योनिमार्गाच्या समस्या आणि त्यावरील उपाय जे प्रत...

योनिमार्गाच्या समस्या आणि त्यावरील उपाय जे प्रत्येक स्त्रीला माहीत असायला हवेत (8 Vaginal Problems Every Woman Should Know About)

काही गोष्टी न बोलण्याने समस्या सुटत नाहीत तर वाढतात. जसे स्त्रिया आपल्या गुप्तांगाच्या आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. विशेषतः योनीबाबतच्या समस्या सांगताना त्यांना संकोच वाटतो. खरं तर या समस्या उपचार न करता येण्याइतक्या मोठ्या नसतात. स्त्रियांच्या योनीसंबंधी समस्यांवरील काही प्रश्नांना डॉ. सुषमा श्रीराव यांनी दिलेली उत्तरं आपण पाहणार आहोत.

१.स्वच्छता राखूनही योनीभागात दुर्गंधी येणे

योनिमार्गास जंतुसंसर्ग झाल्यास दुर्गंधी येते. काही वेळेस हे फंगल किंवा ट्रायकोमोनीसिस इन्फेक्शन असते. यात योनिस्राव होतो. जंतुसंसर्ग झाला असल्यास स्रावाचा रंग पांढरट, पिवळसर असतो, तेच ट्रायकोमोनीसिस इन्फेक्शन असल्यास पांढरट स्रावासोबत हिरवट रंगही येतो. लैंगिक संबंधातून हे संसर्ग उद्भवत असून अँटीफंगल किंवा अँटीबॅक्टेरिल औषधं घेतल्याने या समस्या दूर होतात. याशिवाय दररोज भरपूर पाणी आणि सौम्य साबणाने योनीची स्वच्छता राखावी. शौचानंतर आणि लघवीनंतर पाण्याने स्वच्छता ठेवल्यास लघवी (मूत्र मार्गाचा) किंवा योनीचा जंतुसंसर्ग होणार नाही.

२.सॅनेटरी नॅपकिन्समुळे रॅशेस येतात आणि टॅम्पूनही त्रासदायक आहेत

आजकाल जवळजवळ सर्वच स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी सॅनेटरी नॅपकिन्सचा वापर करतात. शाळेत-कॉलेजात जाणाऱ्या मुली अल्ट्राथिन सॅनेटरी पॅड्‌स वापरणे पसंत करतात. कारण ते सारखे बदलावे लागत नाही. तसेच हे पॅड्‌स पातळ असल्याने वापरण्यासही सोयीस्कर जातात. या अल्ट्राथिन पॅडमध्ये जेलीसारखा पदार्थ असतो, जो मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्तस्राव बाहेर येऊ देत नाही आणि त्यामुळे पॅडचा ओलसरपणा जाणवत नाही. सुकेपणाच्या अनुभवामुळे बराच वेळ पॅड बदलले जात नाही. अशा वेळी पॅड सतत त्वचेला लागून तेथे खाज येते किंवा रॅशेस येतात. टॅम्पून्सच्या वापराने योनिला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे ते त्रासदायक ठरते. तेव्हा ते न वापरणेच चांगले. त्याऐवजी रॅशेसचा त्रास होऊ नये म्हणून कॉटनच्या सॅनेटरी पॅड्‌सचा वापर करा आणि दर चार तासाने हे पॅड बदला.

३.योनिमार्गात लहान पांढऱ्या रंगाचे पिंपल्स येतात, यामुळे लैंगिक संबंधावर परिणाम होतो का?

व्हायरल स्किन इन्फेक्शनमुळे सफेद पिंपल्स येतात. कधी कधी शेविंग केल्यानंतरही असे पिंपल्स येऊ शकतात. दोन्ही परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक्स घेऊन ही समस्या दूर करता येते. काही वेळेस लैंगिक संबंधातून ही समस्या होऊ शकते किंवा हे नागिणचं लक्षणही असू शकतं. तेव्हा लगेचच डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावा.

४.सॅटिन किंवा सिंथेटिक अंतर्वस्त्रांमुळे खाज येते.

