साडी नेसताना करू नका या ७ चुका (7 Most Common M...

साडी नेसताना करू नका या ७ चुका (7 Most Common Mistakes To Avoid While Wearing A Saree)

साधेपणात सौंदर्य खुलवणारा, स्त्रीची शालीनता दाखवणारा, तर कधी स्त्रीच्या सौष्ठवाचे दर्शन घडवणारा ग्लॅमरस अवतार धारण करणारा वस्त्रप्रकार म्हणजे साडी. परंतु साडीचं सौंदर्य खुलून येण्यासाठी ती योग्य पद्धतीने नेसली गेली पाहिजे. तुम्हाला साडीची आवड आहे, तर साडी नेसताना या ७ चुका कधीही करू नका.

१) चुकीच्या फिटिंगचा ब्लाऊज

साडीत आकर्षक दिसायचं असेल तर आधी त्याचं ब्लाउज योग्य फिटिंगचं असलं पाहिजे. आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे ब्लाउजचं फिटिंग असावं. दुसऱ्यांचं पाहून सेक्सी वा अतिशय घट्ट ब्लाउज शिवू नये. स्थूल महिलांना जास्त एक्सपोझिव्ह ब्लाउज चांगलं दिसत नाही. तसेच खूप ढिल्लं ब्लाउजही तुमचं लूक बिघडवू शकतात. म्हणूनच एखाद्या चांगल्या टेलरकडून योग्य फिटिंगचं ब्लाउज शिवून घ्या.

२)  घेरवाले परकर

घेरवाले परकर (फ्लेयर्ड पेटीकोट) घालण्याचे टाळा. कारण यामध्ये तुम्ही जाड दिसता, शिवाय साडी सांभाळतानाही त्रास होतो. चांगले दिसण्यासाठी व्यवस्थित फिटिंग असलेला प्लेन परकर घाला.

३) स्टाईलच्या बाबतीत प्रयोग करताना जपून

साडी नेसण्याच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही काही नवीन करू इच्छित असाल तर तुम्हाला साडी नेसण्याची जी पद्धत व्यवस्थित जमते त्याच पद्धतीने नेसा. त्यामुळे तुम्हाला सहजतेने साडीत वावरता येईल. पण तुम्हाला नवीन पद्धतीने साडी व्यवस्थित नेसता येत नसेल, तर कोणताही प्रयोग न करणेच उत्तम किंवा मग ज्यांना साडी नेसवता येते त्यांची मदत घ्या.

४) साडीची योग्य निवड

सरसकट सगळ्या ठिकाणी एकाच तऱ्हेची साडी नेसून चालत नाही. उदाहरणार्थ – आपण ऑफिसमध्ये भरजरी कलाकुसर असलेली साडी नेसून जात नाही. ऑफिसमधील फॉर्मल लूकसाठी कॉटनची किंवा लाइट कलरची, हलकी साडी नेसणेच योग्य ठरते. याउलट घरातील एखाद्या कार्यक्रमासाठी वा लग्नसोहळ्यासाठी हलक्या साडीऐवजी भडक, झगमगीत आणि कलाकुसरीच्या साड्यांना विशेष पसंती दिली जाते.

५) चप्पलची निवड

साडीसोबत चुकूनही कॅज्युअल प्लॅटफॉर्मची हिल किंवा वेजेस घालू नका. तसेच सपाट चप्पल आणि स्लिपर्स घालण्याची देखील चूक करू नका. तुम्हाला आकर्षक दिसायचं असेल तर उंच टाचांची सँडल आणि छोटी टाच असलेली सँडल घाला. यामुळे तुम्ही बारीक आणि उंच दिसाल.

६) जड दागिने

लग्नसमारंभ सोडून इतर कार्यक्रमांसाठी साडीवर जड दागिने घालू नका. आपल्या आवडत्या शिफॉन साडीवर तुम्ही गळाभर सोन्याचे दागिने घालून कसे दिसाल, याची कल्पना करून पाहा. स्मार्ट दिसायचं असेल तर मोठे झुमके आणि मोठे लोंबते कानातले घालण्याऐवजी छोटे कानातले घाला. डझनभर बांगड्या घालण्याची गरज नाही. त्यापेक्षा हातात हलकं ब्रेसलेट आणि गळ्यात जड नेकलेसच्या जागी छोटं पेंडंट असलेली बारीक चेन घाला. यामुळे तुम्ही सुंदर तर दिसालच शिवाय तरुणही दिसाल.

७) पिनांचा वापर

साडी नेसल्यानंतर ती नीट बसावी आणि आपल्याला त्यात व्यवस्थित वावरता यावं म्हणून आपण साडीला जिथेतिथे पिना लावतो, यात चुकीचं काहीच नाही. परंतु पिना लावताना त्या बाहेर डोकावणार नाहीत याची काळजी घ्यावयास हवी. नाहीतर साडीतून बाहेर दिसणाऱ्या पिनांमुळे आपल्याला सगळ्यांसमोर लाजिरवाणे वाटू शकते. हलक्या साड्यांना जास्त पिना लावण्याची गरज नसते. जास्त पिनांमुळे ती फाटू शकते.