नातेसंबंध टिकवण्यासाठी १० चांगल्या सवयी (10 Goo...

नातेसंबंध टिकवण्यासाठी १० चांगल्या सवयी (10 Good Habits To Maintain Relationship)

संसाराची वाटचाल कधी बहर, कधी शिशिर; अशी चालतअसते. सुखाचा अतिरेक होतो्, अशी अवस्था येतच नाही. पण दुःखाचे प्रसंग मात्र मोठ्या संख्येनं येतात. त्यातून मग नाती बिघडतात, नातेसंबंध दुखावतात. नात्यातील या बिघाडीला प्रत्येक जण एकमेकांना बोल लावतो. पण स्वतःचे मूल्यमापन मात्र कोणीच करत नाही. नाती बिघडण्याची कारणं ठराविक असतात. आपली वर्तणूक, आपल्या वाईट सवयीत्यास कारणीभूत ठरतात. आपले वर्तन म्हणजे दोघांचेही, आपल्या सवयी चांगल्या असतील तर नातेसंबंध खळाळत्या पाण्यासारखे स्वच्छ, निरभ्र राहतील. तेव्हा ह्या चांगल्या सवयी अर्थात हेल्दी हॅबिटस् नेमक्या कोणत्या असू शकतात?


अहंकार नको

तू असंच का केलंस? मला का नाही विचारलं? तुझ लेखी मला काही किंमत नाही का? तू श्रेष्ठ कीमी? प्रेमाचा मक्ताकामी एकट्याने घेतला आहे का? यासारखे प्रश्न आपण जेव्हा जोडीदाराला रागाने करतो, तेव्हा आपला अहंकार जागृत झालेला असतो. या गोष्टी आपण नाही, आपला अहंकारबोलत असतो. हा अहंकार बाळगण्यात धन्यता मानणारे काही महाभाग असतात. आपली चूक असली तरी ती कबूल न करता, दुसऱ्याला खाली खेचायचं, अशी त्यांची धारणा झाली असते. अहंकार जोपासण्याची वृत्ती हळूहळू आपल्या अंगवळणी पडत जाते. ती नातेसंबंधाला घातक असते. तेव्हा ही सवय अंगवळणी पडू देऊ नका. अहंकार दूर सारा नि आपली नाती दृढ करा.

मान राखा

एकमेकांचा मान राखणं, आदर करणं, ही नाती टिकवण्याची चांगली सवय आहे. चारचौघात जोडीदाराचा अपमान करणं, टाकून बोलणं अशा चुका आपल्या हातून घडत असल्या, तर त्यांचा त्याग करा.मान द्या, मान घ्या, अशी आपली भूमिका पाहिजे. आपण दोघंही समान पातळीवर आहोत, उच्च-नीच असा भेद नाही; ही जोडीदारांनी एकमेकांबद्दल भूमिका ठेवली पाहिजे. असं एकदा मनाशी ठरवलंत की, नाती बिघडणार नाहीत. महत्त्वाचे निर्णय घेताना एकमेकांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. मी म्हणेन तेच खरं. मी सांगेन ते तू ऐकलंच पाहिजे, असा हट्ट नातेसंबंधास घातक ठरतो. आपले विचार लोकांना पटावेत, असं वाटत असेल तर लोकांचे विचार पण आपण पटवून घेतले पाहिजेत. या न्यायाने जोडीदाराचं बोलणं ऐकून घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे आणि आपण त्याची नीट दखल घेतो, असा दिलासा त्याला दिला पाहिजे.

ऐकत राहा

आपला जोडीदार जे काही बोलतो ते लक्षपूर्वक ऐका. समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकून घेणं, ही अतिशय चांगली सवय आहे. कारण त्यामुळे तुम्ही समोरच्याचा विश्वास मिळवता. तेव्हा आपल्या जोडीदाराच्या लहानसहान गोष्टी देखील मन लावून ऐका. अधूनमधून प्रतिसाद द्या, परंतु त्याचं बोलणं खोडून टाकू नका. किंवा त्याला मध्येच अडवू नका. पुष्कळदाअसं असतं की, जोडीदाराचा दिवस खूप कामात जातो. अन् त्याला आपलं मन मोकळं करायचं असतं. काही सांगायचं असतं, तेव्हा तला मोकळं होऊ देणं, हे आपलं कर्तव्य समजून त्याच्याकडे लक्ष द्या. या बोलाचाली दरम्यान आपला मोबाईल वापरू नका. मोबाईलमुळे स्वतःचं नि सांगणाऱ्याचं लक्ष विचलित होतं. ते होऊ देऊ नका.

