5 घरगुती नाइट क्रीम (5 Home...

5 घरगुती नाइट क्रीम (5 Homemade Night Creams)

दिवसा त्वचेसाठी सनस्क्रीन, मॉइश्‍चरायझर जसा गरजेचं आहे, तसंच रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर नाइट क्रीम लावणं गरजेचं आहे.
सूर्याची अतिनील किरणं, धूर, धूळ, माती, प्रदूषण यामुळे हैराण झालेल्या त्वचेला रात्रीच्या वेळी आराम देण्यासाठी आणि त्वचेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी नाइट क्रीम अतिशय आवश्यक आहे. नाइट क्रीमच्या नियमित वापराने त्वचा तरुण, नितळ व उजळ होते. आणि त्यासाठी भरपूर खर्च करण्याची गरज नाही. घरच्या घरी नाइट क्रीम तयार करून, त्याने रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर हलका मसाज करा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल.

1 – ऑलिव्ह ऑईल नाइट क्रीम
ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. ऑलिव्ह ऑईलपासून तयार केलेली नाइट क्रीम त्वचा तरुण आणि मुलायम ठेवण्यास मदत करते. त्यासाठी, अर्धा कप ऑलिव्ह ऑईल, पाव कप व्हिनेगर आणि पाव कप पाणी यांचं एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण स्वच्छ कोरड्या बाटलीत भरून ठेवा.

2 – अ‍ॅपल नाइट क्रीम
संवेदनशील त्वचेसाठी अ‍ॅपल नाइट क्रीम उत्तम पर्याय आहे. यासाठी, एक सफरचंद किसून घ्या. त्यात 1 टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि 2 टीस्पून गुलाबपाणी मिसळून बारीक वाटून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी अ‍ॅपल नाइट क्रीमने त्वचेला मसाज केल्यास, त्वचेला छान चमक येते.

3 – मिल्क नाइट क्रीम
दूध आरोग्यासाठी तर उत्तम आहेच, सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे. त्वचा कोरडी असल्यास, ती मुलायम आणि उजळ करण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर मिल्क नाइट क्रीमने जरूर मसाज करा. त्यासाठी, 3 टीस्पून फेटलेली मलई, अर्धा टीस्पून गुलाबपाणी, अर्धा टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा टीस्पून ग्लिसरीन यांचं एकजीव मिश्रण तयार करा. ही नाइट क्रीम त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्‍चराइज करते.

4 – आल्मंड-ऑलिव्ह नाइट क्रीम
त्वचा अकाली सैल होत असेल, तर आल्मंड-ऑलिव्ह नाइट क्रीमचा वापर करा. यासाठी, 1 टेबलस्पून बदामाचं तेल आणि 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल यांचं एकजीव मिश्रण तयार करा. यामुळे त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं.

5 – अ‍ॅपल-ऑलिव्ह नाइट क्रीम
त्वचा उजळ आणि तरुण दिसण्यासाठी अ‍ॅपल-ऑलिव्ह नाइट क्रीमचा वापर करता येईल. त्यासाठी, एका सफरचंदाचे बारीक तुकडे करून, त्यात अर्धा कप ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि मिश्रण ब्लेंडरमध्ये ब्लेंड करून घ्या. हे मिश्रण अगदी थोडं गरम करा. नंतर आचेवरून खाली उतरवून पूर्णतः थंड होऊ द्या. आता त्यात पाव कप गुलाबपाणी मिसळून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण स्वच्छ कोरड्या काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. रोज रात्र झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहरा, गळा आणि मानेवर लावून हलका मसाज करा. यामुळे त्वचा टोन आणि उजळ होते. तसंच वाढत्या वयाच्या खुणाही कमी होतात.