बॉलिवूडचे १० चित्रपट जे अर्धवट बनले किंवा पूर्ण...

बॉलिवूडचे १० चित्रपट जे अर्धवट बनले किंवा पूर्ण झाले, पण प्रदर्शित झालेच नाहीत… (10 Bollywood Films That Never Got Released)

बॉलिवूडचे कलावंत-तंत्रज्ञ पैशांचा मोठा जुगार खेळून चित्रपट बनवतात. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा त्यांचा शुद्ध हेतू असतो. आपला चित्रपट हिट व्हावा, प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहावा, यासाठी ते झटतात. प्रत्येक सिनेमासाठी लेखक, दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ, कलावंत यांनी प्रचंड मेहनत घेतली असते. पण कधी त्यांची भट्टी जमते, तर कधी बिघडते. काहीतरी बिनसतं आणि चित्रपट अर्धवट सोडून द्यावा लागतो, किंवा तो पूर्ण होतो, पण कुठेतरी माशी शिंकते अन्‌ तो प्रदर्शित होऊ शकत नाही. निर्मात्याचे कोट्यावधी रुपये त्या चित्रपट रिळांच्या डब्यात अडकतात… अशाच १० दुर्देवी चित्रपटांची ही शोककथा आहे – जे कधीच रुपेरी पडद्यावर झळकले नाहीत.

१.टाइम मशीन

१९९२ साली आमीर खान, रविना टंडन आणि नसीरुद्दीन शहा अशा कलावंतांना घेऊन ‘टाइम मशीन’ हा चित्रपट तयार होत राहिला. कालप्रवाहावर आधारित हा चित्रपट होता. शेखर कपूर त्याचे दिग्दर्शक होते. त्यांनी हा चित्रपट तीन चतुर्थांश पूर्ण देखील केला होता. पण आर्थिक अडचणी आल्या नि या चित्रपटास खीळ बसली. नंतर शेखर कपूर देखील हॉलिवूडमध्ये निघून गेले. अन्‌ चित्रपट अपूर्णच राहिला.

२. पाँच

हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. याचे लेखक – दिग्दर्शक अनुराग कश्यप आहेत. के.के. मेनन, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्या, जॉय फर्नांडिस आणि तेजस्विनी कोल्हापुरे हे कलाकार त्यामध्ये आहेत. चित्रपट पूर्ण झाला आहे. पण त्यात मोठ्या प्रमाणात शिव्या आहेत. म्हणून सेन्सॉर बोर्डाने त्याला मंजुरी दिली नाही. अन्‌ चित्रपट अडकला.

३. जमीन

विनोद खन्ना, संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी असे आघाडीचे कलाकार घेऊन १९८८ साली ‘जमीन’ या चित्रपटाची सुरुवात झाली. पण आर्थिक अडचणींपायी तो बंद पडला. विशेष म्हणजे ज्यांनी ‘शोले’ सारखा कमालीचा यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केला होता, ते रमेश सिप्पी या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.

४. सरफरोश

कित्येक यशस्वी चित्रपट देणारी जोडी होती दिग्दर्शक मनमोहन देसाई आणि महानायक अमिताभ बच्चन. ‘सरफरोश’ नावाचा चित्रपट त्यांनी करायला घेतला. एका गुन्हेगाराची भूमिका अमिताभ बच्चन साकार करत होता. त्याची नायिका होती परवीन बाबी. शिवाय ऋषी कपूर, कादर खान आणि शक्ती कपूर हे कलाकार पण त्यात होते. पण हा चित्रपट अपूर्ण राहिला. त्याने रुपेरी पडदा गाठलाच नाही. पुढे याच नावाचा एक चित्रपट आला. ज्यात आमीर खान नायक होता. तो चांगलाच यशस्वी ठरला.

५. दस

‘हम’ सारखा यशस्वी चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी १९९६ मध्ये ‘दस’ नावाचा चित्रपट सुरू केला. सलमान खान – संजय दत्त हे त्याचे नायक होते. भारत-पाकिस्तान यांच्यात होणारे संभाव्य युद्ध थांबविणाऱ्या दोन भारतीय गुप्तहेरांच्या भूमिका सलमान – संजय करत होते. पण दिग्दर्शक मुकुल आनंद अचानक वारले आणि हा चित्रपट पुढे थांबला.

६. सरहद

‘सरहद’ नावाचा चित्रपट दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी सुरू केला. त्याचा नायक होता विनोद खन्ना. शिवाय मिथुन चक्रवर्ती आणि बिंदिया गोस्वामी पण त्यात होते. पण पैशांअभावी हा चित्रपट रखडला.

७. लेडीज ओन्ली

वरीलपैकी काही चित्रपट अर्धवट राहून बंद पडले होते. पण पूर्ण झाले तरी प्रदर्शित होऊ न शकलेले काही चित्रपट आहेत. असाच एक आहे ‘लेडीज ओन्ली’. याचा नायक रणधीर कपूर होता. बाईलवेड्या बॉसची भूमिका त्याने निभावली होती. दिनेश शैलेंद्र दिग्दर्शित हा चित्रपट १९९७ मध्ये तयार झाला. पण रुपेरी पडद्यावर झळकू शकला नाही.

८. चोर मंडली

हा पण असाच एक दूर्दैवी चित्रपट होय. पूर्ण झाला पण पडदा गाठू शकला नाही. राज कपूरच्या जीवनातील उत्तरार्धातला हा चित्रपट. त्यामध्ये राज सोबत अशोक कुमार होते. हिरे चोरण्याच्या मागावर असलेल्या दोन चोरांची ही मजेदार कहाणी होती.

९. खबरदार

१९८४ साली तयार होऊ घातलेल्या या चित्रपटात इच्छामरण हा विषय मांडला होता. त्यामध्ये अमिताभ बच्चन डॉक्टरच्या भूमिकेत तर कमला हसन पेशंटच्या भूमिकेत होता. हा विषय त्या काळी धाडसी वाटल्याने लोकांच्या पचनी पडेल की नाही, अशी शंका येऊन त्याचं चित्रण थांबवण्यात आलं. पुढे मात्र याच विषयावर आधारित ‘गुजारिश’ हा चित्रपट आला. त्यात हृतिक रोशन व ऐश्वर्या राय होते. तो लोकांना आवडला.

१०. जूनी

८० च्या दशकात दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी हब्बा खातून आणि काश्मिरचे अखेरचे स्वतंत्र राजे यांच्या जीवनावर ‘जूनी’ या चरित्रपटाला सुरुवात केली. नायिका होती डिंपल कापडिया. पण काश्मिरमध्ये अतिरेक्यांच्या वाढत्या कारवाया बघून त्यांना या चित्रपटातून काढता पाय घ्यावा लागला. कारण शूटिंग काश्मिरमध्ये करायचे होते. अशा रीतीने हा चित्रपट अर्धवट अवस्थेत गुंडाळावा लागला.