२५ वर्षांच्या तरुणीने दिला ९ मुलांना जन्म : तिल...

२५ वर्षांच्या तरुणीने दिला ९ मुलांना जन्म : तिला झाल्या ५ मुली आणि ४ मुले (25 Years Old Woman Delivers 9 Babies)

माली या पश्चिम आफ्रिकन देशाच्या नागरिक असणाऱ्या २५ वर्षांच्या एका महिलेने एकाच वेळी ९ बाळांना जन्म दिलाय. डॉक्टरांनी केलेले स्कॅन आणि तपासण्यात महिलेच्या गर्भात सात अर्भक असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. मात्र प्रसुतीवेळी महिलेने ५ मुली आणि ४ मुलांना जन्म दिला आहे. बाळंतीण आणि नऊही बाळं सुखरुप असल्याची माहिती माली सरकारने दिली आहे.

हलिमा सिस्से (Halima Cisse) असं त्या महिलेचं नाव असून मालीच्या सरकारने विशेष व्यवस्था करून त्यांना या डिलीव्हरीसाठी मोरोक्कोला नेलं होतं. तिची अधिकाधिक काळजी घेऊन प्रसुती करण्यासाठी तिला ३० मार्च रोजी मोरोक्को (Morocco) या उत्तर आफ्रिकन देशात स्थलांतरित करण्यात आले होते. मोरोक्कोमधल्या हॉस्पिटलमध्ये ५ आठवडे उपचार घेतल्यानंतर मंगळवारी (4 मे) हलिमा यांची प्रसुती झाली. सिझेरियन डिलीव्हरीने या नऊ बाळांचा जन्म झाला असून सगळ्या बाळांची तब्येत नीट असल्याचं मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.

आई आणि ही बाळं काही आठवड्यांनंतर त्यांच्या मायदेशी परततील, अशी माहिती मालीच्या आरोग्य मंत्री फँटा सिबी यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिली आहे. तसेच सर्व बाळांचा सुखरूप जन्म झाल्याबद्दल मालीचे आरोग्य मंत्री फँटा सिबे यांनी दोन्ही देशांच्या वैद्यकीय पथकांचं अभिनंदन केलंय.

अशा प्रकारे ९ बाळांचा एकाचवेळी जन्म होणं ही अतिशय दुर्मिळ घटना आहे आणि जन्माच्या वेळी किंवा नंतर गुंतागुत निर्माण होण्याची शक्यता असते. अनेकदा यामुळे काही बाळांच्या जिवाला धोका संभवू शकतो. त्यामुळे सिस्से यांचं बाळंतपण हा संपूर्ण माली देशात चर्चेचा विषय झाला होता.