नवऱ्याने पुऱ्या कराव्यात अशा बायकोच्या ८ अपेक्ष...

नवऱ्याने पुऱ्या कराव्यात अशा बायकोच्या ८ अपेक्षा (8 Desires of Every Wife From Her Husband)

नवरा-बायकोचा संसार सुरू झाला की, कधीतरी संघर्षाचे क्षण येतात. याला मुख्य कारण म्हणजे नवरेमंडळींचं बायकोकडे होणारे दुर्लक्ष. बायकोच्या आपल्या नवऱ्याकडून काही अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ती नाखुश असते. तेव्हा आपली बायको सदैव खुश राहावी, असं वाटत असेल तर समस्त नवरेमंडळींनी तिच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे. सर्वसाधारणपणे त्यांच्या अपेक्षा खालीलप्रमाणे असतात.

  • स्तुती हवी असते, पण सांगू शकत नाही

तुमची बायको सजूनधजून एकसारखी आरशात स्वतःला न्याहाळत असते. कारण तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही तिच्याकडे नीट बघाल, तिचे कपडे – दागिने आणि सौंदर्याची स्तुती कराल, अशी तिची माफक अपेक्षा असते. पण तुम्ही नेमके चुकता. मग तिला वाईट वाटते. ती तुमच्यावर नाराज होते. नवऱ्यानं आपलं गुणगान करावं, ही तिची इच्छा ती दाबून ठेवते. व्यक्त करत नाही. पण तुम्ही व्यक्त करायला पाहिजे. बायकोच्या सौंदर्याची तारीफ कराल तर ती सदैव सुखी राहील. अन्‌ तुम्हालाही सुखी ठेवेल.

  • आपली काळजी करावी, ही अपेक्षा

बायकोच्या आजारपणात तुम्ही तिची काळजी घेता का? सर्दी-पडसे किंवा ताप आला तर बरी आहेस का? अशी विचारणा करता का? औषधपाणी देता का? बायकोनं अंथरूण धरलं तर स्वतःच्या हाताने चहा बनवून घेता का? तिला देता का?… बव्हंशी पुरुष याबाबत बेपर्वा असतात अन्‌ तुमच्या अर्धांगिनीच्या नेमक्या ह्याच अपेक्षा असतात हो! तेव्हा तिची काळजी घ्या. नवऱ्याला आपली काळजी आहे, तो आजारपणात आपली सेवा करतो, या भावनेनं ती कमालीची सुखावत असते.

  • नवऱ्याचं गतजीवन जाणून घेण्याची इ्च्छा

कुणाला पटो वा न पटो; पण आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत बायकोला रस असतो. त्याच्या संदर्भातील प्रत्येक बाब जाणून घेण्याची तिची इच्छा असते. मग तो वर्तमानकाळ असो की, भूतकाळ. त्याचे गतजीवन कसे होते, हे जाणून घेण्याची तिला उत्सुकता असते. काही नवरोजी, एक गंमत म्हणून आपल्या पूर्वीच्या मैत्रिणीबद्दल फुशारकी मारतात. अन्‌ इथेच फसतात. कारण त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची बायकोला इच्छा असते. मात्र ती उघडपणे त्याविषयी बोलत नाही. मुळात पती-पत्नीचं नातं विश्वासावर टिकून राहतं. त्यामुळे पतीने आपल्या पत्नीपासून काही लपवू नये. त्याचप्रमाणे पत्नीच्या गतजीवनाबद्दल काही जाणून घेण्याची इच्छा झाली तर तसं तिला विनासंकोच सांगून टाका. सत्य बोला, सत्य समजावून घ्या. म्हणजे तुमचं नातं अधिकच दृढ होईल.

  • रोमान्सच्या अपेक्षा

संधी मिळेल तिथे शारीरिक लगट करणे, अंगाला स्पर्श करणे, हातात हात घेणे, अवेळी मिठी मारणे, घरातील लोकांची नजर चुकवत डोळ्यांनी इशारे करणे, असा वात्रटपणा नवीन लग्न झालेली जोडपी करतात. पुरुषांचा त्यात जरा जास्तच पुढाकार असतो. पण जसजशी लग्नाला जास्त वर्षे होतात, तसतसा हा वात्रटपणा लुप्त होतो. पण हे रोमांचक क्षण अधूनमधून यावेत, अनुभवायला मिळावेत; अशी सुप्त इच्छा जवळपास प्रत्येक बाईच्या मनात असते. तिला राहून राहून वाटत असतं की, लग्नाच्या नवीन नवलाईच्या दिवसात आपला नवरा जसा रोमॅन्टिक होता, तसा सदैव राहावा. तिला ते आवडत असतं. पण ती आपल्या अपेक्षा व्यक्त करत नाही. हे समजून घेत नवऱ्याने रोमॅन्टिकच राहावे.

