रोज केळं खा नि आजारांना दूर ठेवा (A Banana A Da...

रोज केळं खा नि आजारांना दूर ठेवा (A Banana A Day Keeps Doctor Away)

केळं हे एक बहुगुणी फळ. पोटभरीचं आणि रुचकर, पौष्टिक फळ म्हणून सगळ्यांच्या पसंतीचा शिक्का मिळालेलं फळ. शुभकार्य, धार्मिक सण-उत्सव यांचे केळ्याशिवाय पान हलत नाही. शिवाय केळी बाराही महिने उपलब्ध असतात. संशोधनांती केळ्याचे इतके फायदे आढळून आले आहेत, की ते जाणून आपणांस आश्चर्य वाटेल. आपण आधीच केळं बहुगुणी असल्याचं म्हटलं आहे, परंतु या संशोधकांनी ‘ए बनाना ए डे किप्स द डॉक्टर अवे’ असं सिद्ध करून दाखवलं आहे.

संशोधनानंतर असं सिद्ध झालं आहे की, शंभर ग्रॅम वजनाच्या केळ्यापासून शंभर किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. केळ्यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह ही खनिजद्रव्ये आहेत. याखेरीज क जीवनसत्त्व, नायसिन, रायबोफ्लेविन ही ब वर्गीय जीवनसत्त्वे असतात. १०० ग्रॅम केळामध्ये जलांश ७५ ग्रॅम, शर्करा २० ग्रॅम, प्रोटिन्स १ ग्रॅम, तंतुमय पदार्थ ६०० मिलिग्रॅम आणि स्निग्ध पदार्थ २०० मिलीग्रॅम असतात.

कच्च्या केळीत सुमारे वीस टक्के स्टार्च असते. फळ पक्व होताना काही एन्झाइम्स कार्यप्रवण होतात. त्यामुळे स्टार्चचे रुपांतर ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रक्टोज अशा नैसर्गिक शर्करेमध्ये होण्यास सुरुवात होते. म्हणूनच केळं खाल्ल्यानंतर आपल्याला लगेचच ऊर्जा मिळते.

दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत ऊर्जा मिळते. म्हणूनच मैदानी खेळ खेळणाऱ्यांसाठी केळं हे प्रथम क्रमांकाचं फळ आहे, यात शंका नाही.

मेंदूचा विकास- केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही अधिक असते. मेंदूच्या विकासासाठी पोटॅशियमची गरज असते, म्हणून वाढत्या वयातील मुलांना केळी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तसेच परीक्षा देण्यासाठी जात असाल तर जरुर केळे खावे.

 
अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. तणावग्रस्त लोकांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार केळी खाल्ल्यानंतर अनेकांना बरे वाटल्याचे दिसून आले आहे. कारण केळीमध्ये ट्रायटोफन आहे, जे तुम्हाला आराम करण्यास, मूड सुधारण्यास आणि सामान्यत: तुम्हाला आनंदी बनविण्यास प्रवृत्त करते. 

केळं खाल्ल्यानंतर त्यात असलेल्या व्हिटॅमिन बी 6 मुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमन होते, जे आपल्या मूडवर परिणाम करते.

केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.

केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.

केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. यात पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, व्हिटामिन ए, बी, बी६, आर्यन, कॅल्शियम असते.

केळ्याच्या नियमित सेवनाने चयापचयाची क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यास मदत होते.

मलावरोध – केळ्यातील फायबर आणि हेल्दी स्टार्चमुळे आतडी स्वच्छ होतात. मल साचून राहत नाही. यामुळे मलावरोधाची समस्या नष्ट होते.

भूक शमते – यातील फायबर्स आणि अन्य पोषक तत्त्वांमुळे भूक नियंत्रित होते. वेळोवेळी भूक लागत नाही.

दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्याने चांगली झोप येते. झोप न येण्याची समस्याही दूर होते.

लठ्ठपणा – रोज एक कच्चे केळे खाल्ल्यास यातील फायबर्समुळे अनावश्यक फॅट सेल्स आणि अशुद्धता नष्ट होते.

मधुमेह – मधुमेहाचा प्राथमिक स्तर असल्यास कच्च्या केळीचे सेवन करावे. मधुमेह नियंत्रणात राहतो.

कॅन्सर – कॅन्सरपासून बचाव होतो.

रक्तदाबाचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे.

दररोज २ केळी आणि मध खाल्याने हृदयाचे आजार कमी होतात. आहारामध्ये केळ्याचा समावेश असेल तर हृदयाचा झटका येण्याची शक्यता देखील कमी होते.

केळ्यामध्ये लोहाचं प्रमाण अधिक असल्याने ॲनिमिया होण्याची शक्यता कमी होते.

छातीत जळजळ होत असल्यास केळं खा. केळ्यातील अँन्टासिडच्या प्रभावामुळे छातीतील जळजळ थांबते.

केळं हे थंड प्रवृत्तीचं फळ आहे. गर्भवती स्त्रियांचं शारीरिक आणि मानसिक तापमान कमी राखण्यासाठी केळं हा उत्तम पर्याय आहे. गर्भवती महिलांनी केळी जरूर खाल्ली पाहिजे.

एखादा कीटक, माशी चावली असता तेथे लावण्याकरीता क्रीम शोधत न बसता त्या ठिकाणी केळ्याचा गर चोळला तर खाज जाते अन्‌ तात्काळ आराम मिळतो.

धुम्रपान, तंबाखूचं सेवन अशा व्यसनांपासून मुक्त व्हायची इच्छा असणाऱ्यांना केळं मदत करते. केळ्यातील बी- ६ अणि बी १२ हे घटक तसेच पोटॅशिअम आणि मॅग्नेशियममुळे निकोटीनमुळे झालेले शरीराचे नुकसान पूर्ववत होण्यास मदत होते.

अधिक मद्यपान केल्याने हॅंगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो. त्यात मध घालून प्यावे. असं केल्याने केळ्यामुळे पोट शांत होते, मधाच्या मदतीने रक्तातील कमी झालेली साखर वाढते आणि दुधामुळे शरीर पुन्हा हायड्रेट होते.

केळीच्या सालीची पेस्ट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.

केळं सर्वांना आवडणारं फळ आहे. केळी शक्तीवर्धक फळ आहेच पण त्याचबरोबर त्याचे अनेक फायदेही आहेत. केळी हे सौंदर्य प्रसाधन सुद्धा आहे. दररोज एक केळं खाल्ल्याने आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. व्हिटॅमिन, प्रोटिन आणि इतर पोषक तत्त्वांनी भरलेले हे फळ आहे. तेव्हा रोज केळं खा नि आजारांना दूर ठेवा.

जगभरात साजरा केला जातो केळी दिवस

एप्रिल महिन्याचा तिसरा बुधवार जागतिक स्तरावर केळी दिवस म्हणून साजरा केला जातो. २०१७ मध्ये युरोपात सर्वप्रथम केळी दिवस साजरा झाला. केळीचे महत्त्व वाढावे, केळीचा खप व विक्री वाढावी, हा यामागचा उद्देश होता. तेव्हापासून युरोपसह अमेरिकेतदेखील हा दिवस साजरा होतो.