घरबसल्या करता येणारे 10 रोजगार (10 Work From Ho...

घरबसल्या करता येणारे 10 रोजगार (10 Work From Home Options For Housewives.)

हल्ली बर्‍याच ठिकाणी घराघरांतून टिकल्या चिकटवण्याचं, ब्लाऊजना हूक लावण्याचं, फॉल बिडिंग, आर्टिफिशीयल ज्वेलरी, पापड लाटून देणं, टिफिन बनवणं इत्यादी अनेक लहानमोठी कामं होताना दिसतात. इच्छा असेल तर, अगदी घरबसल्या काम करूनही पैसे कमावता येऊ शकतात, यासाठीची ही उदाहरणं. काही वेळा तर अगदी छोट्या प्रमाणात घरापासून सुरुवात झालेल्या कामात यश मिळून त्यास लघुउद्योगाचं स्वरूप आलेलंही आपण पाहतो. केवळ पैसे कमावण्याच्या हेतूनेच नव्हे, तर आपल्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठीही प्रत्येकानं उद्योगी असायला हवं. बाहेर जाऊन काही करणं शक्य नसेल, तर घरबसल्याही बरंच काही करता येण्याजोगं आहे. त्याबद्दल जाणून घेऊ-

घरखर्चास हातभार
हल्ली लग्न जमवतेवेळी, नोकरी करणारी मुलगी हवी अशी अपेक्षा असते. पण लग्नानंतर मातृत्व आलं की त्या बाईला, मग ती कितीही शिकलेली, चांगल्या हुद्याची नोकरी करणारी असली तरी बरेचदा बाळाच्या संगोपनासाठी नोकरी सोडावी लागते. किंवा मग काही वर्षांकरिता गॅप घ्यावी लागते. बहुत करून खेडेगावात राहणार्‍या स्त्रियांना इच्छा असते, तेव्हा योग्य वेळी काम करण्याची संधी मिळत नाही. काही घरांमध्ये तर स्त्रियांनी घराबाहेर जाऊन नोकरी करण्यास मनाई असते. अशी अनेक कारणं असतात की ज्यामुळे महिलांची इच्छा असूनही त्यांना नोकरी-व्यवसाय करता येत नाही. परंतु, सध्या परिस्थिती बदलत आहे. बाहेर जाऊन नोकरी करता न येणार्‍या या महिलांनाही आता रोजगाराची गरज वाटू लागली आहे. अशा महिलांना घरच्या घरी आपला व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सध्या तरी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. हातांना काम मिळाल्यास पैसाही मिळेल, शिवाय घरखर्चाला हातभार लागेल. बघूया यामुळे आणखी कोणते फायदे होऊ शकतात.

घरच्या घरी काम करण्याचे काही फायदे
– तुम्हाला जागेसाठी भाडं द्यावं लागणार नाही.
– प्रवासाचा खर्च वाचेल.
– स्वतःच्या सोयीनुसार पहाटे लवकर उठून किंवा दुपारच्या वेळेत काम करू शकतो.
– आपलं घर आणि मुलं या दोहोंकडे लक्ष ठेवत आपलं काम करता येतं.
– ऑनलाइन व्यवसाय करण्यास इच्छुक असाल, तर आपल्या उत्पादनासाठी घरबसल्या तुम्ही ग्राहक मिळवू शकता.
आता आपण कोणकोणते व्यवसाय करता येतील, याचे काही पर्याय पाहूया.


1. फॅशन डिझाइनिंग
तुम्हाला फॅशन डिझाइनिंगची आवड असेल, तर तुम्ही स्वतः डिझाइन केलेले कपडे ऑनलाईन विकू शकता. तुम्ही डिझाइन केलेले कपडे ग्राहकाच्या पसंतीस उतरल्यास घरबसल्या खूप पैसे कमावू शकता. तुम्ही रेडिमेड कुर्ती, दुपट्टा, स्कार्फ, स्टोल इत्यादींचा व्यवसाय करू शकता किंवा ड्रेस मटेरियल, साडी, लेहंगा आदीचाही व्यवसाय करू शकता.

2. डिझायनर बॅग
कॉलेज तरुणींपासून ते ऑफिसर्स महिला, गृहिणीपर्यंत सर्वच महिलांच्या अगदी नेहमीच्या वापरातील वस्तू म्हणजे हँडबॅग. तेव्हा बॅग बनवण्याचा व्यवसाय केल्यास तो तेजीत चालू शकतो. प्रसंगानुरूप- उदाहरणार्थ, प्रवासी बॅग, पार्टी बॅग, ऑफिससाठी बॅग, क्लच, पोटली बॅग इत्यादी डिझाइनच्या बॅग्ज बनवण्याचा व्यवसाय करू शकता.

3. फॅशनेबल ज्वेलरी
महिलांच्या नटण्यामुरडण्याच्या आवडीमध्ये ज्वेलरी महत्त्वपूर्ण असते. महिला प्रसंगानुरूप वेगवेगळ्या पद्धतीची ज्वेलरी परिधान करण्यास पसंती देतात. तेव्हा फॅशनेबल ज्वेलरीचा व्यवसाय करण्याचा पर्याय फायद्याचाच आहे. त्यातही तुम्ही वेगवेगळ्या प्रांतातील एथनिक ज्वेलरी जमा करून, ती विकू शकता. किंवा स्वतःच्या कल्पकतेनं खास डिझाइनची ज्वेलरी बनवण्याचा व्यवसाय करू शकता.

