फिटनेसला प्राधान्य देणारे ७ सितारे (7 Bollywood...

फिटनेसला प्राधान्य देणारे ७ सितारे (7 Bollywood Actors Who Are Fitness Freak)

बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत आपली प्रतिमा प्रेक्षकांसमोर आहे तशी राहावी म्हणून काही सितारे जीवतोड मेहनत घेतात. आपलं शरीर सुडौल राहावं, व्यक्तीमत्त्व टिकून राहावं, म्हणून व्यायामाला ते महत्त्व देतात. फिटनेसला प्राधान्य देणारे बॉलिवूडचे ७ सितारे असे आहेत.

हृतिक रोशन

देखणेपणा आणि देहसंपदा अद्यापही राखून असलेला कलाकार आहे हृतिक रोशन. कारण तो आपल्या फिटनेसबाबत अतिशय जागरूक आहे. इतका की, शूटिंग चालू असताना, वेळ मिळाला की तो वर्कआऊट करतो. हृतिकने आपल्या घरी अद्यावत्‌ जिम बनवलं आहे. त्यामधे फिटनेसची सर्व आधुनिक यंत्रणा आहे. तो दररोज तिथे कसून मेहनत करतो.

दिशा पटनी

तरुण आणि गुणवान अभिनेत्री दिशा पटनी आपल्या हॉट, स्टायलिश वागण्याबरोबरच सेक्सी शरीरयष्टीसाठी देखील लोकप्रिय आहे. आपला हा फिटनेस राखण्यासाठी ती कसून मेहनत घेते. आपली शरीरयष्टी डौलदार राखण्यासाठी ती जास्तच व्यायाम करते. तिचे हे प्रयत्न तिची फिगर पाहून दिसून येतात.

सलमान खान

सलमान खानचं शर्ट काढलेलं अर्ध अनावृत्त व कमावलेलं शरीर पाहून थिएटरात प्रेक्षक शिट्ट्या वाजवतात. आपली ही कमावलेली देहयष्टी टिकवून ठेवण्यासाठी तो जीवतोड मेहनत करतो. दररोज १ हजार पुश अप्स्‌ आणि २ हजार सिट अप्स्‌ तर तो काढतोच काढतो. शिवाय नित्यनेमाने २ तास वर्कआऊट आणि सायकलिंग पण सलमान करतो.

आमीर खान

मिस्टर परपेक्शनिस्ट अशी प्रसिद्धी पावलेला आमीर खानला हे नाव पडलं कारण तो प्रत्येक भूमिका परफेक्ट करतो. अर्थात त्यासाठी भरपूर मेहनत घेतो. अशीच मेहनत तो आपल्या फिटनेससाठी घेतो. तो दररोज ३ तास वर्कआऊट करतो. हा फिटनेस राखण्यासाठी तो रात्री ८ वाजल्यानंतर साखरेचे वा कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ अजिबात घेत नाही.

शिल्पा शेट्टी

आपली सडपातळ शरीरयष्टी राखून असलेली शिल्पा शेट्टी चाहत्यांची अतिशय आवडती राहिली आहे. जसजसे तिचे वय वाढते आहे, तसतशी ती अधिकच सुंदर दिसते आहे. अन्‌ अधिकच तंदुरुस्त वाटते आहे. आपला हा फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी ती व्यायाम आणि योगसाधना नियमित करते. शिवाय ती आपल्या आहाराचे संतुलन राखून आहे. शिल्पा आठवड्यातून ५ दिवस व्यायाम आणि योगासने करते अन्‌ लो पॉवर योगा करते.

शाहीद कपूर

शाहीद कपूरने आपल्या शरीरात आमूलाग्र बदल केला आहे. त्यामुळेच तो नृत्य आणि अभिनयाबरोबरच त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध आहे. शाहीद आठवड्यातून ६ दिवस वर्कआऊट करतो. त्यामध्ये कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगवर जास्त भर देतो. अन्‌ वेगन डाएटचे पण पालन करतो.

मलायका अरोरा

बॉलिवूडची सर्वाधिक फिट आणि हॉट अभिनेत्री अशी मलायकाची ख्याती झालेली आहे. जिम, पिलाटे आणि योग स्टुडिओच्या बाहेर अगदी स्टायलिश पद्धतीने ती आपले फोटो शेअर करत असते. तिच्या फिट आणि कमनीय शरीरयष्टीचे सर्वांनाच आकर्षण आहे. फिटनेस आणि फिगर बाबत तिने जी जपणूक केलेली आहे, त्याने सर्वसाधारण तरुणींना आणि चित्रउद्योगातील इतर नट्यांना प्रेरणा मिळते. आपली फिटनेसची दिनचर्या ती कधीच बिघडू देत नाही. अगदी लांबच्या विमान प्रवासात देखील ती बसल्या बसल्या स्ट्रेचिंग करते.