खोटारडे नवरा-बायको एकमेकांशी १० प्रकारे खोटं बो...

खोटारडे नवरा-बायको एकमेकांशी १० प्रकारे खोटं बोलतात (10 Lies Husband And Wives Tell Each Other)

नवरा-बायको यांचं नातं कितीही पारदर्शी असलं, तरी म्हणतात ना दिसतं तसं नसतं. अगदी तसंच वरवर नवरा-बायको दोघंही आपल्या नात्यात काहीही लपवाछपवी वगैरे नाही, असा आव आणत असले तरी ते एकमेकांशी काही गोष्टींच्या बाबत चक्क खोटं बोलतात. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये जेवढे प्रेम असते, तेवढीच जास्त भांडणंही असतात. आणि खोटं बोलाल तर बाप रे! त्याला काही सीमाच नाही. हे दोघे इतक्या सराईतपणे एकमेकांशी खोटं बोलत असतात की त्यांचं खोटं पकडलं जाणं अशक्यच! मग, पाहुया तर नवरा-बायको एकमेकांशी काय खोटं बोलतात?

नवरा आपल्या बायकोशी खोटं बोलत असलेल्या १० गोष्टी

नवरा कधी आपल्या बायकोला सतावण्यासाठी, तर कधी स्वतःला बायकोचे बोल ऐकायला लागू नयेत म्हणून आपापल्या बायकोशी खोटं बोलतात.

१.   सहजच नजर पडली त्या मुलीवर

पाहताच ती बाला, कलिजा खलास झाला, या अनुभवाला कोणीही पुरुष अपवाद नाही. सुंदर महिला दिसल्यानंतर तिच्यावर नजर खिळून राहणे हा पुरुषांचा विक पॉइंट आहे. परंतु एखाद्या दिवशी असे करताना जर त्यांच्या पत्नीने त्यांना पाहिले तर मग ते काही ना काही सबबी द्यायला सुरुवात करतात. मी तिथे बघत होतो, तितक्यात त्या मुलीवर माझी नजर पडली. मी वाईट नजरेने तिच्याकडे पाहत नव्हतो. माझी बायको इतकी सुंदर असताना मी दुसर्‍या कोणाकडे कसं बघू. असं बोलून वेळ मारून नेली जाते.

२.   मी ऑफिसमध्ये होतो, मित्रांसोबत नव्हतो

आपल्या नवऱ्याचे मित्र बायकांना अजिबात आवडत नसतात, कारण मित्रांसोबत असताना ते आपल्या बायकोला विसरूनच जातात. रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत पार्टी करायची असो, ड्रिंक्स करणे असो, जंक फूड खाणे असो वा फिरायला जाणे असो; मित्रांसोबत असताना त्यांचा कोणत्याही गोष्टींवर ताबा राहत नाही. आपलं जरा अति होतंय हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमुळे बायका त्यांना मित्रांसोबत जाण्यास मनाई करतात. मग ऑफिसमधून उशिरा आल्यानंतर त्यांना बायकोशी खोटं बोलावं लागतं. मी मित्रांसोबत नव्हतो, मला ऑफिसमध्येच उशीर झाला, अशी थाप मारली जाते.

३.   तू खूप सुंदर आहेस

बायकांना त्यांचं कौतुक केलेलं फार आवडतं, ही गोष्ट नवर्‍यांना चांगलीच अवगत असते. बायको नेहमी आनंदी राहावी आणि आपली हरेक गोष्ट तिने मान्य करावी याकरिता बहुतांशी पुरुष ही शक्कल लावतात. बायकोकडून काही काम करून घ्यायचं आहे वा आपण केलेल्या एखाद्या चुकीसाठी तिची मनधरणी करायची आहे तर ही नवरेमंडळी बायकांची स्तुती करू लागतात. आपली स्तुती ऐकून बायका विरघळून जातात आणि अशाने पुरुषांचं काम सोपं होतं.

४.   उद्या नक्की हे काम करणार

गृहिणीला घरातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. कारण पुरुषांकडून ही अपेक्षा करणं शक्य नसतं. बरेचदा घरातील कामांबाबत त्यांना फारसं गांभीर्य नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून बेजबाबदारपणा घडतो. अर्थात हे मुद्दाम घडत नसतं. परंतु हे पुरुष बायकोने सांगितलेलं काम करायला विसरले तर तिच्याकडून ओरडा पडू नये म्हणून मग हे काम मी उद्या नक्की करणार असं आश्वासन देतात. परंतु, तेही काही वेळा पाळलं जात नाही.

५.   सॉरी, यानंतर असं कधीच होणार नाही

बायकोचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मुलांच्या शाळेतील पालक सभा असे अनेक महत्त्वाचे दिवस पुरुषांच्या लक्षातच नसतात. अर्थात् ते जाणून-बुजून करत नाहीत, शिवाय त्यांचे आपल्या बायको-मुलांवर प्रेमही असतं. तरीही ते या गोष्टी विसरतात. आणि मग बायकोच्या रागाला तोंड देण्यासाठी यापुढे असं कधी होणार नाही, असं खोटं बोलून जातात.

