10 वर्षांपूर्वी शाहरुख खान याने दिली होती चेताव...

10 वर्षांपूर्वी शाहरुख खान याने दिली होती चेतावणी, प्रेक्षक बॉलिवूड चित्रपट पाहणार नाहीत (10 Years Ago Shahrukh Khan Had Predicted, People Will Stop Watching Bollywood Movies)

गेले काही दिवस बॉलिवूडवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. याचेच पडसाद मोठमोठ्या बिग बजेट चित्रपटांवर होताना दिसतात. बॉलिवूडचा किंग खान  म्हणजेच शाहरुख खान गेली काही वर्षे इंडस्ट्रीमधून गायब झाला आहे. शाहरुख सर्वात शेवटी 2018  मध्ये आलेल्या झिरो या चित्रपटात दिसला होता. तो त्याच्या करीअरमधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर दिसलाच नाही. शाहरुख आपल्या चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करुन पाहत असतो. त्यामुळेच त्याने जवळपास 10 वर्षांपूर्वी रा. वन सारखा चित्रपट बनवला होता. त्यावेळी या चित्रपटासाठी वापरण्यात आलेले स्पेशल ग्राफिक्स इफेक्ट आणि वीएफएक्स हे त्या काळाच्या मानाने खूपच वेगळे होते. त्या स्पेशल इफेक्टना आताच्या काळात वापरले जाते.

‘रा.वन’ नंतर शाहरुखने आपल्या ‘फॅन’ आणि ‘झिरो’ चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर केला. आजच्या काळात ज्या प्रकारे लोक बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याबाबत बोलत आहेत, त्याची चेतावणी किंग खानने 10 वर्षांपूर्वीच दिली होती.  2011मध्ये  प्रीती झिंटासोबतच्या एका मुलाखतीदरम्यान शाहरुखने भविष्यात बॉलिवूडवर वाईट काळ येईल आणि हिंदी चित्रपटांमधील लोकांचा रस कमी होईल अशी शक्यता वर्तवली होती.

त्या मुलाखतीदरम्यान शाहरुख खान म्हणाला होता की, ‘इंडस्ट्रीने मला खूप काही दिले आहे. मला असे वाटते की जेव्हा माझे करीअर संपेल तेव्हा खलनायक, नायिकेसोबतचा रोमान्स आणि डान्स याव्यतिरिक्तही लोकांनी माझी आठवण काढली पाहिजे. मी हे सर्व माझ्यासाठी केले आहे. हिंदी चित्रपटातील VFX साठी लोकांनी मागे वळून पहावे आणि मला आठवावे अशी माझी इच्छा आहे. मला इंडस्ट्रीत चित्रपटांसाठी असे काही करायचे आहे ज्यात मी तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवू शकतो आणि म्हणूनच मी रा.वन बनवला आहे.

याशिवाय त्या मुलाखतीदरम्यान किंग खानने इंडस्ट्रीतील दिग्गज निर्मात्यांबद्दलही भाष्य केले, “बॉलिवूडमधील काही मोठ्या चित्रपट निर्मात्यांशी माझी मैत्री आहे पण ते सगळे खूप मूर्ख आहेत. त्यांना फक्त रोमँटिक चित्रपट करायचे आहेत पण मला त्यापलीकडे जाऊन जगावर राज्य करायचे आहे. असे चित्रपट बनवायचे आहेत की लंडन किंवा अमेरिकेतील भारतीय लोक अभिमानाने जगाला सांगू शकतील की हे चित्रपट भारतात बनले आहेत आणि ते स्पायडर मॅनइतकेच चांगले आहेत.”

शाहरुख पुढे म्हणाला की, हिंदी चित्रपटसृष्टीची प्रगती झाली नाही, तर लोकांचे बॉलिवूडबद्दल मतपरिवर्तन होईल.  “आपण लार्जर दॅन लाइफ सिनेमाकडे वाटचाल केली पाहिजे. आपण असे केले नाही तर येणारी तरुण पिढी आपले चित्रपट पाहणे बंद करेल. ते आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्यास सुरुवात करतील. मला वाटते त्यांना आपले सुपरहिरो आवडले पाहिजेत. आपल्याकडे पौराणिक कथांमध्ये सांगण्यासारख्या अनेक चांगल्या कथा आहेत.”

जेव्हा इंटरनेटवर कोणतेही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नव्हते त्यावेळी शाहरुखने या गोष्टी म्हटल्या होत्या. त्यावेळी लोक आंतरराष्ट्रीय चित्रपट केवळ चित्रपटगृहातच पाहायचे.

शाहरुखच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच पठाण या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. याशिवाय तो राजकुमार संतोषी यांचा ‘डंकी’ चित्रपटही करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू दिसणार आहे. तर साऊथकडील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारासोबत तो जवान या चित्रपटातसुद्धा दिसणार आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम