नैराश्याचे शिकार झालेले १० बॉलिवूड स्टार्स (10 ...

नैराश्याचे शिकार झालेले १० बॉलिवूड स्टार्स (10 Bollywood Stars Who Have Suffered From Depression)

बॉलिवूडचं क्षेत्र असं आहे की जोपर्यंत कलाकार आपल्या अभिनयाचा चमत्कार घडवतात तोपर्यंत प्रेक्षक त्यांना सलाम करतात. एकदा हे कलाकार आपल्या अभिनयात मागे पडले की हेच प्रेक्षक त्यांचं अस्तित्त्वही विसरतात. एखाद्या कलाकारावर अशी परिस्थिती गुजरली की तो ते सहन करू शकत नाही, आणि मग त्याला नैराश्य येतं. ग्लॅमरच्या या चमचमत्या दुनियेत राहणारे हे तारे आतल्या आत खचत जातात. काही वेळा याचा परिणाम जिवघेणा असू शकतो. आज आपण अशाच काही बॉलिवूडच्या कलाकांरांबद्दल जाणून घेऊया, ज्यांना कधीतरी नैराश्याचा सामना करावा लागला आहे.

१.अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील नैराश्याच्या परिस्थितीतून जावं लागलं आहे. नव्वदच्या दशकात अमिताभ बच्चन यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती, परंतु त्यांच्या कंपनीने बनवलेले सर्व सिनेमे एकामागोमाग आपटले आणि कंपनीचं दिवाळं निघालं. या सगळ्यात अमिताभजींना झालेलं नुकसान ते सहन करू शकले नाहीत आणि डिप्रेशनमध्ये गेले. या नैराश्याने अमिताभजी शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्याही कमजोर झाले होते.

२) दीपिका पादुकोण

बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पादुकोण नैराश्याची शिकार झाली होती. तिच्या त्या परिस्थितीबद्दल ती सतत बोलत असते. एका मुलाखतीमध्ये दीपिकाने स्वतः आपल्या या आजाराबाबतचा खुलासा केला होता. नैराश्याला सामोरं जाताना आपण कोठे जावे, काय करावे हे काहीच कळत नव्हते, असे तिने सांगितले. त्या परिस्थितीत ती फक्त रडत राहायची, असेही ती म्हणाली. विशेष म्हणजे नैराश्याला हरवून दीपिका आता त्यातून बाहेर पडली आहे. आता ‘द लिव लव लाफ फाउंडेशन’ या आपल्या संस्थेमार्फत ती मानसिक आरोग्याबाबत सगळ्यांना सजग करताना दिसते.

३) अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने अतिशय कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बनवलं आहे, परंतु तिलाही नैराश्याचा सामना करावा लागला आहे. आपण एंझायटी डिसऑर्डर या मानसिक समस्येतून जात असून त्यासाठीचे उपचार घेत असल्याचे अनुष्काने स्वतः ट्वीट करून सांगितले होते. पोटात दुखत असलं की आपण डॉक्टरांकडे जातो. मग मानसिक आरोग्याशी निगडीत मुद्द्यांवर आपण मोकळेपणाने बोलताना लाज का बाळगायची? असेही तिने ट्वीटमध्ये लिहिले होते.

४) शाहरुख खान

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला देखील नैराश्य आलं होतं. २०१० साली त्याच्या खांद्याची सर्जरी केल्यानंतर त्याला नैराश्य आलं होतं, असं त्यानं आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. परंतु आता मात्र तो नैराश्यातून पूर्णतः बाहेर आला आहे.

५) सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण देशाला स्तब्ध केले होते. या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह आहे की, असं काय झालं असेल की त्यामुळे सुशांतला गळफास लावून आपलं जीवन संपवावं लागलं? सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलिसांच्या अहवालानुसार, त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून सुशांत नैराश्यातून जात होता असे कळते.

६) वरुण धवन

सुपरस्टार वरुण धवन नैराश्याच्या गंभीर परिस्थितीतून गुजरला आहे, या गोष्टीवर विश्वास बसत नाही. पंरतु बदलापूर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला नैराश्य आलं होतं, असं त्यानंच सांगितलं आहे. एका मुलाखतीच्या वेळी त्याने सांगितलं होतं की, मी अचानक दुःखी होत असे, मला एकटेपणा जाणवायचा. या आजाराने माझं मानसिक आरोग्य फारच बिघडवलं होतं. खरोखर ही अतिशय गंभीर समस्या आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करू नये.

७) टायगर श्रॉफ

तरुणांच्या गळ्यातला ताईत अभिनेता टायगर श्रॉफने, स्वतःला सहन करावं लागलेलं नैराश्याचं दुःख मोकळेपणाने सांगितलं होतं. ‘अ फ्लाइंग जट्ट’ हा त्याचा सिनेमा अपयशी ठरल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. ‘बाग़ी’ चित्रपटाच्या यशानंतर आलेल्या ‘अ फ्लाइंग जट्ट’ या चित्रपटाचं अपयश तो पचवू शकला नाही, त्यामुळे त्याला नैराश्य आलं. परंतु त्याने हार न मानता त्याच्याशी लढण्याचा निर्णय घेतला. शेवटी ‘मुन्ना मायकल’च्या शूटिंग दरम्यान तो नैराश्यावर मात करत तो पूर्णपणे त्यातून बाहेर आला.

८) इलियाना डिक्रूज

इलियानालाही नैराश्य आलं होतं. इलियाना डिक्रूजने एक मुलाखतीमध्ये आपण १५ वर्षं नैराश्यात असल्याचं सांगितलं होतं. इलियानाने सांगितलं की, ती जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा ती स्वतःला येथे मिसफिट समजत होती. आपल्याला नैराश्य आलं आहे, ही तिनं स्वीकारलं होतं. आणि हे स्वीकारणं हेच ह्या आजारातून बाहेर पडण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे, असं तिचं म्हणणं आहे.

९) आलिया भट्टची मोठी बहीण शाहीन

आलिया भट्टची मोठी बहीण शाहीनला नैराश्याला सामोरं जावं लागलं आहे. शाहीनने आपल्या या प्रवासावर पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव आहे Have Never Been (Un)Happier. शाहीन आणि आलिया भट्ट एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी मानसिक स्वास्थ्याबद्दल सांगितलं होतं. त्याच वेळी बोलता बोलता आलिया इतकी भावूक झाली की तिला रडू कोसळलं. आलिया म्हणाली, ”तिला नैराश्याची समस्या नाही आहे, परंतु कधी कधी तिलाही एंझायटी होते, मागील ५-६ महिन्यांपासून तिला असं जाणवत आहे.”

१०) मनीषा कोइराला

बॉलिवूडमध्ये अनेक सरस चित्रपटांतून अभिनय केलेल्या मनीषा कोइराला नैराश्याचं दुःख झेलावं लागलं आहे. केवळ नैराश्यानेच नव्हे तर गर्भाशयाच्या कॅन्सरनेही मनीषाला हैराण केलं होतं. परंतु वेळीच कळल्यामुळे तसेच कुटुंब आणि दोस्तांच्या मदतीने तिला दोन्ही त्रासांतून बाहेर पडण्याची हिमंत मिळाली. मनीषाचं म्हणणं आहे की, ती निराशावादी नाही, त्यामुळे नैराश्याशी कसं लढायचं ते तिला माहीत आहे. नैराश्याने मनीषाचं रंग, रुप या सगळ्यावरच फार परिणाम केला होता. आता मात्र ती पूर्ववत झाली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम (सर्व फोटो)