझ इतकी होती की, महिला चाहत्या त्यांना रक्ताने पत्र लिहायच्या, त्यांच्या फोटोंशी लग्न करायच्या.

चेतन आनंदच्या ‘आखरी खत’ (१९६६) मधून पदार्पण करणाऱ्या राजेश खन्ना यांनी यश आणि अपयश दोन्ही अनुभवले. जतिन खन्ना हे त्यांचे खरे नाव होते. परंतु या अभिनेत्याला लोक इंडस्ट्रीत ‘काका’ या नावानेच हाक मारायचे. गौतम चिंतामणी यांच्या पुस्तकात ज्या पद्धतीने अभिनेत्याचे चित्रण करण्यात आले आहे त्यातून बायोपिक बनवला जाणार असून, निखिल द्विवेदी राजेश खन्ना यांचे अनेक वेगळे पैलू मोठ्या पडद्यावर आणणार आहेत. हा चित्रपट एक श्रद्धांजली ठरणार आहे.

या चित्रपटात राजेश खन्ना यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. खरं तर या सुपरस्टारच्या भूमिकेत चपखल बसने कोणत्याही अभिनेत्यासाठी सोपे असणार नाहीये. परंतु, जर एखाद्या अभिनेत्याने या भूमिकेसाठी साइन अप केले आणि ती चोख बजावली, तर तो नक्कीच सर्वोत्कृष्ट ठरेल.

याविषयी सांगताना निखिल द्विवेदी म्हणाले की, ‘होय, गौतम चिंतामणीच्या ‘डार्क स्टार’ या पुस्तकाचे हक्क आता माझ्याकडे आहेत आणि हा चित्रपट बनवण्यासाठी माझी फराह खानशी चर्चा सुरू आहे. मी सध्या एवढीच माहिती देऊ शकतो. चित्रपटाबाबत मोठी घोषणा होताच, मी ती नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. राजेश खन्ना यांचे चरित्र मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’

दुसरीकडे फराह खान म्हणाली की, ‘होय मी गौतमचे पुस्तक वाचले आहे आणि ते खूप आकर्षक आहे. खूपच रोमांचक कथा आहे. याबाबत सध्या आमची बोलणी सुरू असली, तरी मी याबाबत आता अधिक काही सांगू शकत नाही.’

राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. जवळपास १८० चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. १९६९ ते १९७१ दरम्यान त्यांनी सलग १५ सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यांचा हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही मोडलेला नाही. राजेश खन्ना यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. फक्त चित्रपटांपुरती नव्हे तर सिनेसृष्टीबाहेरही त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग होता.

त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक त्याच्या घराबाहेर उभे असायचे. विशेष म्हणजे ७० ते ८० च्या दशकात ते चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता बनले. राजेश खन्ना यांच्या लूकवर त्या काळातल्या मुली इतक्या फिदा होत्या की, रस्त्यावरून त्यांची गाडी गेल्यानंतर जी धूळ उडत होती, ती त्यांच्या कपाळावर कुंकू म्हणून लावत होत्य. आजही राजेश खन्ना यांच्या स्टारडममधील अनेक किस्से ऐकण्यासाठी फॅन्स पसंती देतात.