मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्...

मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात सामील करा हे सुपरफूड्‌स (10 Immunity Boosting Foods For Kids)

मुलांच्या वाढत्या विकासासाठी त्यांना हर तऱ्हेच्या पोषक घटकांची गरज असते. तुम्हाला तुमचं मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही स्वस्थ हवं असेल तर मुलांच्या आहारामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या या १० पदार्थांचा अवश्य समावेश करा.

1) दूध

हाडे मजबूत बनविण्यासाठी दूध पिणं अतिशय जरूरी आहे. दुधामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, कार्बोहायड्रेट यांसारखी पोषकतत्वं असतात, जी शरीरास अतिशय गुणकारी असतात. मुलांना दूध प्यायला आवडत नसल्यास तुम्ही त्यांना वेगवेगळे मिल्क शेक बनवून देऊ शकता.

२) दही

भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि प्रथिने असलेले दही मुलांचे दात आणि हाडं मजबूत बनवण्यास मदत करते. दही पचनासही मदत करते. ताज्या फळांसोबत मुलांना दही खायला द्या.

३) अंडे

मुलांच्या दररोजच्या आहारामध्ये ४५-५५ ग्रॅम प्रथिने असलीच पाहिजेत, असे डॉक्टर्स सांगतात. रोज एक अंडं खाल्ल्यास त्यातून मुलांना भरपूर प्रथिने मिळतात, ज्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास होतो. या व्यतिरिक्त अंड्यामध्ये अधिक प्रमाणात आवश्यक व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात. अंड्यामध्ये कोलीन नावाचं पोषक तत्व अधिक प्रमाणात असतं. जे मुलांच्या बुद्धीमत्तेच्या विकासासाठी गरजेचं असतं. अंडं उकडून वा फ्राय करूनही देता येतं.

४) पालक

पालक भाजी लोह, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, अ आणि क जीवनसत्त्व यांचं उत्तम स्रोत आहे. मुलांच्या मानसिक विकासासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी पालक खाणं गरजेचं आहे. पालक लगेच शिजतं. पालकचं सूप बनवून किंवा फ्रँकीमध्ये घालून मुलांना देता येतं.

5) तुळस

तुळस ही औषधी वनस्पती आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यात अँटिऑक्सीडंट,  जीवनसत्त्व अ, ब, आणि क, लोह, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम देखील असतं. ज्यामुळे मुलांची पचनशक्ती व्यवस्थित होते. तुळशीमुळे डोकेदुखी थांबते, हे संशोधनाने सिद्ध झालं आहे. तुम्ही कधी जर पास्ता बनवला तर थोडी तुळशीची पानं वाटून सॉसमध्ये घाला.

६) बेरी

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रासबेरी या सगळ्यांत पोटॅशियम, क जीवनसत्त्व, फायबर, कार्बोहायड्रेट आणि अँटिऑक्सीडंट असतात. यात फॅट आणि कोलेस्ट्रॉल असत नाही. या सर्वच बेरीज गोड असतात, त्यामुळे मुलांनाही आवडतात. या बेरीज तुम्ही ओटस्‌, दही वा दलियामध्ये मिक्स करून मुलांना देऊ शकता.

७) ओटस्‌

अनेक संशोधनानंतर असं सिद्ध झालं आहे की, ओटस्‌ खाणारी मुलं एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. तसेच शाळेतही त्यांचा परफॉर्मंस चांगला असतो. फायबरचं अधिक प्रमाण असलेलं ओटस्‌ सावकाश पचतं आणि मुलांना उर्जा देतं.

८) बटाटा

फायबर, कॅल्शियम आणि अ जीवनसत्वानं भरलेले बटाटे मुलांना खायला द्या. ते जर ओव्हनमध्ये फ्राय केले तर त्याचा स्वाद मुलांना अधिक आवडेल.