साथ द्या

नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजिस्ट लॉरा कुर्टज्‌यांनी नातेसंबंधातील वेगळा विषय आपल्या संशोधनात हाताळला. नातेसंबंधात हसण्याचं महत्त्व का आहे, याचं त्यांनी संशोधन केलं. त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, माणसाने एकट्याने हसण्यापेक्षा जोडीने हसणं

अतिशय फायद्याचं असतं. अर्थात् आपला जोडीदार कोणत्याही कारणाने हसत असेल, अन् त्याला दुसऱ्या जोडीदाराने साथ दिली तर त्यांचे संबंध अधिक दृढ होतील. त्यांनी या संशोधनातून असाही

विचार मांडला की, एकत्र हास्यविनोद करणारे, हास्यविनोदात एकमेकांना साथ देणारी जोडपी एक मेकांशी अधिक संलग्न राहतात. अधिक आनंदात राहतात.या उलट जो पार्टनर आपल्या पार्टनरशी हास्यविनोदात सामील होत नाही,ती जोडपी अधिक कष्टी राहतात. तेव्हा परदेशातील हे संशोधन मनावर घेऊन आपणही अधिक आनंदी, समाधानी राहण्यासाठी पार्टनरच्या हास्यविनोदात त्याला साथ द्या.

प्रेमाचे बोल

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये प्रेमभाव ठासून भरलेला असतो. तो व्यक्त करण्यासाठी सतत फोनवर बोलणं, एकमेकांसाठी शॉपिंग करणं, वीक एंडला हमखास बाहेर फिरायला जाणं या गोष्टी

ते सतत करत राहतात. शिवाय ‘आय लव्ह यू डार्लिंग,’ असे उद्गार देखील त्यांच्या तोंडून निघतात. काही लोकांना कदाचित हास्यास्पद वाटेल पण पती-पत्नीचं नातं टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी या गोष्टी आवश्यक ठरतात. निव्वळ ‘आय लव्ह यू’ नव्हे तर ज्या शब्दांमुळे प्रेमव्यक्त होईल, ते आपल्या तोंडून निघतील याची जाणीव असू द्या. तशी चांगली सवयच लावून घ्या. अन् ही सवय लग्ना्च्या नवलाई नऊ दिवसा पुरती मर्यादित नसेल याची काळजी घ्या. आयुष्यभर असे प्रेमाचे बोल उच्चारण्याची चांगली सवय लावून घ्या.

मत द्या

काही लोक स्वभावतः गरीब असतात. वादविवाद करत नाहीत. एखाद्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करत नाहीत. ‘बरंबाबा, तुझंच खरं,’ असं म्हणत मूग गिळून स्वस्थ बसतात. दोघां मध्ये कडाक्याचं भांडण झालं तर ही वागणूक योग्य म्हटली पाहिजे. परंतु कौटुंबिक समस्यांवर चर्चा न करणं, आपलं मत न देणं, ही वागणूक योग्य नव्हे. आपला जोडीदार कधी कधी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेऊ शकत नाही, म्हणून तो आपलं मत मागत असतो. त्यावर आपलं मत देणं आवश्यक ठरतं. त्यात टाळाटाळ करू नये. त्याच प्रमाणे फक्त माझंच खरं नि माझंच ऐकलं पाहिजे, अशी अहंकारी भूमिका पण घेता कामा नये. एकट्याचाच हुकूम चालविणं नाती बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतं.

स्वयंपाकास हातभार

स्वयंपाक करणं ही केवळ पत्नीचीच मक्तेदारी असते, हा समज दूर ठेवून कधीतरी पतीने पत्नीला स्वयंपाकात मदत केली पाहिजे. ती किचन क्वीन म्हणून ओळखली जात असली तरीकधी आपणही किचन किंग झालं पाहिजे, याचं भान पतीराजांनी ठेवलं पाहिजे. पूर्ण जेवणात हातभार लावता आला नाही तरी काही खाद्यपदार्थ बनविण्यास पतीने आपला हात दिला पाहिजे. भाजीचिरून देणं, साहित्य काढून ठेवणं,कुकरच्याशिट्ट्यांकडे लक्ष ठेवणं आदी कामात पतीने पत्नीच्या कामात वाटा उचलला पाहिजे. ही चांगली सवय आहे, जी प्रत्येक पतीने लावून घायला हवी. किचनमध्ये पत्नीबरोबर चांगला वेळ घालवताना तिची थोडी फार मस्करी, थोडासा प्रणयाचा खेळ खेळायला देखील हरकत नाही. या सर्व गोष्टींनी नात्यांना वेगळेच परिमाण लाभते. प्रेम वाढीस लागते. मिळून मिसळून केलेल्या अन्नाची चव काही वेगळीच लागते.

