करोनामुळे चार दिवसांत पती-पत्नीचा मृत्यू, मुलीन...

करोनामुळे चार दिवसांत पती-पत्नीचा मृत्यू, मुलीने पीपीई किट घालून केले आईचे अंत्यसंस्कार (4 Days After Father’s Death Mother Dies Of Corona Virus. Due To No Help Daughter Wears PPE Kit And Buries Her Body Picture Viral)

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात कहर सुरू आहे. पहिल्या लाटेपेक्षाही जास्त बळी दुसऱ्या लाटेत जात असून, धावपळ करूनही अनेकांना आपल्या प्रियजणांचा जीव वाचवण्यात अपयश येताना दिसत आहे. अशा दुर्दैवी परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर एक काळीज पिळवटून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगी पीपीई किट घालून अंत्यसंस्कार करताना दिसत आहे. कोणाची मदत न मिळाल्याने मुलीने स्वतः केले अंत्यसंस्कार.

संकट समयी माणसाची पारख होते असे म्हणतात आणि सध्या आपला संपूर्ण देश अतिशय वाईट परिस्थितीशी झगडत आहे. अशातच सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसलेल्या या फोटोने माणुसकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

बिहार मधील अररिया येथे घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. येथे करोनामुळे चार दिवसांच्या फरकाने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. पंरतु, आई – वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांवर जी परिस्थिती ओढवली आहे, ते ऐकून काळीज हेलावतं. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच ४ दिवसांत आईचाही करोनाने मृत्यू झाला, परंतु त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुणीही मदतीला आले नाही. अशा संकटसमयी मुलांच्या मनाचाही कोणी विचार केला नाही. अशावेळी त्या दाम्पत्याच्या दोन मुली आणि मुलगा यांनी स्वतः पीपीई किट घालून आपलं कर्तव्य बजावत आईचे अंत्यसंस्कार केले. या दुर्दैवी घटनेने, करोना काळात काही माणसं किती संवेदनशून्य झाली आहेत, हे दाखवून दिले आहे.

बातम्यांनुसार, हे कुटुंब बिशनपुर पंचायत येथे राहत होतं. २८ एप्रिलला सदर दाम्पत्याने फॉरबिसगंज येथे स्वतःची करोना चाचणी केली, ज्याचा निकाल सकारात्मक आला होता. त्यानंतर पूर्णिया येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दोघांवर उपचार सुरू होते, परंतु उपचारा दरम्यान आधी पतीचा मृत्यू झाला आणि लगेचच चार दिवसानंतर पत्नीचाही मृत्यू झाला. पतीचे अंत्यसंस्कार पूर्णियामध्ये केले गेले, परंतु पतीच्या निधनानंतर पत्नीची तब्येत अधिक बिघडली, तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती. त्यातच चार दिवसांनंतर पत्नीचाही मृत्यू झाला, तेव्हा तिचं शव गावी नेण्यात आलं. करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समजताच गावातील तसेच समाजातील कुणीही व्यक्ती तिच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाहीत. अशा वेळी त्यांच्या तीनही मुलांनी धाडस करून आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले. 

या मुलांची व्यथा सांगणारे श्रावणी मिश्राचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर करत म्हटलंय, ”पीपीई किटमध्ये दिसत असलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मृत व्यक्तीची मुलगी आहे. चार दिवसांपूर्वी वडिलांना गमावल्यानंतर आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत, म्हणून मुलांनी स्वतःच आईचे शव दफन केले. ही घटना बिहारच्या अररिया जिल्ह्यातील आहे.”

तुम्हीही पाहा श्रावणी मिश्राचं हे ट्वीट –

आईवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सोबतच आपल्याला सांगत आहे की, परिस्थिती कितीही वाईट असली तरी माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. अन्यथा आपण माणूस म्हणवून घ्यायला लायक राहणार नाही.