६.   मी अजिबात बदललो नाही

नव्याची नवलाई नऊ दिवस याप्रमाणे लग्नानंतर नव्या नऊ दिवसात नवरा आपल्या बायकोला खूश ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. दररोज ऑफिसमधून लवकर घरी येतो, तिला वेळोवेळी सरप्राइज देतो, बाहेर फिरायला घेऊन जातो, कारचा दरवाजा उघडून देतो वगैरे वगैरे. लग्नाला काही वर्षं झाल्यानंतर हा लाडिकपणा पार नाहीसाच होतो. मग बायकांची भुणभुण सुरू होते लग्न झालं तेव्हा तुम्ही माझ्यासाठी काय काय करत होतात, आता तुम्ही खूप बदलले आहात, असं ती म्हणते. पण नवरे त्यांची ही तक्रार मान्यच करत नाहीत आणि मी पूर्वी होतो तसाच आहे, मी अजिबात बदललो नाही, असं खोटं बोलतात.

७.   त्या मुलीशी माझं आता कोणतंही नातं नाही

काही पुरुष लग्न झाल्यानंतरही आपल्या लग्नाआधीच्या प्रेयसीला भेटत असतात. ते आपला भूतकाळ आणि वर्तमान एकत्र घेऊन चालू पाहतात. आणि बायकोला कळल्यानंतर, आता त्या मुलीशी माझं कोणतंही नातं नाही असं खोटंच बोलतात.

८.   मी एकदम मस्त आहे

लहानपणापासून पुरुषांना असं सांगितलं जातं की ते अतिशय मजबूत आहेत, त्यांनी कधीही कोणापुढे नमतं घ्यायचं नाही. परंतु लग्नानंतर असे काही प्रसंग येतात की त्यावेळेस पुरुषांना आपण दुर्बळ असल्याची जाणीव होते. ते आपल्या बायकोला त्याबद्दल सांगू इच्छितात परंतु सांगू शकत नाहीत. आणि मी बरा आहे, मला काहीच झालेलं नाही असं खोटं बोलतात.

९.   मला माहीत आहे, तू सांगण्याची गरज नाही

घरातील पुरुषांना कर्ता असं म्हटलं जातं. त्यामुळे घरातील सर्व निर्णय घेण्याचा हक्क त्यांच्याकडे दिलेला असतो. असे असताना लग्न झाल्यानंतर एखादे वेळी महत्त्वाचा निर्णय घेताना जेव्हा बायको आपलं मत देऊ इच्छिते, तेव्हा कित्येकदा बायकोच्या मताशी सहमत असूनही नवरा तिचे मत योग्य असल्याचे मान्य करत नाहीच. शिवाय मला माहीत आहे की मला काय करायचं आहे, तुला विचारण्याची काही गरज नाही, असं खोटंच बोलून तो तिला गप्प करतो.

१०. मी सर्व व्यवस्थित सांभाळू शकतो

आपल्या भारतीय समाजामध्ये पुरुषांना महिलांच्या तुलनेत अधिक श्रेष्ठ समजले जाते. घरातील जबाबदार आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तसं पाहिलं तर घरातील पुरुषाला माहीत असतं की घरातील कोणतंही काम हे बायकोशिवाय होऊ शकत नाही, पण ते मान्य न करता खोटं बोलतात की, ते घरातील बॉस असल्यामुळे ते सर्व व्यवस्थित सांभाळू शकतात.

बायको आपल्या नवऱ्याशी काय खोटं बोलत असेल?

आपली बायको आपल्याशी कधीच खोटं बोलणार नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण बायकाही आपल्या नवऱ्यांशी खोटं बोलतात. त्या काय खोटं बोलत असतील? चला बघुयाच.

. सेल लागला होता म्हणून घेतलं

शॉपिंग आणि बाई यांची अशी काही गट्टी असते की त्यासाठी बायका कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात. त्यांच्या शॉपिंगच्या सवयीवर कोणीही बंदी आणू शकत नाही. बरेचदा त्या आपल्या बजेटपेक्षा जास्तीची खरेदी करून येतात आणि नवऱ्याने विचारले की सेल लागला होता म्हणून घेतलं असं खोटंच सांगतात.

. मी कशी दिसते आहे?

बायको कितीही जाडी वा कुरूप दिसणारी असली तरी तिला आपल्या हक्काच्या माणसाच्या म्हणजे नवर्‍याच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकावयाची असते. मग एखादे वेळी ती आपल्याला न शोभणारे कपडे आणते आणि आपल्याला ते चांगले दिसत नाही हे माहीत असतानाही नवऱ्याला विचारते, की मी कशी दिसते?

३. उद्यापासून नक्की चालायला येणार

बायकांना चवळीच्या शेंगेसारखे सडसडीत दिसायचे असते, परंतु त्यासाठी मेहनत करण्याची त्यांची तयारी नसते. स्वस्थ राहण्याच्या दृष्टीने नवरा नेहमी तिला चालायला चल असा आग्रह करतो. ती त्याला प्रॉमिसही करते की, मी उद्यापासून नक्की चालायला येणार, पण तिचा उद्या कधीच उजाडत नाही.

