स्वप्नात दिसलेल्या या १५ गोष्टी कधीही दुर्लक्षि...

स्वप्नात दिसलेल्या या १५ गोष्टी कधीही दुर्लक्षित करू नका (15 Types Of Dreams You Must Never Ignore)

मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी आपल्याकडे म्हण आहे. झोपेत स्वप्न पडणं ही सामान्य गोष्ट आहे. पण काही वेळा अशी काही विचित्र स्वप्नं पडतात, ज्यांचा संबंध आपल्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनाशी असतो. आपण स्वप्नांचा अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत न पडता, एक वाईट स्वप्न इतकंच बोलून त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु स्वप्नांचा अर्थ सांगणारे जाणकार असं म्हणतात की, आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा आपल्या जीवनावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. काही स्वप्नं भविष्यात आपल्या जीवनात काय घडणार आहे, हे सूचित करणारी असतात. तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. तर मग काही स्वप्नं आणि त्यामागचे संकेत काय असतात ते पाहुया.

१. स्वप्नात तुम्ही पाहिलं की तुम्ही कोणावर तरी रागावले आहात, तर याचा अर्थ असा असतो की तुमचे त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे. याउलट जर कोणी तुमच्यावर रागावलेले तुम्ही पाहिले तर त्याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करते असा होतो.

२. घरातून बाहेर पडल्यानंतर मांजर आडवं गेलं की योजलेलं काम होणार नाही, असं आपण समजतो. त्याचप्रमाणे स्वप्नातही मांजर दिसणं अशुभ मानलं जातं. स्वप्नात मांजर दिसलं तर त्यामागे आपल्याला कोणीतरी फसवणार आहे, असा संकेत असतो.

३. आपल्यावर अगदी लाजिरवाणी परिस्थिती आली आहे. कोणीतरी आपल्याला अपमानित करत आहे, असं जेव्हा आपण स्वप्नात पाहतो तेव्हा समजावं की एखाद्या व्यक्तीकडून आपल्यावर खूप मोठं संकट ओढावणार आहे. ती व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल बरंच काही जाणते आणि ते सगळ्यांना सांगून ती तुम्हाला संकटात आणू इच्छिते, असा या स्वप्नाचा अर्थ होतो.

४. स्वप्नात साप दिसणं ही अतिशय अशुभ गोष्ट आहे. तेव्हा असं स्वप्न पडल्यास वेळीच सावध झालं पाहिजे. यामुळे खाजगी आणि व्यावसायिक जीवनात खळबळ माजण्याची शक्यता असते.

५. कधीतरी आपल्याला असं स्वप्न पडतं की, घरातून पळून जावसं वाटतं, परंतु त्यासाठी पाऊल पुढे धजत नाही. या स्वप्नामुळे आपल्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे हे सूचित होतं.

६. नदी किंवा तलावाचं पाणी पित असल्याचं स्वप्न पाहिलं तर समजायचं की लवकरच आपल्याला सरकारी कामामध्ये बढती मिळणार आहे.

७. स्वप्नात विहिरीचं पाणी दिसलं तर पुढील दिवसात आपल्याला धनलाभ होणार आहे असं समजावं.

८. स्वप्नात जर कोणी तुम्हाला मारत असेल, दुखावत असेल तर समजावं की भविष्यात आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे.

९. स्वप्नात तुम्ही रडत, ओरडत असलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या खाजगी जीवनात तुम्ही अतिशय अस्वस्थ, तणावात, दुःखी, चिंताग्रस्त आणि आयुष्याला कंटाळलेले आहात.

१०. आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू स्वप्नात पाहणं हे पुढे अशुभ घटना घडणार असल्याचा संकेत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नये. नातलग आणि सहकाऱ्यांसोबत आपलं पटत नाहीय, असा अनुभव येतो. तेव्हा अशा लोकांशी विशेषतः सहकाऱ्यांसोबत वागताना नीट काळजी घ्या.

११. कोणीतरी आपला पाठलाग करत असल्याचं स्वप्नात दिसलं की आपल्या खाजगी आयुष्यात अनेक समस्या आहेत आणि त्या सोडवायच्या सोडून आपण त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो असा त्याचा अर्थ होतो. वास्तवाशी सामना करण्याचं सोडून आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत, असं हे स्वप्न पुन्हा पुन्हा आपल्याला सुचित करतं.

१२. सोनं-चांदी वाटत असल्याचं स्वप्न पडल्यास समजायचं की लवकरच आपल्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.

१३. नुसतंच कधी घुबड दिसलं तर धनलाभ होतो असं म्हणतात, तेच स्वप्नात घुबड दिसणं हे अशुभ ठरतं. त्यामुळे जीवनात समस्या आणि संकटं येतात.

१४. दोन मांजरी आपसात भांडताना जर स्वप्नात दिसल्या तर तुमचा विश्वासघात होणार आहे, असं समजा. किंवा कोणीतरी तुमच्या विरुध्द कटकारस्थान रचत आहे, तुमची फसवणूक करणार आहे असं समजा.

१५. आपल्या घरात कुणीतरी येऊन तोडफोड करत असल्याचं जर तुम्ही स्वप्नात पाहिलं तर भविष्यात तुम्ही खूप मोठ्या संकटात सापडणार असल्याचा तो संकेत आहे, असं समजा.