९५ वर्षांचे भक्त ‘योगयोगेश्वर शंकर’ मालिकेच्या ...

९५ वर्षांचे भक्त ‘योगयोगेश्वर शंकर’ मालिकेच्या सेटवर महाराजांच्या भेटीला (95 Years Old Disciple Visits The Sets Of ‘Yog Yogeshwar Shankar’ To Pay Respect To Maharaj)

कलर्स मराठी वर नवीनच सुरू असलेली ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेद्वारे सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे. श्री शंकर महाराज यांच्या बालपणापासूनच श्री स्वामी समर्थांचा त्यांच्यावर कृपाशीर्वाद होता तसाच कृपाशीर्वाद शंकर महाराजांचा त्यांच्या भक्तांवर आहे, त्यापैकी एक भक्त म्हणजे श्री रघुनाथ हरिभाऊ कडलास्कर (पेंटर काका) यांना सोलापूरमध्ये शुभराय मठात आणि जक्कल मळ्यात वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून ते वयाच्या वीस वर्षांपर्यंत शंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला. महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे आयुष्य भक्तिमय झाले.

१९४७ साली धनकवडी येथे महाराजांनी समाधी घेतली. त्यावेळी पेंटर काकांचे वय वीस वर्ष होते. आज पेंटर काकांचे वय ९५ वर्ष असून, “योगयोगेश्वर जय शंकर” ही मालिका कलर्स मराठी वर प्रसारित होत आहे, हे समजताच त्यांना अत्यानंद झाला आणि बालशंकरच्या भूमिकेतील आरुषला पाहून त्यांना गहिवरून आले. मालिकेतील बाल शंकरला पाहून त्यांना पुन्हा एकदा सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली आणि आज वयाने ९५ वर्षांचे असलेले काका ताबडतोब त्यांचा मुलगा विजूदादा कडलास्कर, यांच्यासह सोलापूरवरून कलर्स मराठीच्या योगयोगेश्वर जय शंकर मालिकेच्या नाशिक येथील सेटवर बालशंकरला भेटण्यासाठी आले.

काकांच्या ह्या भेटीतून त्यांचे शंकर महाराजांवर असलेले अफाट प्रेम दिसून आले. काकांच्या या गुरु भेटीच्या ओढीतून ह्या मालिकेचे यश आपल्याला दिसून येते. मालिकेच्या सेटवर पेंटर काकांनी बाल शंकरला पाहताच क्षणी मिठीत घेतले आणि त्यांनी बाल शंकरला ‘आजोबा’ म्हणून हाक मारून कवेत घेतले आणि महाराजांचा पुन्हा एकदा सहवास लाभला असे उद्गार काढले. त्यावेळी त्यांना गहिवरून आले.

पेंटर काकांनी महाराजांविषयी प्रत्यक्ष भेटीचे काही अनुभव सर्वांना सांगितले. विजूदादा यांनीही शंकर महाराज आणि भस्मे काका, मधुबुवा, जक्कल काका, प्रधान, आशर, गिरमे काका यांच्या आणि पेंटर काकांच्या त्यांच्या समोर महाराजांच्या चमत्कारातून घडलेल्या आध्यत्मिक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे काका आणि बालशंकर यांची भेट पाहून सेट वरील सर्व कलाकार आणि संपूर्ण टीमला विलक्षण आनंद झाला.