७ स्टार्संनी घेतला पंगा, शेजाऱ्यांनी दाखविला पो...

७ स्टार्संनी घेतला पंगा, शेजाऱ्यांनी दाखविला पोलिसांचा इंगा (7 Bollywood Stars Whose Neighbours Had Filed Police Complaint Against Them)

बॉलिवूडच्या या ७ सिताऱ्यांनी आपली लाईफस्टाईल, त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या अन्‌ उद्धटपणा दाखवून शेजाऱ्यांशी कधी पंगा घेतला होता. पण शेजाऱ्यांनी त्यांना पोलिसांचा इंगा दाखवला अन्‌ वठणीवर आणले. अशा फिल्मी सिताऱ्यांचा हा पूर्वेतिहास. यामध्ये कपूर आडनावाचे चौघेजण आहेत.

रणबीर कपूर

रणबीर आता आलिया भट्टशी कमिटेड रिलेशिनशिपमध्ये असला तरी यापूर्वी त्याने अन्य अभिनेत्रींशी मधूर संबंध ठेवले आहेत. याशिवाय त्याने एकट्याचे जीवन धमाल एन्जॉय केलेले आहे. तो सदैव लेट नाइट पार्टीज्‌ देत असे. त्याच्या फ्लॅटमध्ये नेहमीच रात्री उशिरापर्यंत मित्र-मैत्रिणींची मैफल जमत असे. अगदी पहाटेपर्यंत पार्ट्यांची धमाल चालायची. या पार्ट्यांमध्ये गाणीबजावण्यास उधाण यायचे. मोठ्या आवाजात स्पिकरवर गाणी वाजवून नाच चालायचे. त्याच्या कर्कश आवाजाने शेजारपाजारचे लोक कमालीचे डिस्टर्ब व्हायचे. त्याला वैतागून त्या लोकांनी पोलिसांत तक्रार गुदरण्याची धमकी दिली. तेव्हा कुठे रणबीरमध्ये सुधारणा झाली. त्याने लेट नाईट पार्टीज्‌चा आपला गोंधळ नियंत्रित केला.

करीना कपूर

रणबीरची चुलत बहीण करीना कपूरने देखील अशाच प्रकारे शेजाऱ्यांशी पंगा घेतला होता. अन्‌ शेजाऱ्यांनी तिला देखील पोलिसांचा इंगा दाखवला होता. झालं असं होतं की, पाच वर्षांपूर्वी करीनाने आपल्या घरी ‘की एंड का’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. त्यामध्ये बरेच फिल्मी सितारे सामील झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यँत त्यांची पार्टी रंगली. या पार्टीतला गोंधळ इतका वाढला की शेजाऱ्यापाजाऱ्यांना कमालीचा त्रास झाला. त्यांनी सरळ पोलिसांना पाचारण केलं. त्यांनी येऊन दम दिल्यानंतर करीनाने पार्टी आवरती घेतली.

शाहीद कपूर

शाहीद कपूरला देखील त्याच्या शेजाऱ्यांनी पोलिसी इंगा दाखवला होता. शाहीद आपल्या जुहू येथील फ्लॅटचे नूतनीकरण करत होता. ते काम बरेच महिने चालले होते. पण त्याच्याने कचरा साठायचा, धूळ उडायची, यंत्रांचे व ठोकाठोकीचे आवाज उठायचे. या कारणांनी त्याच्या शेजारचे लोक कंटाळले होते. तशातच ही कामं करणारे कामगार इमारतीच्या भिंतींवर लघवी करतात, अशी शेजाऱ्यांची तक्रार होती. या सर्व कारणांनी वैतागून जाऊन शेजाऱ्यांनी शाहीद विरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.

शक्ती कपूर

शक्ती कपूरच्या घटना तशा जुन्या आहेत. पण त्याच्या हरकतींनी शेजाऱ्यांच्या नाकात दम आणला होता. कारण त्याची कृत्ये लाजिरवाणी होती. त्याच्या शेजाऱ्यांचा आरोप होता की, शक्ती रात्री उशिरा पार्टीहून परत येतो, तेव्हा त्याला भान नसते. तो लिफ्टमध्ये सू-सू करतो. इतकेच नव्हे तर कॉरिडॉरमध्ये तो विवस्त्र होऊन फिरतो, असाही आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. शेजारपाजाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे हे दुर्वर्तन चालूच राहिले. तेव्हा बिल्डींगच्या लोकांनी शक्ती विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. तेव्हा कुठे त्याचे डोळे उघडले. अन्‌ त्याने सगळ्यांसमोर आपली चूक कबूल केली व त्यांची क्षमा मागितली. तेव्हा कुठे हे प्रकरण मिटलं.

आदित्य पंचोली

आदित्य पंचोली हा अनेकवार वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नट आहे. कारण तो हरकतीच तशा करतो. शेजाऱ्यांशी तो अनेकदा भांडला आहे. एकदा हे भांडण पराकोटीला पोहोचलं, की आदित्यने मारपीट केली. त्यावर शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. झालं असं होतं की, आदित्यकडे पाहुणे आले होते. त्यांनी आपली मोटारगाडी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका गृहस्थाच्या पार्किंग लॉटमध्ये ठेवली. याचा जाब विचारण्यासाठी तो गृहस्थ आदित्यकडे गेला, तर आदित्य त्याच्याशी जोरजोरात भांडला. ते वाढून दोघांमध्ये गुद्दागुद्दी झाली. त्यात आदित्यने शेजाऱ्याचे नाक फोडले. साहजिकच आदित्यविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थी केली तेव्हा हे प्रकरण मिटलं.

ऐश्वर्या राय

सलमान खानने ऐश्वर्या रायवर किती जीव टाकला होता, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यांच्या प्रेमाचा अंत वाईट रीतीने झाला. त्या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली, तेव्हाची ही घटना आहे. ऐश्वर्या आपल्याला दाद देत नाही, हे पाहून चिडून जात सलमानने मध्यरात्री तिच्या घरासमोर मोठा गोंधळ घातला होता. त्याने इतका आरडाओरडा केला की, ऐश्वर्याचे शेजारीपाजारी वैतागले. त्यांनी ऐश्वर्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली होती.

प्रिटी झिंटा

हिच्याविरुद्ध देखील बिल्डींगच्या रहिवाशांनी पोलिसात तक्रार केली होती. प्रिती मुंबईच्या घरी राहत होती, तेव्हाची ही घटना आहे. ती पाय मोकळे करायला इमारतीच्या आवारात असलेल्या बागेत जायची. सोबत तिचे बॉडागार्ड असायचे. तिथे लहान मुले खेळत असायची. त्यांना हे बॉडीगार्ड धाक दाखवून पळवून लावायचे. त्यांच्या या हरकतींना कंटाळून बिल्डींगच्या लोकांनी प्रिटी विरुद्ध पोलिसात तक्रारी केल्या होत्या.