वयाच्या ९४ व्या वर्षी ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक...

वयाच्या ९४ व्या वर्षी ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भगवानी देवी यांनी इतिहास घडवला (94-year-old Bhagwani Devi Wins Gold & Bronze Medals In World Masters Athletics Championships, Creates History)

ज्या वयात निजधामास जाण्याकडे माणसाचे डोळे लागले असतात, त्या वयात भगवानी देवी नामक आजीबाईंनी साहस आणि तंदुरुस्ती यामध्ये अद्वितीय कामगिरी करून दाखवली आहे. या शरीराने काटक आणि चपळ असलेल्या आजीबाईंनी वयाच्या ९४ व्या वर्षी वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेत सुवर्णपदक आणि दोन कांस्य पदके जिंकून आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे.

फिनलॅन्ड मधील टाम्परे गावात आयोजित करण्यात आलेल्या या जागतिक स्पर्धेत १०० मीटर स्प्रिंट इव्हेन्टमध्ये हरियाणातील भगवानी देवी यांनी सुवर्ण पदक पटकावले. शिवाय त्यांनी शॉट पुट गोळाफेक स्पर्धेत भाग घेऊन तिथे कांस्य पदक मिळविले आहे.

क्रीडा मंत्रालयाने भगवानी देवीची प्रशंसा करून त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिलं आहे की, जिद्द आणि साहस करायला वयाची मर्यादा लागत नाही. भगवानी देवीच्या साहसाची कमाल आहे!

सदर वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात १९७५ साली झाली. वयाच्या पस्तिशीनंतर सर्व खेळाडू त्यात भाग घेऊ शकतात. आधी फक्त ५ वयोगटांचा यात समावेश होता. आता १२ वयोगट त्यात सामील करण्यात आले आहेत.

या स्पर्धेत अनेक प्रकारच्या इव्हेन्टस्‌ असतात. १०० ते ५०० मिटर्सची दौड, थाळीफेक, शॉट पुट, रिले रेस, हर्डल, हाय जंप, मॅराथॉन, हातोडाफेक इत्यादी. भगवानी देवींनी ९४ व्या वर्षा जो इतिहास घडवला आहे, त्याबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.