4. सौंदर्य आणि मेकअप
आपल्या घराच्या आजूबाजूला एकवेळ डॉक्टर नसतील, पण ब्युटी पार्लर्स अगदी जागोजागी असतात. याचं कारण म्हणजे, आता स्त्रिया आपल्या सौंदर्याबाबत फार सजग दिसतात. तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला असेल, तर घरूनच पार्लरचं काम करण्यास सुरुवात करू शकता. सध्या मेकअप आर्टिस्ट, मेंदी आर्टिस्टना अतिशय मागणी असते. लग्नसमारंभच नव्हे तर सणासुदीच्या निमित्तानंदेखील सजायचं झाल्यास स्त्रिया पार्लरमध्ये जातात.

5. कुकिंग
स्वयंपाक बनवण्याची आवड असल्यास वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये डबे बनवून पाठवा, पाकशास्त्र शिकवा. या व्यवसायात मेहनत आहे, परंतु पैसे कमावण्याची ही नामी संधी आहे, असं समजा. याशिवाय घरबसल्या लोणची, पापड, मसाले, जॅम-जेली, बिस्किटं, आइस्क्रीम, केक इत्यादी बनवून देण्याचा व्यवसायही करून पाहा.

6. युट्यूबर
हल्ली प्रत्येक जण मोबाइलच्या सल्ल्यानुसार वागताना दिसतो. कोणतंही काम करताना कुठे अडलो की, लगेच युट्यूबच्या माध्यमातून स्वतःच्या शंकांचं निरासन करतो. तेव्हा एखाद्या विषयाचा युट्यूब व्हिडिओ बनवून युट्यूबर होण्याचा पर्यायही काही वाईट नाही. जर लोकांना तुमचा व्हिडिओ पसंत पडला, तर तुम्ही युट्यूबर होऊन पैसे कमावू शकता.

7. भेटवस्तू
सण, लग्नसमारंभ, वाढदिवस अशा अनेक प्रसंगी भेटवस्तू देण्याची रीत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य जसं, वेगवेगळ्या डिझाइनची पाकिटं, बास्केट इत्यादी बनवण्याचा व्यवसाय तुम्ही करू शकता.

8. आर्ट अँड क्राफ्ट
वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाइनच्या मेणबत्त्या, दिवे, पाकिटं, पेंटिंग्ज बनवून ते विकण्याचा व्यवसायही सध्याच्या परिस्थितीत खूप मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देऊ शकेल. तेव्हा तुमच्याकडे कला असल्यास, त्याचा वापर तुम्ही करू शकता.

9. मुलांना सांभाळणं
हल्ली बर्‍याच कुटुंबात आई-वडील दोघंही ऑफिसला जाणारे असतात. अशा वेळी घरी त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसतं. तुम्ही घरी पाळणाघर सुरू करून अशा मुलांना सांभाळण्याची जबाबदारी घेऊ शकता. हादेखील फायदेशीर व्यवसाय आहे.
10. ट्यूशन
शिकवण्याची आवड असल्यास, घरबसल्या मुलांना शिकवणी द्या. या कामातूनही रोजगार मिळवता येईल.

आपला व्यवसाय लोकांपर्यंत कसा पोहोचवाल?
– सोशल मिडियावर आपल्या व्यवसायाची नोंदणी करा. असं केल्याने विनाखर्च तुमचं काम लाखो लोकांपर्यंत पोहचवता येईल.
– वेळोवेळी प्रदर्शनांमधून भाग घेऊन तिथे आपलं काम दाखवा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासारख्या अन्य उद्योगिनींना भेटता येईल, तसंच त्यांच्याकडून काम कसं करायचं याबद्दलची माहितीही मिळेल.
– मोठमोठ्या ऑनलाइन स्टोअर्समध्येही तुम्ही तुमचं उत्पादन विकू शकता. तुम्हाला फक्त कमिशन द्यावं लागेल, परंतु तुमचं उत्पादन घरोघरी पोहोचेल.

सरकारची महिला ई-हाट सेवा
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी खास महिलांसाठी ई-हाटची संकल्पना सुरू केली आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून रजिस्टे्रशन करून महिला घरी बनवलेल्या वस्तूंची विक्री करू शकतात. किंवा उत्पादकांकडून वस्तू बनवून घेऊन त्याचीही ऑनलाईन विक्री करू शकता. बरं ही सरकारमान्य सेवा असल्याने या सेवेसाठी अन्य साइट्सप्रमाणे तुम्हाला कोणतंही कमिशन द्यावं लागणार नाही. इथे महिला ई-हाटमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. कारण इथे रजिस्ट्रेशन करताना आधार नंबर नोंदवावा लागतो. सगळ्यांनी उद्योगी व्हावं, यासाठी ही योजना अतिशय प्रभावी आहे. तेव्हा विचार करण्यात फार वेळ न घालवता कृतीसाठी हातपाय हलवा.