उच्च शिक्षण घेतले, पण बॉलिवूडमध्ये डेरेदाखल झाल...

उच्च शिक्षण घेतले, पण बॉलिवूडमध्ये डेरेदाखल झालेल्या ९ अभिनेत्री (9 Most Educated Actresses In Bollywood)

मुलगी शिकली, प्रगती झाली; असं बोधवाक्य महाराष्ट्राने रुजू केलं आहे. त्याप्रमाणे मुली शिकतात. मात्र काही मुली अशा आहेत की, ज्यांनी चांगल्यापैकी उच्च शिक्षण घेतलं. पण तोंडाला रंग लागताच, त्या शिक्षणात प्रगती करण्याऐवजी फिल्म इंडस्ट्रीत डेरेदाखल झाल्या.

ऋचा चढ्ढा

ऋचा ही गुणी अभिनेत्री आहे. कामाच्या बाबतीत तेवढीच प्रामाणिक आहे. ‘ओए लकी ओए’ या चित्रपटातून तिने फिल्मी करिअर सुरू केलं. त्यानंतर ती गॅन्ग ऑफ वासेपूर, फुकरे, मजान, सरबजीत अशा चित्रपटातून चमकली. पण इथे चमकण्यापूर्वी तिने शिक्षणातही चमक दाखवली होती. तिने दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजातून पदवी परीक्षा पास केली. तिचा स्पेशल सबजेक्ट होता हिस्टरी. नंतर मुंबईच्या सोफिया कॉलेजातून सोशल कम्युनिकेशनचा डिप्लोमा तिने केला आहे.

विद्या बालन

अभिनयाच्या जोरावर विद्या बालन आता बॉलिवूडमध्ये यशोशिखरावर पोहचली आहे. २००५ साली ती बॉलिवूडमध्ये आली. त्याआधी ‘हम पांच’ या गाजलेल्या विनोदी मालिकेत ती आली होती. तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. आता विद्याला राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. बॉलिवूडमधील सर्वात जास्त शिकलेली अभिनेत्री असा तिचा बोलबाला आहे. विद्याने मुंबईच्या सेंट झेवियर्स या नामांकित कॉलेजातून समाजशास्त्राची पदवी घेतली आहे. नंतर अभिनयाची कारकीर्द सुरू करण्यापूर्वी विद्याने मास्टर्स डिग्री मिळवली आहे.

परिणीती चोप्रा

‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटापासून अभिनयक्षेत्रात आलेली ही देखील उच्चशिक्षित आहे. तिने युनायटेड किंग्डमच्या मॅन्चेस्ट स्कूल ऑफ बिझनेसमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्स या विषयात ट्रिपल ऑनर्स डिग्री घेतली आहे.

सोहा अली खान

सोहाने आपल्या आईचा कित्ता गिरवून सिनेक्षेत्रात पदार्पण केलं खरं, पण आई शर्मिला टागोर इतकं मोठं यश काही तिला लाभलं नाही. पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र ती बॉलिवूड आणि आपल्या कुटुंबियांमध्ये खूपच शिक्षण घेतलेली तरुणी आहे. तिने परदेशात शिक्षण घेतलं. ऑक्सफर्ड येथील बेलीऑल कॉलेजातून मॉडर्न हिस्ट्री या विषयात पदवी मिळवली आहे. नंतर तिने लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक सायन्स मधून इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयात मास्टर्स डिग्री मिळवली आहे. पण या चांगल्या शिक्षणाचा सदुपयोग न करता ती बॉलिवूडमध्ये डेरेदाखल झाली आहे.

प्रीति झिंटा

‘दिल से’ या रोमॅन्टिक चित्रपटाद्वारे प्रीति २००० साली चित्रसृष्टीत आली. नंतर एकाहून एक यशस्वी चित्रपटांची ती नायिका झाली. त्यामुळे ती दर्जेदार अभिनेत्रींच्या रांगेत येऊन बसली. पण ती उच्चशिक्षित आहे, हे विसरता येत नाही. सेंट बेडे कॉलेजातून तिने इंग्रजी या विषयात पदवी मिळवली आहे. पुढे क्रिमिनल सायकॉलॉजी घेऊन मास्टर्स डिग्री घेतली आहे.

सारा अली खान

आपल्या बबली आणि देखण्या रुपाने साराने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचं हे मोहक रूप आणि आत्मविश्वास याच्यामागे आहे तिचं उच्च शिक्षण. मुंबईच्या बेसेंट मॉन्टेसरी स्कूल मधून तिनं शिक्षण घेतलं आणि न्यूयॉर्क येथील कोलंबिया युनिव्हर्सिटीतून हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स या विषयात पदवी मिळवली आहे.

दिशा पटणी

चांगली अभिनेत्री आणि उत्कृष्ट नर्तिका असलेल्या दिशा पटणीला ‘बेफिक्रे’ या व्हिडिओ गाण्यातून प्रसिद्धी मिळाली. त्यामध्ये तिचा खास दोस्त टायगर श्रॉफ होता. नंतर तिने काही चित्रपट केले. ती लहानपणापासूनच शिक्षणात हुशार होती. तिने इंदूरमधून कम्प्यूटर सायन्स विषयात बी. टेक. ही पदवी मिळविली आहे.

कृती सनोन

‘हिरोपंती’ या चित्रपटातून २०१५ साली कृती सनोनने चित्रसृष्टीत पदार्पण केलं. त्यात तिच्या अभिनयाची तारीफ झाली. तिने नोएडा येथील जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेतून इलक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन या विषयात बी. टेक. पदवी मिळवली आहे. कॉलेज करत असतानाच तिने मॉडेलिंग व अभिनय स्पर्धेत बाजी मारली होती.

अनुष्का शर्मा

अनुष्काने ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यात तिला शाहरुख खानची नायिका होण्याची सुवर्णसंधी लाभली होती. या चित्रपटाच्या यशाने ती लगोलग स्टार बनली. नंतर अनेक चित्रपटातून ती गाजली. तिचे वडील लष्करात होते. त्यामुळे आर्मी स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. माऊंट कार्मेल कॉलेजातून बी. ए. केलेलं आहे.