सुनील शेट्टीने बॉलिवूड बॉयकॉट ट्रेण्ड थांबवण्या...

सुनील शेट्टीने बॉलिवूड बॉयकॉट ट्रेण्ड थांबवण्यासाठी घेतली युपीच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव(99 per cent of Bollywood doesn’t take drugs, Boycott Bollywood hashtag needs to be removed, Suniel Shetty appeals UP CM Yogi Adityanath)

अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची भेट घेतली, त्यावेळी सुनील शेट्टीनेही योगीजींची भेट घेऊन बॉलिवूडमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. तसेच बॉलिवूडला लागलेला बॉयकॉटचा ‘कलंक’ दूर करण्याचे आवाहन केले.

मुंबईतील मुक्कामादरम्यान, सीएम योगी यांनी उत्तर प्रदेशमध्ये बनवल्या जाणाऱ्या फिल्मसिटीसंदर्भात अनेक बॉलिवूड सदस्यांची भेट घेतली. या बैठकीत सुनील शेट्टी यांनी ड्रग्ज, बहिष्कार असे अनेक मुद्दे उपस्थित केले.

काही काळापासून बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड आहे. सोशल मीडियावर बॉलिवूडबद्दल नकारात्मकता पाहायला मिळत आहे. मोठ्या स्टार्सना ट्रोल केले जात आहे. मोठ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. गेल्या 2-3 वर्षात अनेक मोठे चित्रपट बहिष्काराला बळी पडले. त्याचा फटका बॉक्स ऑफिसवर चांगलाच बसला. त्यामुळे इंडस्ट्रीचे खूप नुकसान होत आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये बॉलिवूड आणि हिंदी चित्रपटांबद्दल इतका रोष आहे की आता चित्रपटाचे नाव ऐकताच लोक त्याविरोधात बहिष्कार टाकू लागले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुखच्या पठाणवरही बहिष्कार टाकण्याची मागणी होत असून बॉयकॉट पठाण हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

सुनील शेट्टी यांनी योगीजींना बहिष्काराचा हा ट्रेंड थांबवण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “हा बॉयकॉट हॅशटॅग काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे. टोपलीमध्ये एक कुजलेले सफरचंद असू शकते, परंतु आपण सर्वच असे नाही. काही लोक बिघडले असतील, पण आपण सगळेच असे नसतो. आमच्या कथा आणि संगीत आम्हाला जगाशी जोडतात म्हणूनच हा कलंक दूर करणे खूप महत्वाचे आहे.”

यावेळी सुनील शेट्टी यांनी ड्रग्जच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आणि ते म्हणाले, ‘बॉलिवुडमध्ये ९० टक्के लोक ड्रग्ज घेत नाहीत. आम्ही ड्रग्ज घेत नाही आणि वाईट गोष्टीही करत नाही. आमची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही फक्त मेहनत करतो. त्यामुळे बॉयकॉट बॉलिवूड हा टॅग काढून टाकणे गरजेचे आहे. जेणेकरुन बॉलिवूडची बिघडलेली प्रतिमा सुधारता येईल. हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पोहोचवावा असे आवाहन त्यांनी योगीजींना केले. सुनील शेट्टी योगीजींना म्हणाले, तुम्ही मदत कराल तर होऊ शकते. आमच्यावर लादलेला कलंक दूर करणे आवश्यक आहे. हे सर्व पाहून खूप वाईट वाटते.

एवढेच नाही तर या भेटीनंतर सुनील शेट्टी यांनी ट्विट करून मुख्यमंत्री योगीजींचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले – धोरण पाहिले, हेतू पाहिला, परिणाम दिसून येईल. तुम्ही मुंबईत आलात, आमचे ऐकले, मनापासून धन्यवाद!