१५ वर्षाच्या मुलाची कर्तबगारी: शेतकऱ्यांसाठी बन...

१५ वर्षाच्या मुलाची कर्तबगारी: शेतकऱ्यांसाठी बनविले ॲप (15 Yrs. Young Achiever Developes App To Help Farmers)

डिजिटल तंत्रज्ञानाने एवढी क्रांती केली आहे की, मोबाईल फोनचा रिमोट कंट्रोल सारखा वापर करून, दूर अंतरावरून आपण घरातील दिवे, ए.सी. अशी उपकरणे उघडझाप करू शकतो. त्याच धर्तीवर एका १५ वर्षाच्या किशोरवयीन मुलाने आपले तंत्रज्ञान कौशल्य वापरून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल, असे ॲप विकसित केले आहे.

हा हुशार मुलगा नंदूरबार गावचा आहे. त्याचं नाव योग सूर्यकांत पंजराळे. त्याचे वडील शेतकरी आहेत. ते गेल्या काही वर्षापासून घरापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतावर जातात. शेतातील पिकास पाणी देण्यासाठी त्यांनी ट्यूबवेल खोदली आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर चालू किंवा बंद करण्यासाठी योगच्या वडिलांना दिवसातून दोनदा तरी ५ कि.मी. चे अंतर चालून जावे लागत होते. पाऊसपाणी असो की, करोनाची आलेली साथ असो, सूर्यकांतजींचा हा नित्यक्रम कधीच बदलला नव्हता. या कामासाठी त्यांना होणारा त्रास आणि वेळेचा अपव्यय पाहून योगला वाटू लागले की, हे मोटर सुरू किंवा बंद करण्याचे काम आपल्या वडिलांना घरबसल्या करता येईल तर पाहावे.

ही कल्पना योगच्या डोक्यात येण्याचे कारणही तसेच होते. कारण तो व्हाइट हॅट ज्युनियर या संस्थेतून ऑनलाईन कोडिंगचे शिक्षण घेत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेल्या योगने व्हाइट हॅट ज्युनियरचे १३२ क्लासेस अटेन्ड केले आहेत. योगच्या अंगी असलेली चिकाटी आणि नवे तंत्रज्ञान शिकण्याची धडपड यामधून त्याच्या डोक्यात नवनव्या कल्पना येतात. त्यातूनच त्याने आयओटी आधारित ॲप तयार करायला सुरुवात केली आणि यश मिळविले.

फार्मर हेल्प ॲप निर्माण करून योगने आपल्या वडिलांना घरूनच ट्यूबवेल मोटर हाताळण्याची कला शिकवली. त्याचा फायदा सूर्यकांत यांना झाला. अन्‌ एकूणच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण घरापासून शेतापर्यंत चालत जाताना पाणी व वीज चालूच राहते. या दोघांचाही अपव्यय या ॲपमुळे टळला आहे. वीजेची बचत होत असल्याने मासिक वीज बिलाच्या रकमेतही घट येत आहे.

योगच्या या प्रकल्पासाठी व्हाइट हॅट ज्युनियरच्या शिक्षिका सोमदत्ता बंदोपाध्याय यांनी त्याला प्रोत्साहन दिले. त्या म्हणतात, ”आम्ही विद्यार्थ्यांना व्यावहारिक सोलुशन्स शोधण्यासाठी कोडिंगचा वापर कसा करू शकतात, याचे मार्गदर्शन करतो.”

आपल्या या संशोधनाबाबत योग म्हणाला,”जगभरात आयओटी संकल्पनेचा अवलंब करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळवून देण्याची हीच खरी वेळ आहे. मी माझ्या वडिलांना हे ॲप यशस्वी करून दाखवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद अमूल्य होता.”