कापूराचे २३ अद्‌भुत फ़ायदे (23 Miraculous Benefi...

कापूराचे २३ अद्‌भुत फ़ायदे (23 Miraculous Benefits Of Camphor (Kapur) You Must Know)

कापूर हा सदाहरित आणि तुळशीच्या खालोखाल ऑक्सिजन देणारा आणि वादळातसुद्धा पाय घट्ट रोवून उभा राहणारा वृक्ष आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम असे कापराचे दोन प्रकार सांगितले जातात. पैकी नैसर्गिक म्हणजे झाडापासून मिळतो तो भीमसेनी कापूर, हा कापूर आपल्याला खाता येतो. आणि दुसरा रसायनांपासून बनविण्यात आलेला कृत्रिम कापूर. हिलिंग गुणधर्माने हा परिपूर्ण असतो. आणि त्यासाठीच तो वापरला जातो. कापूर हा ज्वलनशील तसेच सुगंधी आहे. म्हणूनच पूजाअर्चा, होम हवन करताना वातावरण शुद्ध राहावं याकरिता कापूर जाळतात. कापराचे औषधी गुणही आहेत म्हणूनच आयुर्वेदिक उपचारांसाठी कापूर वापरला जातो.

पोटदुखी, गॅस किंवा पोटात आग होत असेल तर कापूर, ओवा आणि पुदिना सरबतामध्ये घालून प्याल्यास आराम पडतो.

किडलेल्या दातामध्ये कापूर घालून ठेवल्यास दात दुखणे कमी होते.

हृदय कमजोर असल्यास मनुष्य लगेचच घाबरतो, अशावेळी त्याने थोडा कापूर खावा. त्यामुळे त्याच्या नाडीचे ठोके जोरात होऊ लागतात आणि भीतीही जाते.

कॉलरा किंवा पटकी झाल्यास कापराचा अर्क घ्यावा. त्यामुळे फायदा होतो.

विंचवाने दंश केल्यास व्हिनेगरमध्ये कापूर वाटून दंश केलेल्या ठिकाणी लावा. यामुळे विंचवाचे विष उतरते.

केस तुटणे, गळणे, केसात कोंडा होणे अशा केसांच्या समस्या असतील तर खोबरेल तेलामध्ये कापराचे तेल एकत्र करून केसांना लावा. यामुळे नक्कीच फायदा होईल.

नाकाचा घोणा फुटून नाकातून रक्त येत असेल तर गुलाबपाण्यामध्ये कापूर वाटून त्याचे थेंब नाकात घातल्यास रक्त येण्याचे बंद होते.

१० ग्रॅम कापूर, १० ग्रॅम सफेद काथ, ५ ग्रॅम लाल कुंकू एकत्र करून त्यात १०० ग्रॅम तुप घाला. हे मिश्रण काशेच्या ताटामध्ये घेऊन हाताच्या पंजाने व्यवस्थित मळा आणि थंड पाण्याने धुऊन ठेवा. जखम, उष्णतेमुळे चिरा गेल्या असल्यास, खाज आणि जखम पिकली असल्यास त्याठिकाणी हे मिश्रण लावा, लगेचच परिणाम दिसून येतो.

डांग्या खोकला झाला असेल तर कापराचा धुर हुंगा. त्यामुळे नक्कीच फायदा होतो. खोकल्याचा आजार फार जुना असेल तर कापूर आणि ज्येष्ठीमध तोंडात ठेवून चघळा. आराम मिळतो.

नाक बंद झाले असल्यास कापराची पुरचुंडी करून हुंगा. नाक लगेच पूर्ववत होईल.

 • खाज येत असल्यास चमेलीच्या तेलामध्ये कापूर आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून शरीरावर लावा. लगेचच खाज येणे थांबेल.
 • कापूर जाळल्याने डास, माशा पळून जातात.
 • तंबाखू जास्त खाल्ला गेल्यास किंवा तंबाखूचं पान खाल्यास काही व्यक्तींना चक्कर येते वा घाबरल्यासारखे वाटते त्यांनी लगेचच कापराची छोटी वडी खावी. लगेच आराम मिळेल.
 • गाद्या आणि उशांमध्ये कापूर ठेवल्यास ढेकूण होत नाहीत.
 • गोवर आणि कांजण्या यांसारख्या आजारात व्रण सुकल्यानंतर त्यावर खोबरेल तेलात कापूर एकत्र करून लावल्यास थंडावा मिळतो तसेच खाजही निघून जाते.
 • प्रत्येकी १-१ टीस्पून कापूर आणि हिंग वाटून त्याची गोळी बनवा. ही गोळी दम्याचा ॲटॅक आल्यानंतर रोग्यास दोन दोन तासांनी द्या. त्यामुळे दम्याचा ॲटॅक शमतो.
 • सांधेदुखी असेल तर कापूर आणि अफू राईच्या तेलात मिसळून त्याने मालिश करा.
 • टर्पेंटाइन तेलामध्ये कापूर घालून न्यूमोनिया झालेल्या आजारी व्यक्तीच्या छातीवर चोळा. त्यास लगेच आराम पडेल.
 • ताण, डोकेदुखी, नैराश्य इत्यादी समस्यांमध्ये डोक्यावर कापराच्या तेलाने मालिश करा. कापराच्या सुगंधाने डोक्याच्या नसांना आराम मिळतो आणि आपल्याला लगेचच बरे वाटते.
 • चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी दुधात कापूर पावडर घालून ती चेहऱ्यास लावा. थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
 • मुळव्याधीचा त्रास होत असेल तर केळ्यामध्ये चण्याच्या आकाराएवढा कापूर ठेऊन तो खा. फायदा होईल.
 • पायाला भेगा पडत असतील तर गरम पाण्यामध्ये कापूर घालून काही वेळ त्या पाण्यात पाय बुडवून ठेवा.

इजा, जखम झाली, खरचटले किंवा भाजले तर त्या जागी कापूर लावा. जळजळ वा दुखणं लगेच कमी होईल. तसेच कापूर पाण्यात मिसळून ते जखमेवर लावल्यास थंडावा मिळतो तसेच जखम लवकर भरते.