आज हनुमान जयंती : १०० फुटांपेक्षा अधिक उंच असले...

आज हनुमान जयंती : १०० फुटांपेक्षा अधिक उंच असलेल्या मारुतीरायाच्या १० मूर्ती (10 Hanuman Statues, More Than 100 Feet Tall)

आज हनुमान जयंती. भीमरुपी महारुद्रा, महाबळी प्राणदाता, सौख्यकारी शोकहर्ता, रामरुपी अंतरात्मा अशा असंख्य उपमांनी समर्थ श्री रामदास स्वामींनी या रामदुताचे गुणवर्णन केले आहे. त्याच्या स्तोत्रांने, उपासना केल्याने सर्व संकटांचे निरसन होते, अशी श्रद्धा त्यांनी भाविकांच्या मनात दृढ केली आहे. अशा या अंजनीसुताच्या १०० फुटांहून अधिक उंच अशा मूर्ती भारतात काही ठिकाणी आहेत. त्यापैकी या १० निवडक मूर्ती पाहिल्या तर अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे, या समर्थांच्या वर्णनाची प्रचिती यावी.

सर्वात मोठी मूर्ती

आंध्र प्रदेशात सर्वात उंच अशी म्हणजे १७६ फूट उंच असलेली हनुमानाची मूर्ती आहे. मडपम श्रीकाकुलम गावात असलेली ही मूर्ती पांढऱ्या रंगात आहे. मारुतीराया आशीर्वाद देत आहेत, असे तिचे रूप आहे.

अंजनेय हनुमान

आंध्र प्रदेशातच आणखी एक उंच मूर्ती विजयवाडा शहरात आहे. ही मूर्ती देखील पांढऱ्या रंगाची असून १३५ फूट उंच आहे.

विद्यापीठात मूर्ती

मडपम श्रीकाकुलम या आंध्र प्रदेशातील मारुतीच्या मूर्ती खालोखाल उंची असलेली मूर्ती हिमाचल प्रदेशातील सोलन शहरात आहे. तिची उंची १५१ फूट असून ती मानव भारती विद्यापीठात उभारण्यात आलेली आहे. शेंदरी रंगातील ही मूर्ती आहे. मारुतीराया आशीर्वाद देत आहेत, असे तिचे रूप आहे.

जखू हनुमान

हिमाचल प्रदेशाची राजधानी असलेल्या सिमला या थंड हवेच्या शहरात अशीच हनुमानाची मोठी मूर्ती आहे. तिची उंची १०८ फूट असून जखू हनुमान असे तिचे नामकरण करण्यात आले आहे. हे हनुमानजी लाल रंगाचे आहेत.

त्रिवेणी हनुमान

उंच मूर्ती उभारण्यात उत्तरेकडील राज्यांनी बाजी मारलेली दिसते. कारण हरयाणा राज्यात फरिदाबाद गुरुग्राम रस्त्यावर त्रिवेणी हनुमान मंदिर असून त्यामध्ये हनुमानाची मूर्ती १११ फूट उंचीची आहे. मूर्ती शेंदरी रंगात असून ती बैठी आहे. बसलेल्या स्थितीत हनुमानजी इथे पहिल्यांदाच अवतरले असावेत. बसलेले हनुमानजी ही या मूर्तीची नवलाई आहे.

संकट मोचन

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत संकट मोचन हनुमान आहेत. दिल्ली शहरातील करोल बाग या गजबजलेल्या वस्तीत हे संकट मोचन हनुमानजी असून तिची उंची १०८ फूट आहे. या मूर्तीचा रंग शेंदरी आहे.

हनुमत धाम

उत्तर प्रदेशातील शहाजनपूर या शहरात मूर्ती अशीच शेंदूर रंगातली आहे. विसरत घाटावर असलेली ही शेंदरी हनुमानाची मूर्ती १०४ फूट उंच आहे. ही मूर्ती तलावात आहे. शिवाय या मूर्तीने छाती फाडून श्रीरामाचे दर्शन घडविले आहे. रामभक्त हनुमानाची प्रसिद्ध पोझ या मूर्तीमध्ये दिसते.

दमनजोडी मूर्ती

हनुमान भक्ती पूर्वेकडील राज्यातही दिसून येते. ओरिसा राज्यात दमनजोडी कोरापूत नावाची मारुतीरायाची मूर्ती आहे. तिची उंची १०८.९ फूट असून रंग पांढरा आहे. मारुतीराया आशीर्वाद देत आहेत, असं तिचं रूप आहे.

महाराष्ट्रातील मूर्ती

अशीच पांढऱ्या रंगाची व आशीर्वाद मुद्रा असलेली मारुतीरायाची मूर्ती महाराष्ट्रात आहे. नाशिक मधील खेडाळे झुंज परिसरात असलेली ही मूर्ती १११ फूट उंच आहे.

नांदुरा हनुमान

रंगाने पांढरी व आशीर्वाद देण्याचा आविर्भाव असलेली आणखी एक मूर्ती बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या गावात आहे. नांदुरा हे मध्य रेल्वेवर असलेले रेल्वे स्थानक असून तेथील ही मूर्ती १०५ फूट उंच आहे.

अशा अति उंच मूर्ती आपल्या देशातच नव्हे तर जगभरात आहेत. तूर्तास या दशकपूर्तीला प्रणाम!