आपल्या देशातील हवामानात आर्द्रतेचं प्रमाण असतं त्यामुळे येथे सूती अंतर्वस्त्रे वापरण्याचा सल्ला दिला जातो. सॅटिन किंवा सिंथेटिक पँटीजमुळे अथवा सॅनेटरी पॅड्‌सच्या ॲलर्जीमुळे खाज येणे ही सामान्य बाब आहे. असं होऊ नये यासाठी यौनांगास पाण्याने सारखे स्वच्छ धुवा तसेच मेडिकेटेड पावडर लावा. कधी कधी जंतुसंसर्गामुळेही खाज येत असते. औषधांमुळे ती बरी होते. यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे अंतर्वस्त्रे नेहमी शंभर टक्के सुती असावीत म्हणजे घाम शोषला जाईल. शिवाय भरपूर पाण्याने नियमित स्वच्छता करणे आवश्यक असते.

५. लघवी पास होणे

काही स्त्रियांना हसताना, खोकताना वा व्यायाम करत असताना लघवी पास होते. प्रसूतीनंतर जननेंद्रियाच्या स्नायूंमध्ये शिथिलता येते तसेच स्थूलतेमुळे स्नायूंमधील क्षमता कमी झाल्याने हा आजार होऊ शकतो.  सर्वसाधारणपणे प्रसूतीनंतर ६ महिन्यांनी ही समस्या दूर होते. जर त्यानंतरही ही समस्या कायम राहिली तर मूत्रमार्गावरील स्नायूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यायामाची एक पद्धत प्रचलित आहे त्याला केगल व्यायामपद्धती म्हणतात. याचा मूत्राशयाजवळचे स्नायू बळकट करण्यासाठी उपयोग होतो.

६. मासिक पाळीच्या पहिल्या आठवड्यात अंगावरून पांढरा स्राव जाणे आणि अशक्तपणा येणे

मासिक पाळी सुरु होण्यापूर्वी अंगावरून पांढरा स्त्राव जाणे ही सामान्य बाब आहे. प्रोजेस्ट्रॉन हार्मोनमुळे हे घडते. या स्रावाला दुर्गंध येत नसेल वा यामुळे खाज येत नसेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. या स्रावामुळे अशक्तपणा येतो, असं म्हणणं चुकीचे ठरेल. असे होत नाही. मासिक पाळी येण्यापूर्वी मानसिक तणावामुळे असे जाणवू शकते.

७. लैंगिक संबंधानंतर लघवी करणे योग्य आहे का?

काही स्त्रियांना लैंगिक संबंधानंतर जळजळ होते. योनीमध्ये कोरडेपणा आल्यामुळे वा यीस्ट इन्फेक्शनमुळे असे होते. या दोन्ही परिस्थितींमध्ये वारंवार लघवीसाठी जावे लागते. यास ‘हनीमून सिस्टाइटिस’ असंही म्हणतात. स्त्रीरोग तज्ज्ञाकडून तपासणी करून या समस्येवर इलाज करता येतो. तसेच लैंगिक संबंधानंतर एखाद वेळेस लघवी होणं सामान्य बाब आहे.

८. बिकनी वॅक्सिंगनंतर पिंपल्स येतात

बिकनी वॅक्सिंगमध्ये गुप्तांगाच्या ठिकाणच्या केसांचे वॅक्सिंग केले जाते. मॉडेल्स आणि नट्या असे करतात. आत्ताच्या तरुण पिढीमध्ये बिकनी वॅक्सचा ट्रेंड आला आहे. बिकनी वॅक्स करण्याच्या एक तास आधी पेनकिलर घ्यायची असते.  तसेच वॅक्सिंगनंतर चुकूनही सिंथेटिक निकर वापरायची नाही, सुती निकर वापरावी. पिंपल्स येत असतील तर अँटीबायोटीक्स घ्यावी लागते. असहनशील बिकनी वॅक्सिंग व्यतिरिक्त स्वच्छतेसाठी, शेविंग, ट्रिमिंग आणि लेसर इत्यादी उपचारपद्धती अवलंबणे सुलभ जाते.