संसारात आणि व्यवसायातही भागीदार असलेले बॉलीवुडच...

संसारात आणि व्यवसायातही भागीदार असलेले बॉलीवुडचे 5 पावर कपल्स (5 power couples of Bollywood who are successful business partners in real life)

बॉलिवूडची स्टारमंडळी आपल्या चित्रपटांतून खोऱ्याने पैसा कमावतात आणि ऐषोआरामाचे आयुष्य जगताहेत. परंतु यातील काही स्टार्स असेही आहेत की जे अभिनयाबरोबरच व्यवसायही करत आहेत. एकाचवेळी आपापल्या लाइफपार्टनर्स सोबत व्यवसाय करत आहेत आणि अभिनयाचे क्षेत्रही गाजवत आहेत. अशा दोन्ही क्षेत्रात यशस्वी असलेल्या काही स्टार जोडप्यांबद्दल जाणून घेऊया.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने २००८ मध्ये व्यावसायिक राज कुंद्रा याच्याशी लग्न केले. त्यांच्या वैवाहिक जीवनात जेवढा समंजसपणा आहे, व्यवसायातही ते दोघे तेवढेच चांगले भागीदार आहेत. या जोडप्याने २००८ साली लग्नानंतर लगेचच V8 Gourmet Group मध्ये भागीदारी घेतली होती. मुंबईत ‘बेस्टियन’ नावाचं त्यांचं प्रसिद्ध रेस्टॉरंटही आहे. या रेस्टॉरंटमध्ये दोघांची समान भागीदारी आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या रेस्टॉरंटचे नुतनीकरण केले होते. या व्यतिरिक्त शिल्पा आणि राज यांनी एकत्रितपणे ‘विआन’ नावाची एक इंडस्ट्रीदेखील सुरू केली आहे जी मनोरंजन, गेमिंग आणि ॲनिमेशनमध्ये डिल करते.

विराट कोहली-अनुष्का शर्मा

विराट आणि अनुष्का ही बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील सर्वाधिक आवडती जोडी अलिकडेच पालकत्त्वाच्या एका नवीन जबाबदारीतून जात आहेत. यासाठी दोघांनी आधीच अनेक ब्रँण्डस्‌मध्ये गुंतवणूक करून ठेवली आहे. त्यांचे स्वतःचे NUSH आणि WROGN ब्रँडस्‌ही ते चालवतात. एवढेच नाही तर अनेक कंपन्यांमध्ये दोघांनी बऱ्यापैकी गुंतवणूक केलेली आहे. अलीकडेच विराट आणि अनुष्काने डिजिट या फायनान्स आणि टेक कंपनीमध्ये २.२ करोडची गुंतवणूक केली आहे.

शाहरुख़ खान-गौरी खान

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख़ खान आणि गौरी दोघंही चित्रसृष्टीतील प्रभावशाली जोडपं मानलं जातं. ही दोघं त्यांच्या व्यवसायात यशस्वी भागीदारही आहेत. ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ ही त्यांची स्वतःची प्रोडक्शन कंपनी दोघं एकत्र चालवत आहेत. त्यांच्या या निर्मिती संस्थेने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट बनवले आहेत. शाहरुख आणि गौरी दोघंही आपापल्या कामांत अतिशय यशस्वी आहेत. किंग खान बॉलिवूडचा बादशहा आहे तर गौरी खान देखील सुपरिचित इंटिरियर डिझायनर आहे. तिची ‘गौरी खान डिजाइंस’ नावाची कंपनीही ती चालवत आहे.

ट्विंकल खन्ना-अक्षय कुमार

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार ही जोडीही बॉलीवुडमधील यशस्वी जोडी आहे. खऱ्या आयुष्यात चांगले लाईफपार्टनर तर आहेतच शिवाय चांगले बिझनेस पार्टनरही आहेत. अक्षय आणि ट्विकंल आपलं ‘हरी ओम प्रोडक्शन’ नावाचं प्रोडक्शन हाऊस चालवतात. शिवाय ट्विंकल खन्ना ही उत्कृष्ट लेखिका, इंटिरियर डिझायनर आणि चित्रपट निर्मातीही आहे.

सुनील शेट्टी-माना शेट्टी

सुनील शेट्टीला चित्रपटसृष्टीमध्ये मनासारखं यश मिळालं नाही आणि त्याने स्वतःहून त्यापासून स्वतःला दूर केलं. त्यानंतर त्याने आपली बायको माना शेट्टीसोबत बिझनेसमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि यशही मिळवले. सुनील आपल्या बायकोसोबत रियल इस्टेटीचे काम पाहतो.  ‘एस२’ नावाची त्यांची कंपनीही आहे. सुनील आणि माना यांनी ‘डिस्कवरी खंडाला’ नावाने लग्झरी हॉलिडे होमची साखळी खंडाळ्याला लॉन्च केली आहे. क्रिकेटर रोहित शर्मानेही सुनील आणि मानाच्या या प्रोजेक्टमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. याशिवाय मुंबईत ‘आर हाऊस’ नावाचे त्यांचे लग्झरी होम डेकॉरचे स्टोअर देखील आहे.