महागड्या सायकलींचा शौक असलेले बॉलिवूडचे ७ कलाका...

महागड्या सायकलींचा शौक असलेले बॉलिवूडचे ७ कलाकार (7 Bollywood Stars Who Own The Most Expensive Cycles)

आपल्या बॉलिवूडच्या कलावंतांना ऐषारामी जीवन जगायचे असते. त्यामुळे ते आलिशान बंगले, उंची पार्ट्या देणे, महाग कपडे, चढ्या किंमतीच्या मोटारगाड्या यांचा शौक करतात. पण यामध्ये, आमच्या माहितीत ७ असे कलाकार आहेत, ज्यांना सायकलींचा भारी शौक आहे. आणि ही सायकल म्हणजे, आपल्या लोकांसारखी नव्हे, तर अत्यंत भारीची असते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण त्यांच्या या साध्या दिसणाऱ्या सायकलींची किंमत लाखोंच्या घरात आहे.

तेव्हा आजच्या जागतिक सायकल दिनानिमित्त या महागड्या सायकली बाळगणाऱ्यांची खबरबात घेऊयात.

रणबीर कपूर

काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूर, आपल्या नव्या, लालचुटुक रंगाच्या सायकलवर, मास्क लावून, शहरामध्ये फिरताना दिसला होता. त्याने ही मॅटएक्स फोल्डेबल एक्स बाईक १ लाख ४६ हजार रुपये देऊन विकत घेतली आहे. मॅट एक्स बाईक ही जगातील सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक सायकल गणली जाते. तिच्यात १००० वॅट क्षमतेची पॉवरफुल मोटर आहे. तसेच स्मार्ट एलसीडी डिस्प्लेसह खूप सारे फिचर्स तैनात आहेत.

सलमान खान

सलमान खानला मोटारींप्रमाणेच महागड्या सायकलींचा चांगलाच शौक आहे आणि तो मुंबईच्या रस्त्यांवर बरेच वेळा सायकल फिरवताना दिसतो. त्याला सायकलस्वारी खूप आवडते. सायकलवरील या प्रेमामुळे त्याने आपल्या बिईंग ह्यमुन या ब्रॅन्डखाली एक सायकल सादर केली आहे. याच ब्रॅन्डची सायकल चालवताना तो दिसतो. या सायकलीची किंमत ४० ते ५७ हजार रुपयांपर्यंत आहे.

शाहिद कपूर

शाहिद कपूरला देखील सायकल चालविण्याचा भारी शौक आहे. सायकल चालवत असल्याचा एक फोटो त्याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात दिसणारी इलेक्ट्रीक सायकल डुकाटी स्क्रॅम्बलर ११०० ही आहे. ही सायकल खूपच वेगळी आहे. अन्‌ या सायकलीची किंमत अडीच ते ३ लाख रुपये दरम्यान असते. या स्टायलिश सायकलवर शाहिद बरेचदा रस्त्यांवरून फिरताना दिसला आहे.

सारा अली खान

सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम ही भाऊ-बहिणीची जोडगोळी लॉकडाऊनच्या काळात सायकलवर फिरताना लोकांना दिसली आहे. साराकडे यू ब्रॅन्ड चॅसिसची वोग या ब्रॅन्डची सायकल आहे. तिची किंमत १५ हजार रुपये आहे.

आयुशमान आणि ताहिरा खुराना

आयुशमान आणि ताहिरा खुराना हे दोघेही सायकलचे शौकीन आहेत. चंदिगडमध्ये राहत असताना हे जोडपे दररोज सायकलिंग करायचे. आपल्या नियमित फिटनेसचा तो एक भाग आहे, असं ते सांगत. ताहिरा पॉकेट फ्रेंडली फायरफॉक्स स्निपर डी, ही सायकल चालवते. तिची किंमत २० ते ३० हजार रुपयांपर्यंत आहे. तर आयुशमानकडे तिच्यापेक्षा वरचढ सायकल आहे. त्याच्याकडे असलेल्या स्कॉट सायकलची किंमत ३ ते ६ लाख रुपये दरम्यान आहे.

सूरज पंचोली

‘हिरो’ या चित्रपटातून दाखल झालेला सूरज पंचोली बरेचदा सायकल स्वारी करताना आढळतो. कारण त्याला सायकल चालविण्याची खूपच आवड आहे. तो दररोज सायकल चालवतो. त्याच्याकडे फॅक्टर ०२ मियामी ब्लू आणि बिईंग ह्युमन बीएच १२ अशा दोन सायकली आहेत. यापैकी फॅक्टर ब्रॅन्डचे निर्माते जगातील सर्वाधिक महागडी रोड बाईक्स बनविण्यात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सुरज पंचोलीकडे जी फॅक्टर मियामी ब्लू सायकल आहे, तिची किंमत साडेपाच लाखांपासून सुरु होते. जी ८ लाख रुपयांपर्यंत जाते. त्याशिवाय सूरजने आपली ही सायकल कस्टमाईज करून घेतली आहे. त्यावर त्याने केलेला खर्च वेगळाच आहे.

डेझी शाह

‘जय हो’ आणि ‘रेस ३’ या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेल्या डेझी शाहला महागड्या सायकलींची आवड आहे. तिच्याकडे बिईंग ह्युमन ही इलेक्ट्रीक सायकल आहे. ती प्रिमियम सायकल असून तिची किंमत ३० ते ४० हजार रुपयांच्या दरम्यान आहे.