४. तुमचे आता माझ्यावर प्रेम राहिले नाही

लग्नानंतर नवीन जोडपं असताना नवरा-बायको स्वप्नातच वावरत असतात. तेव्हा सगळं छान वाटत असतं. मग हळूहळू जसजशा जबाबदाऱ्या वाढत जातात, तसं दोघांचंही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणं कमी कमी होत जातं. खरं तर दोघांनाही माहीत असतं की त्यांच्यामधील प्रेम कमी झालेलं नाही. घरच्या जबाबदार्‍यांमुळे नवरा आपल्याला पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही याची जाणीव असतानाही बायकांची सतत तक्रार असते की , त्यांच्या नवऱ्याचे आता त्यांच्यावर पहिल्यासारखे प्रेम राहिलेले नाही.

. मी दिवसभर कुठे मालिका पाहते?

टेलिव्हिजनवरील मालिकांसाठी घरातील सासू-सुना कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यास तयार होतील. एखाद्या नातेवाइकाकडे जायचे झाले तर घरापेक्षाही त्यांना त्या दरम्यान आपली मालिका जाईल का याची काळजी असते. बायकांचं हे टीव्हीचं वेड बघता कधी नवऱ्याने असं म्हटलं की, दिवसभर मालिकाच बघता. तर मग त्या लगेचच त्यांचं हे वाक्य खोडून टाकत नाही, आम्ही दिवसभर कुठे मालिका पाहतो? असं खोटंच बोलतात.

६. मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही

बायकांचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे त्यांचे अश्रू. आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागतात. निश्चितच मग नवरा रडण्याला घाबरून काय झालं, असं विचारतो. तेव्हा या बायका, आपल्याला काहीही झालेलं नाही. मी ठीक आहे, असं खोटं सांगतात. त्यांच्या अशा वागण्यामागे त्यांना नवऱ्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा डाव असतो. नवर्‍याने मग प्रेमाने जवळ घेत विचारपूस केली की त्यांना बरं वाटतं.

७. मला तुमच्या मदतीची गरज नाही

काही बायकांना आपल्या सगळ्या कामांमध्ये नवऱ्याचा सहभाग अपेक्षित असतो. त्यांनी आपल्याला प्रत्येक कामामध्ये मदत करावी किंवा मग आपलं मार्गदर्शन करावं असं त्यांना वाटतं. परंतु हे सर्व नवऱ्याला सांगून नाही तर त्याचं त्यानं समजून घेऊन करावं अशी या बायकांची अपेक्षा असते. असं झालं नाही की मग त्या रुसतात, आणि मग नवऱ्याला खरं कारण कळल्यानंतर तो  समजूत काढावयास आला की रागाने बायको त्यांना, मला तुमच्या मदतीची काहीही गरज नाही, मी माझं काम स्वतः करू शकते, असं खोटंच बोलते.

८. तुम्ही कोणासोबत होता?

नवऱ्यावर संशय घेण्याची बायकांची सवय कधीही जाणार नाही. नवरा कुठे गेला होता? कुणासोबत होता हे सगळं माहीत असूनही ती त्याला विचारणार की तुम्ही कोणासोबत होता? असा प्रश्‍न विचारण्यामागे तिची काळजी वा तिची भीती देखील असू शकते. पण असा खोटा प्रश्न बायका आपल्या नवऱ्यांना विचारण्याची संधी बिलकूल सोडत नाहीत.

९. आई-बाबा किंवा मैत्रिणींनी दिली

जगातील जवळपास सगळ्याच बायका ह्या नवऱ्यापासून लपवून काही पैसे वाचवून ठेवत असतात. आणि हे वाचवलेले पैसे त्या घरातील गरजेच्या वस्तूंसाठीच वापरत असतात. तरीही बायकोकडे एखादी नवीन वस्तू दिसली की ही वस्तू कुठून आली, असा प्रश्‍न नवरा विचारतो. मग बायको आपल्या आई-बाबांनी नाहीतर मैत्रिणीने ही वस्तू आपल्याला दिली असल्याचे खोटं सांगते.

१०. मला भूक नाही आहे

रडण्यासारखं दुसरं बायकांचं शस्त्र म्हणजे उपाशी राहणं. नवरा-बायकोच्या भांडणात बायको रागावून वा आपलं म्हणणं खरं करून घेण्यासाठी खायचं सोडते. तिला उपाशी पाहून नवरा समजवायला जातो, तेव्हा ती मला भूक नाही, असं खोटंच बोलते.

हे तुम्हाला माहीत आहे का?

  • महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. एका वर्षात पुरुष जवळपास १०९२ खोटं बोलतात तर महिला ७२८ खोटं बोलतात.
  • ७५ टक्के पुरुष हे दुसऱ्यांना आनंदी करण्याकरिता खोटं बोलतात.
  • पुरुष मंडळी आपल्या मद्यपानाच्या सवयीबाबत जास्त खोटं बोलतात.
  • महिला आपल्या आरोग्याशी निगडीत गोष्टींबाबत सर्वाधिक खोटं बोलतात.