  • नको असतो अनाहूत सल्ला

काही नवरे आपली बायको बोलत असताना, मधेच तिला तोडत, तू किनई असं कर – तू असं करायला हवं होतंस, असा सल्ला देऊ लागतात. बायकोची नेमकी समस्या काय आहे, ते जाणून न घेता तिला अनाहूत सल्ला देतात. नवऱ्याची ही वाईट सवय तिला आवडत नसते. तरीपण आपली नाराजी ती उघडपणे व्यक्त करत नाही. तिचं असं सोसणं गृहीत धरू नका. अन्‌ तुम्हाला ही वाईट सवय असेल तर सोडा. स्वतःचे वागणे सुधारा. आधी तिचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. समजून घ्या. अन्‌ तिनं मागितला तरच सल्ला द्या. म्हणजे तिला मोकळं वाटेल.

  • सेक्सची आवड-निवड

दुर्दैवाने आपल्या समाजरचनेत सेक्सची चर्चा करण्याबाबत निर्बंध आहेत. या विषयावर महिलावर्गाने चर्चा करणे निषिद्ध मानले जाते. या गोष्टीचा पगडा बव्हंशी महिलांवर असल्याने चर्चा करणे तर दूरच, पण सेक्सच्या आवडीनिवडीबाबत स्त्री आपली इच्छा प्रदर्शित करू शकत नाही. पारंपरिक दडपण व संकोचामुळे ती बोलत नाही. पुरुष जोडीदारानेच बोलावे आणि त्याला हवी तशी कृती करण्यात पुढाकार घ्यावा, या मानसिकतेने ती वागते. आपल्या मनातील सुप्त इच्छा ती प्रकट करू शकत नाही. हे सर्व झुगारून आधुनिक काळातील नवऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, आपल्या बायकोचीही लैंगिक सुखाबाबत काही आवड आहे. तिला मन आहे व तिची मर्जी आहे. अशाने आपले नातेसंबंध निकोप राहतील. दोघांमधील जवळीक अधिक वाढेल.

  • विशेष वागणूक हवी असते

आपण सिनेमात पाहतो की, नायिकेसाठी नायक कारचा दरवाजा उघडतो किंवा हॉटेलात अदबीने खुर्ची ओढून आधी तिला बसायला देतो. या कृतीने तो दाखवून देतो की, नायिकेला अर्थात्‌ स्त्रीला तो विशेष वागणूक देतो. आदराने वागवतो. आपल्या बायकोला देखील आपल्याकडून अशाच आदराची, विशेष वागणुकीची अपेक्षा असते. नेहमी असं करण्याची गरज नाही. पण सुट्टीच्या दिवशी अथवा वेळ मिळेल तेव्हा अशी वागणूक तिला द्यायला हरकत नाही, याशिवाय तिच्या आवडीचा पदार्थ तुम्ही स्वतः बनवा. तिला घास भरवा. सरप्राईज गिफ्ट घ्या. या गोष्टींनी तिच्या अपेक्षा पूर्ण होतील. अन्‌ या छोट्या छोट्या गोष्टींनी नातेसंबंधात प्रसन्नता राहील व ती बळकट होतील.

  • दुःखात हवी पतीची साथ

बायका जेव्हा खूप दुःखी असतात किंवा काही त्रासात असतात तेव्हा त्यांना आधाराची गरज असते. हा आधार अर्थातच्‌ नवऱ्यानं द्यावा, ही त्यांची अपेक्षा असते. तेव्हा आपल्या बायकोवर जर काही संकट आले तर तिच्या मदतीला धावून जा. आधार द्या. जेणेकरून तिची उमेद वाढेल. पण बायकोची ही अपेक्षा फार कमी नवऱ्यांच्या लक्षात येते. त्यांच्या रांगेत तुम्ही बसू नका. जेव्हा कधी तुमची प्रिय पत्नी दुःखी असेल तेव्हा तिला जाणीव करून द्या, की मी कायमच तुझ्या दुःखात सामील आहे. तुझ्या अडचणीच्या काळात मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या या कृतीने अडचणींवर मात करण्याची तिची उमेद वाढेल आणि दोघांमधील नाते शिळे होणार नाही.