या ७ टी. व्ही. कलाकारांनी साकारली सीता : प्रेक्...

या ७ टी. व्ही. कलाकारांनी साकारली सीता : प्रेक्षकांनी त्यांना दिली पसंती (7 Actresses Who Played The Role Of Seeta On Television: Audience Showered Love On These Onscreen Seeta)

अलौकिक देसाई यांच्या चित्रपटात सीतामाईची भूमिका करण्यासाठी करीना कपूरने १२ कोटी रुपये मानधनाची मागणी केली, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. करीनाला ही भूमिका देऊन जर हा चित्रपट तयार झालाच तर तिच्यावर आणि या चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याचे वृत्त आले आहे. सीतामाईची भूमिका करण्यावरून इतकी टोकाची भूमिका लोकांनी घेतली आहे. परंतु टी. व्ही. वरून आजवर जेवढी रामायणाची कथानके सादर झाली, त्यामध्ये सीता साकारणाऱ्या कलावतींना मात्र प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. त्यांच्यावर खूप प्रेम केले आहे. यापैकी काही जणींना मात्र टिकेला तोंड द्यावे लागले होते.

दीपिका चिखलीया

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेस कमालीची लोकप्रियता लाभली होती. गेल्या वर्षी कडकडीत लॉकडाऊन असताना या मालिकेस दूरदर्शनवरून पुर्नप्रक्षेपित करण्यात आलं, तेव्हा लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. या मालिकेत राम झाला होता अरुण गोविल. तर सीता झाली होती, दीपिका चिखलीया. या दीपिकाला आजही सीता म्हणूनच लोक ओळखतात.

स्मृती इराणी

यानंतर बी. आर. चोप्रा व रवि चोप्रा यांनी ‘रामायण’ मालिकेची निर्मिती केली. यामध्ये श्रीरामाची भूमिका नितीश भारद्वाजने तर सीतेची भूमिका स्मृती इराणीने निभावली होती. या मालिकेस, पहिल्या रामायणाचे यश लाभले नाही, पण श्रीराम म्हणून नितीश भारद्वाज आणि सीता म्हणून स्मृती इराणीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली.

देबिना बनर्जी

रामानंद सागर यांचे सुपुत्र आनंद सागर यांनी २००८ साली पुन्हा रामायणाची निर्मिती केली. या मालिकेत श्रीरामाची भूमिका गुरमीत चौधरी याने तर सीतेची भूमिका देबिना बॅनर्जीने केली होती. हे रामायण चांगलेच गाजले. अन्‌ देबिनाची सीता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

रुबिना दिलैक

मोहित रैनाची प्रमुख भूमिका असलेली ‘देवों के देव महादेव’ ही मालिका खूपच गाजली. या मालिकेत रामायणाचा एक अध्याय दाखवण्यात आला होता. या रामायणात सीता झाली होती रुबिना दिलैक. रुबिना ही बिग बॉस १४ ची विजेती होती. शिवाय ती टी. व्ही. ची छोटी बहू म्हणून ख्यातनाम झाली होती. रुबिनाच्या या लोकप्रियतेमुळे प्रेक्षकांनी तिला सीतेच्या भूमिकेत खूप प्रेम केले.

मदिराक्षी मुंडले

सीता या पात्रास केन्द्रीत करून ‘सिया के राम’ या मालिकेची निर्मिती झाली होती. त्यामध्ये सीता माता झाली होती मदिराक्षी मुंडले. तर भगवान श्रीराम झाला होता, आशीष शर्मा. सीता मातेच्या या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी मदिराक्षीस चांगलीच पसंती दर्शवली.

शिव्या पठानिया

कलर्स वाहिनीवरून प्रक्षेपित झालेल्या ‘राम सिया के लव-कुश’ या मालिकेत सीतेची भूमिका शिव्या पठानियाने सादर केली होती. सीता मातेच्या भूमिकेत शिव्या बऱ्यापैकी शोभली होती.

नेहा सरगम

रामानंद सागर यांनी स्थापन केलेल्या सागर आर्टस्‌ या निर्मिती संस्थेने २०१२ साली रामायण ही मालिका तिसऱ्यांदा बनवली. ‘रामायण: सबके जीवन का आधार’ असे त्या मालिकेचे नाव ठेवण्यात आले होते. या मालिकेत सीता झाली होती नेहा सरगम. मात्र ही मालिका खूप गाजली नाही. त्यामुळे नेहा सरगमची भूमिका गाजली नाही.