ऑक्सिजन पातळी आणि फुप्फुसांची शक्ती वाढविण्यासा...

ऑक्सिजन पातळी आणि फुप्फुसांची शक्ती वाढविण्यासाठी करा ही ११ योगासने (11 Yoga Asanas To Improve Lung Health And Oxygen Level)

करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या रोगाचे विषाणू फुप्फुसांवर आक्रमण करत असल्याने त्यांची हालचाल मंदावते. परिणामी शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते व रुग्णांची परिस्थिती गंभीर होते. असा प्रसंग आपल्यावर येऊ नये, म्हणून स्वतःहूनच शरीरातील प्राणवायूची पातळी वाढवा आणि फुप्फुसांची शक्ती वाढवा. त्यासाठी पुढील योगासने केल्यास निश्चितच लाभ होईल.

 • 1. ताडासन
 • दोन पायांमध्ये अंतर ठेवून सरळ उभे राहा.
 • दोन्ही हात शरीराजवळ ठेवा.
 • आता दीर्घ श्वास घेत दोन्ही हात उचलून सरळ डोक्यावर न्या. हाताची बोटे एकमेकात गुंतवा.
 • हात सरळ ठेवा आणि वरच्या बाजूस ताणा. आपल्या शरीरामध्ये पायापासून हाताच्या बोटांमध्ये ताण जाणवला पाहिजे.
 • १० सेकंद या स्थितीत राहा आणि दीर्घ श्वास घेत राहा. आता श्वास सोडा. हाताची गुंतवलेली बोटे सोडा आणि हळूहळू पूर्वीच्या स्थितीत या.
 • 2. तिर्यक ताडासन
 • दोन पायांमध्ये अंतर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात पुढे उचलून खांद्यांच्या रेषेत आणा. हाताची बोटे एकमेकात गुंतवा.
 • दीर्घ श्वास घेत दोन्ही हात उचलून सरळ डोक्यावर न्या आणि हळूहळू श्वास सोडत कमरेतून डावीकडे झुका. थोडा वेळ थांबून पूर्वीच्या स्थितीत या.
 • 3. स्कंध संचालन
 • याचा अर्थ खांदे फिरविण्याची क्रिया. त्यासाठी दोन्ही हात उचलून, बोटे खांद्यांवर ठेवा. हातांचे कोपर एकत्र मिळवा आणि या अवस्थेत हात चक्राकार फिरवा. चक्र मोठे असावे. ही क्रिया क्लॉकवाईज आणि ॲन्टी क्लॉकवाईज करा. खांदे फिरवताना दीर्घ श्वास घ्या.
 • 4. मकरासन
 • पोटावर झोपा. दोन्ही हात मुडपून कोपर जमिनीवर ठेवा. त्याच्या आधारावर, आपली हनुवटी हातांच्या पंजांवर ठेवा.
 • दीर्घ श्वास घेत, उजवा पाय मुडपा. श्वास सोडत पाय सरळ करा.
 • हीच क्रिया डाव्या पायाने करा. काही मिनिटांनंतर पाय सरळ करून, हनुवटी-हात सोडवून पूर्वस्थितीत या.
 • 5. विश्रामासन
 • पोटावर झोपून केलेल्या या आसनामुळे शरीरातील प्राणवायूची पातळी, थोड्या वेळातच नॉर्मल होते.
 • पोटावर झोपा. डावा हात डोक्याखाली घ्या. आता मान उजवीकडे वळवा आणि डोके हातावर ठेवा.
 • उजवा पाय, गुडघ्यातून वाकवत, लहान मूल झोपते त्या अवस्थेत या आणि विश्राम करा.
 • दीर्घ श्वास घ्या. काही वेळ या स्थितीत राहून पूर्वस्थितीत या.
 • 6. भुजंगासन
 • पोटावर सरळ झोपा. हाताचे पंजे छातीजवळ आणून खांद्याच्या रेषेत ठेवा.
 • दीर्घ श्वास घेत शरीराचा पुढील भाग वर उचला.
 • डोके जमेल तेव्हढे, वरच्या बाजूस उचला.
 • या स्थितीत १५ ते ३० सेकंद राहा. दीर्घ श्वास घेत पूर्वस्थितीत या.
 • 7. उष्ट्रासन
 • गुडघ्यावर किंवा वज्रासनात बसा.
 • मांड्या आणि एकमेकांना लागून असतील, इकडे लक्ष द्या.
 • आता गुडघ्याच्या जोरावर ताठ उभे राहा आणि दीर्घ श्वास घेत मागे झुका. हाताचा उजवा पंजा, पायाच्या उजव्या टाचेवर, तथा डावा पंजा, पायाच्या डाव्या टाचेवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
 • शरीराचा भार, दंड आणि पाय यांच्यावर समान असला पाहिजे.
 • हळूहळू श्वास घ्या आणि तसाच हळूहळू सोडा.
 • दीर्घ श्वास घेत पूर्वस्थितीत या.
 • 8. धनुरासन
 • पोटावर झोपा. पाय एकत्र जुळवा आणि हात पायाला लागून ठेवा.
 • हळूहळू पाय गुडघ्यांमध्ये मुडपा आणि दोन्ही हातांनी पायांचे घोटे पकडा.
 • दीर्घ श्वास घेत छाती वर उचला आणि मांड्या देखील हळूहळू वर उचलण्याचा प्रयत्न करा. शरीराला धनुष्याचा आकार द्या आणि सामान्य श्वास घेत राहा.
 • काही सेकंद (झेपेल तितका वेळ) या स्थितीत राहा व हात-पाय सोडवून हळूहळू पूर्वस्थितीत या.
 • 9. शलभासन
 • पाठीवर झोपा. दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून एकेक करून वर उचलण्याचा प्रयत्न करा. जमेल तेवढे वर उचला. पाय सरळ ठेवा व जास्तीत जास्त उंच न्या.
 • हळूहळू श्वास सोडत पाय खाली आणा.
 • 10. त्रिकोणासन
 • जमिनीवर ताठ उभे राहा. पायांमध्ये २ फूट अंतर ठेवा.
 • उजवा पाय, उजवीकडे वळवा.
 • दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत आणा.
 • श्वास घेत, हळूहळू उजवीकडे झुका. झुकताना नजर समोर हवी.
 • उजव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करा.
 • डावा हात सरळ वर न्या. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे वळवा.
 • हीच क्रिया डाव्या हाताने करा.
 • 11. प्राणायाम
 • वरील योगासनां व्यतिरिक्त दीर्घ श्वसन क्रिया करा.
 • भस्त्रिका, अनुलोम विलोम, कपालभांती या सर्व प्राणायाम क्रिया आहेत.
 • त्या तज्ज्ञांकडून शिकून घ्या.
 • या प्राणायाम क्रिया केल्याने फुप्फुसांची शक्ती वाढेल आणि प्राणवायूची पातळी व्यवस्थित राहील.