बॉलिवूडमधील या १० कलाकारांच्या नावाने मिळतात पि...

बॉलिवूडमधील या १० कलाकारांच्या नावाने मिळतात पिझ्झा-केक पासून मिल्कशेक आणि चिकन डिशेस्‌ (10 Bollywood Actors Who Have Dishes Named After Them, From Pizza-Cakes To Milkshakes And Chicken Dishes Too)

बॉलिवूडमधील कलाकारांचे अनुसरण करणारे चाहते केवळ देशातच नाही, तर परदेशातही असंख्य आहेत. ही लोकं आपल्या आवडत्या कलाकारावर इतकं वेड्यासारखं प्रेम करतात की, त्यांची फॅशन, स्टाईल आणि त्यांची जीवनशैली तर फॉलो करतातच शिवाय त्यांच्या नावाने मिळणाऱ्या पदार्थांच्या डिशेसना देखील पसंती दर्शवितात. कदाचित म्हणून देश-विदेशातील अनेक रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूडमधील या स्टार्सच्या नावांच्या स्पेशल डिशेसना मेन्यूमध्ये सामिल केले आहे. अशा १० बॉलिवूडच्या कलाकारांच्या नावाने लोकप्रिय झालेल्या पदार्थांबाबत जाणून घेऊया.

१. करीना कपूर

फिटनेस, परफेक्ट फिगर आणि स्टायलिश अंदाज ही करीनाचीच ओळख असू शकते. ‘टशन

चित्रपटाच्या वेळेस तिची झिरो फिगर अतिशय लोकप्रिय झाली होती. करीनाच्या या झिरो फिगरच्या लोकप्रियतेमुळेच एका इटालियन रेस्टॉरंटने ‘करीना कपूर साइज झिरो पिझ्झा’ नावाची एक डिश आपल्या मेन्यूमध्ये सामील केली, ज्या डिशला या रेस्टॉरंटमध्ये भरपूर मागणी आहे.

२. अक्षय कुमार

ओमान मध्ये ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटाची शूटिंग करत असताना तेथील एका रिसॉर्टमधील शूटिंग दरम्यान अक्षयला समजलं की त्या रिसॉर्टमध्ये त्याच्या नावाचं ‘कॉकटेल ड्रिंक’ मिळतं. ओमानमध्ये अक्षयचे जितके चाहते आहेत, ते सर्वच या रिसॉर्टमधील या ड्रिंकचेही चाहते आहेत. याशिवाय पुण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये ‘अक्षय पराठा थाळी’ मिळते.

३. शाहरुख खान

बनारस येथील एका पानाच्या दुकानात ‘शाहरुख खान स्पेशल पान’ मिळतं. हे पान फक्त बनारसी लोकांच्याच पसंतीचं नसून, येथे येणाऱ्या पर्यटकांनाही आवडतं. ‘हैरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसीला गेलेला शाहरुख खान याच दुकानात बनारसी पान खायचा. तेव्हापासून त्या पानवाल्याने शाहरुखच्या नावानेच पान विकायला सुरुवात केली. या सेलिब्रेटी पानाची किंमतही त्याने जास्त ठेवलेली आहे.

४. दीपिका पादुकोण

अमेरिकेमध्ये दीपिका पादुकोणचं नाव असलेला डोसा मिळतो, इतके तिचे इंटरनॅशनल फॅन फॉलोइंग आहेत. मागच्याच वर्षी रणवीर सिंहने सोशल मीडियावर एका रेस्टॉरंटचं मेन्यूकार्ड शेयर केलं होतं, ज्यात ‘दीपिका पादुकोण व्हेज डोसा’ नावाची एक डिश आहे. ‘डोसा लॅब्स’ असं त्या रेस्टॉरंटचं नाव असून या डोशाची किंमत फ्कत १० डॉलर म्हणजे ७०० रुपए आहे. तर पुण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये ६०० रुपयांत ‘दीपिका नावाची पराठा थाळी’ मिळते.

५. सलमान खान

मुंबई, बांद्रा येथील एक संपूर्ण रेस्टॉरंटच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या नावे आहे. ‘भाईजान’ असंच या रेस्टॉरंटचं नाव आहे. या रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमधील सर्वच डिशेस सलामानच्या नावाच्या आहेत, जसे प्रेम डेझर्ट, चुलबूल चावल इत्यादी. भाईजानच्या चाहत्यांमध्ये हे रेस्टॉरंट अतिशय लोकप्रिय आहे. मुंबईतीलच नव्हे तर बाहेरून येणारे पर्यटक देखील सलमानच्या या रेस्टॉरंटमधील पदार्थांचे दिवाने आहेत. 

६. रणबीर कपूर

बॉलिवूडचा सर्वात चार्मिंग अभिनेता रणबीर कपूरचं नाव असलेली चिकन डिश चंदीगढ येथील एका ढाब्यामध्ये अतिशय फेमस आहे. आपल्या ‘राजनीति’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चंदीगढला गेलेला रणबीर या ढाब्यावर जेवण्यासाठी गेला होता. रणबीर कपूरचे पाय आपल्या ढाब्याला लागल्याच्या आनंदात त्या ढाब्याच्या मालकाने तेथील एका पदार्थाला ‘रणबीर कपूर स्पेशल चिकन’ असं नाव दिलं आहे.

७. प्रियंका चोप्रा

प्रियंकाने हॉलीवूडच्या खाण्या-पिण्याच्या एका दुकानामध्ये स्वतः मिल्कशेक बनवला होता. त्यानंतर तेथील अनेक ठिकाणी तिच्या नावाचे शेक्स दिले जाऊ लागले. वेस्ट हॉलिवूडच्या मिलियन्स ऑफ मिल्कशेक्स स्टोअरमध्ये प्रियंकाच्या नावाचे वेगवेगळे मिल्कशेक्स मिळतात.

८. रजनीकांत

रजनीकांत यांच्या ६२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चेन्नई येथील न्यू नीला भवन रेस्टॉरंटने आपल्या मेन्युकार्डमधील १२ पदार्थांना रजनीकांत यांचं नाव दिलं आहे. या पदार्थांची नावं रजनीकांत यांच्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या चित्रपटांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. आणि त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच या पदार्थांनीही लोकांना वेड लावले आहे.

९. सोनम कपूर

बॉलीवूडची फॅशनिष्टा सोनम कपूरच्या नावाचा ‘मँगो ब्लूबेरी केक’ मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मिळतो. सोनमने आपल्या २५व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन या रेस्टॉरंटमध्ये केले होते. त्यानंतर त्या रेस्टॉरंटच्या मालकाने तिच्या नावाचे मिल्कशेक देखील सुरू केले.

१०. संजय दत्त

मुंबईच्या मोहम्मद अली रोड येथील नूर मोहम्मद हॉटेलमध्ये संजयचं नाव असलेली एक चिकन डिश खूपच प्रसिद्ध आहे. ‘संजू बाबा चिकन करी’ असं या डिशचं नाव आहे आणि गंमत म्हणजे या डिशची रेसिपी खुद्द संजय दत्तने शेअर केली होती.