9) होलग्रेन ब्रेड

मुलांच्या टिफिनमध्ये ब्रेड, खेळून आल्यानंतर नाश्त्यामध्ये ब्रेड, झटपट आणि आरामात बनणाऱ्या पदार्थांमध्ये ब्रेडचे पदार्थ हे पालक आणि मुलं दोघांच्या पसंतीचं होत चाललं आहे. त्यामुळे मुलांना पौष्टिक आहार देण्याबरोबरच त्यांना ऊर्जा मिळावी यासाठी व्हाइट ब्रेडऐवजी होलग्रेन किंवा व्हीट ब्रेड ज्यात लोह, झिंक, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम आणि अ व ड जीवनसत्त्व जास्त मिळतं, ते खायला द्या. आजकाल मुलांचं वजन सहज वाढतं परंतु, एनर्जीच्या बाबतीत ही मुलं कमी पडतात. असं डॉक्टरांचंच म्हणणं आहे. अशात मग होलवीट ब्रेड बराच गुणकारी ठरतो.

१०) पीनट बटर

साधारण बटरच्या तुलनेत पीनट बटर अतिशय न्यूट्रीशियस असतो. यात लोह, प्रथिने, फायबर आणि ब जीवनसत्त्वाचं प्रमाण अधिक असतं. २ टेबलस्पून पीनट बटरमध्ये २८ प्रति शेकडा प्रथिन्यांचं प्रमाण असतं.

मुलांना सकस अन्नाची ओळख कशी करून द्यायची?

बहुतांशी मुलं ही आपापल्या पालकांच्या सवयींचं अनुकरण करत असतात. त्यामुळे काय करायचे, खायचे-प्यायचे, काय बोलणे योग्य आहे याकडे पालकांनीही लक्ष द्यायला हवं. विशेषतः जेव्हा मुलं तुमच्या समोर असतील.

मुलं जेवताना नखरे करत असतील तर त्यांना लवकर जेवण संपवण्याकरीता बक्षिस द्या. परंतु बक्षिस म्हणून जंक फूड आणून देण्याचे कबूल करू नका. टेस्टी डिप वा सॉसेसही मुलं पसंत करतात, जे तुम्ही भाज्यांसोबत सर्व्ह करू शकता.

कोणताही नवीन पदार्थ खाऊन पाहण्यासाठी मुलांवर दबाव आणू नका. त्यामुळे ती जिद्दी होऊ शकतात. त्यांना एक बाइट खाण्यास सांगा, म्हणजे ते स्वतःच आपली आवड-नावड समजू शकतील.

सकस आहार घेण्यासाठी मुलांना शरीराने स्ट्राँग असणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे द्या. म्हणजे मुलं त्यांच्यापासून प्रेरित होऊन सकस आहार घेतील. मुलांना सतत काहीना काही खायला हवं असतं. त्यांच्यासाठी हेल्दी स्नॅक्स बनवून ठेवा.

मुलांनाच नाही तर पालकांनाही हेल्दी अन्न खाण्याची सवय असली पाहिजे.

लंच वा डिनरचं ठरवत असाल तर मुलांचाही सल्ला घ्या. तसेच भाज्यांची निवड करण्याची संधी त्यांना देऊन बघा.

मुलं फळं खात नसतील तर फळांपासून बनवलेले शेक आणि स्मूदीजही देता येतील.

पॅकेटमधील बंद राहिलेले अन्न मुलांना देऊ नका, त्यापेक्षा घरीच बनवलेलं अन्न द्या.

कुटुंबातील सर्वांसोबत बसून जेवण्यास मुलांना शिकवा.

कधी कधी मुलांना त्यांच्या आवडीनुसार जंक फूडही खायला द्या. म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीबद्दल लालसा निर्माण होणार नाही.

तळलेल्या पदार्थांच्या ऐवजी बेक्ड केलेले पदार्थ मुलांना खायला दया.

हिरव्या भाज्यांचं सूप करून द्या.