‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या पाचव्या प...

‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वात १६ गायक करणार सुरांची आतषबाजी (16 Talented Singers To Contest Fifth Season Of ‘Sur Nava Dhyaas Nava’ Programme)

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी रसिक श्रोते ज्याची चातकासारखी वाट पहात असतात तो रसिकजनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा… मराठी संगीत रिॲलिटी शोमधील ‘मेरूमणी’ अर्थात कलर्स मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि दर्जेदार कार्यक्रम “सूर नवा ध्यास नवा “- पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे हे ब्रीद समोर ठेवू आपलं पाचवं लखलखतं पर्व घेऊन अवतरत आहे.  १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत  सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं. आणि त्यातून विविध चाचणी फेऱ्यांची कसोटी पार करत सुरेल १६ स्पर्धक आपल्या सुरांचा कस लावण्यासाठी आता सज्ज झाले आहेत.

आता दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची ही खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे. मराठी संगीत क्षितिजावरचे हे उगवते सुरेल १६ गायक, सूर नवा ध्यास नवा – पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रिमियर मध्ये सुरांची आतषबाजी करणार आहेत.

हा कार्यक्रम येत्या रविवारी २४ जुलैला सायं ७ वा. आणि पुढील भाग शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर पाहता येईल.

“सूर नवा ध्यास नवा “या स्पर्धेने आपले वेगळेपण जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. फक्त परीक्षकाच्या भूमिकेतून नाहीतर निर्मात्याच्या भूमिकेतून कार्यक्रमाला लोकप्रिय करण्यासाठी जीव ओतणारे महाराष्ट्राचे जोशिले रॅाकस्टार गायक आणि लाडके संगीतकार अवधूत गुप्ते …. तसंच शास्त्रीय संगीत नव्या पिढीत रूजवण्याचा नि ते जगभर पसरवण्याचा ध्यास घेतलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे.. ही या कार्यक्रमाची अत्यंत महत्वाची बलस्थाने आहेत.

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले की, “लॉकडाऊनच्या काळात सूर नवाचं मागील सत्र अत्यंत जोखीमेचं आणि आव्हानात्मक गेलं. तीन वेगवेगळया प्रातांत फिरून देखील आम्ही ते सत्र यशस्वीरित्या पार पाडलं. आता सगळं पूर्ववत होत असताना संगीताने आपण त्याचा उत्सव साजरा करतो आहे याचा खूप आनंद आहे. सूर नवा ध्यास नवा नेहेमीच चांगलं दर्जेदार संगीत घेऊन येतं. जरी स्पर्धा असली तरी त्याला मैफिलीचं स्वरूप येतं अश्या पध्दतीचा हा निराळा कार्यक्रम आहे. यावेळेस १५ ते ३५ असा वयोगट आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या गावातून मुलं – मुली आली आहेत. जेव्हा ते येतात आपापल्या मातीचा सुगंध, प्रातांची खासियत घेऊन येतात त्यामुळे शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत अशा महाराष्ट्रातल्या वेगळ्या ज्या धारा आहेत, त्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत त्याची मी स्वत: देखील वाट बघतो आहे. या सत्रामध्ये माझ्यासाठी विशेष असं आहे की, प्रत्येक नवीन स्पर्धक जेव्हा येतो तो स्वत:ची नवीन ऊर्जा, नवीन गाणी घेऊन येतो. कुठेतरी आपल्याकडंच सगळ्यात चांगलं देण्याच्या उमेदीने येतो. काही नवीन गाणी यानिमित्ताने मला ऐकायला मिळतात, त्यामुळे मला असं वाटतं मी परीक्षकाच्या भूमिकेत जरी असलो तरी त्या स्पर्धेचे परीक्षण करत असताना मी सुध्दा नवीन गाणी ऐकून, नवीन ऊर्जा मिळून समृध्द होतो आणि चार गोष्टी मलादेखील शिकायला मिळतात.”

कलर्स मराठीच्या कुटुंबाचाच भाग असलेले तसेच कार्यक्रमाचे निर्माते आणि परीक्षक अवधूत गुप्ते म्हणाले, “आम्ही सूर नवा ध्यास नवाचे पाचवे पर्व घेऊन येत आहोत. सूर नवा… सुरू झाल्यापसून आम्ही वेगवेगळ्या पध्दतीने विशेष पर्व केली. या पर्वाचे वैशिष्ट्य असं आहे की, यामध्ये जी गाणी स्पर्धक गाणार आहेत ती फक्त मराठी गाणी असणार आहेत. अर्थात स्पर्धेची मराठी गाणी सोडता त्यापलिकडे काही विशेष औचित्य घडलं तर काही हिंदी गाणी देखील सादर होतील, परंतू त्याचा अंतर्भाव गुण देण्यासाठी होणार नाही हे मात्र नक्की ! करोनाच्या या दोन वर्षाच्या वर्च्युल जगामधून अॅक्चुअल जगामध्ये येताना आम्ही कार्यक्रमाच्या ऑडीशन्स महाराष्ट्राच्या चार शहरांमध्ये केल्या आणि त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. या पर्वामध्ये सेटपासून ते राऊंड पर्यंत अनेक नवनवीन गोष्टी होणार आहेत. याचसोबत तुमचा प्रत्येक वीकेंड सांगितीक होईल याची आम्ही जबाबदारी घेत आहोत”.