प्रणयचतुर व्हा

प्रणय करणे, प्रेमळ शब्दांची साखरपेरणी करणं या गोष्टींनीही कामजीवन निरोगी राहते. शिवाय पती-पत्नी यांच्यातील नाते कायम मधुर राहते. हे माधुर्य चाखण्यासाठी लग्नाची सुरुवातीची वर्षे एवढीच कालमर्यादा ठेवू नये. लग्नाला खूप वर्षे झाली, आता कशाला प्रणयाच्या गोष्टी करायच्या, प्रणयाची गरज काय? असे अरसिक विचार मनाला अजिबात शिवू देऊ नका. उलट पक्षी प्रणयाचा गुलकंद जितका मुरेल, तितका गोड लागतो; हे लक्षात घ्या. ‘तू पूर्वीसारखीच आकर्षक आहेस,’ असं पतीने पत्नीला सांगत राहावं, तर ‘तुझं व्यक्तिमत्त्व पहिलसारखंच आकर्षक आहे,’ अशी साखरपेरणी करत राहावी. इंग्रजीत ज्याला फ्लर्टिंग म्हणतात, ते केल्याने पती-पत्नीचे नाते सुदृढ होते. कामजीवन आणि कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी राहते, असे कित्येक परदेशी मानसोपचार तज्ज्ञांनी म्हटले आहे. विशिष्ट कालखंडाने जीवनात जी नीरसता येते, ती फ्लर्टिंगने जाते. अन् रसिकता कायम राहते, अशी ही अनुभवांची टिप्पणी त्यांनी केली आहे.

रोमांच अनुभवा

बाहेरगावी जायचं असेल किंवा वीक एंडला निसर्गरम्य अथवा जवळच्या ठिकाणी जायचं असेल तर आपण नियोजन करतो. जाण्याची तयारी करतो. पण हे रूटिन कधी बदलावं अन् अचानक बाहेरगावी जाण्याचा किंवा पिकनिकला निघण्याचा बेत करावा. म्हणजे तयारी करण्याची धांदल उडेल नि जीवनात थोडासा थरार निर्माण होईल. आपलं जीवन आणि नातं नीरस राहू नये म्हणून कधीमधी असा रोमांच अवश्य निर्माण करावा. या धांदलीत वेगळी मजा आहे. अन् मुख्य

म्हणजे आपल्या बद्दल जोडीदाराला आस्था आहे, ही जाणीव दुसऱ्या जोडीदारा मध्ये निर्माण होईल. ऑफिसातून घरी यायला नेहमी उशीर होतो. अन् घरी आल्यावर दुसरं काही काम होतच नाही, अशी विवाहित जोडप्यांची एकमेकांबद्दल तक्रार असते. त्याला छेद देऊन एखाद्या दिवशी लवकर घरी पोहचावे आणि जोडीदाराला आर्श्चयाचा धक्का द्यावा. मग अचानक काहीतरी बेत करावा. हॉटेलात जाण्याचा किंवा सिनेमा-नाटकाला जाण्याचा. या अचानक ठरविलेल्या कार्यक्रमाचा रोमांच अनुभवण्यात वेगळी मजा आहे.

संतुलन राखा

नात्यांमध्ये बिघाड येण्याची तशी अनेककारणं आहेत. पण आपल्या आरोग्याकडे, वैयक्तिक स्वास्थ्या कडे दुर्लक्ष हेही एककारण असते. एकाचे आरोग्य बिघडले तर जोडीदारास मानसिक व शारीरिक कष्ट उचलावे लागतात. मनावर ताण येतो, आर्थिक गणित कोलमोडतं. ते सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. या परिस्थितीत डोकं शांत ठेवून जोडीदाराची सेवा करणं गरजेचं असतं. आजारी माणसाला भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांकडे लक्ष द्यावं लागतं. क्वचित असे काही पाहुणे असतात की, आजारी पडलेल्या माणसाच्या घरातील परिस्थितीचा विचार न करता, त्या घरात ठिय्या मारून बसतात आणि स्वतःची बडदास्त ठेवायला लावून घरच्यांची गैरसोय करतात. यातून मार्ग काढण्याची किंवा प्रसंगी अशा नाठाळ, आगंतुक पाहुण्यांना दोन शब्द ऐकवून त्यांची बोळवण करण्याची हिंमत आपणठेवली पाहिजे. या ताणतणावाच्या काळात आपली तब्येत बिघडण्याचा धोका असतो. तेव्हा स्वतःची तब्येत सांभाळणे गरजेचंठरतं. आपण सर्व गोष्टींचे संतुलन राखले तर नाती बिघडणार नाहीत.